१४ ऑगस्ट २००९ला भारत माता मंदिराची स्थापना झाली. भारत मातेचे मंदिर फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. भारत माता मंदिर स्थापन करण्याचा उद्देश राष्ट्रीयत्वाची आणि भारतीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे हा आहे. शिक्षणाच्या अभावामुळे सुद्धा त्यांची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन इथल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी १२ विविध आश्रमातून राहणाऱ्या १२५० मुलांच्या भरण पोषण, संस्कार व शिक्षणाची जबाबदारी भारत माता मंदिराने घेतली आहे.
सेवाव्रती – शिबानी जोशी
गुजरात राज्यातील बडोदे शहरात, वाडी विस्तारात, श्री महारुद्र हनुमान संस्थान, भारत माता मंदिर गेल्या २५ वर्षांपासून विविध सेवा उपक्रम राबवत आहे. सुरुवातीला भास्कर भाई गोठगस्ते यांनी या संस्थानाची सुरुवात केली होती. गोठगस्ते हे समाजकार्य करत असताना त्यांना आश्रम शाळांमधल्या मुलांची आहाराची दुरवस्था दिसून आली आणि या मुलांसाठी आहार देण्याचं त्यानी मनात योजलं; परंतु एखादी संस्था हाताशी असेल तर अशी कामं जोमाने करता येतात म्हणून त्यांनी सुरुवातीला हनुमान संस्थान सुरू केलं.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रात काही पट्ट्यांमध्ये राहणारे वनवासी अजूनही राहतात व ते शिक्षणापासून वंचित आहेत त्याचप्रमाणे गुजरातमधल्या काही तालुक्यातही वनवासी राहतात आणि आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना मुलांना शिकवता येत नाही. अशा मुलांसाठी आश्रम शाळांमध्ये शिक्षणाची व राहण्याची सोय करण्यात येते; परंतु त्यांना सकस आहार मिळावा यासाठी भारत माता मंदिर संस्थेतर्फे संपूर्ण जेवण देण्याची व्यवस्था चालते. धर्मांतरणाचा प्रश्न देखील तिथे दिसून येत होता त्यावरही त्या काळात काम केलं गेलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; परंतु त्याआधी देशाचे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्टला म्हणूनच अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो. त्याच दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट २००९ला भारत माता मंदिराची स्थापना झाली. भारत मातेचं मंदिर फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. भारत माता मंदिर स्थापन करण्याचा उद्देश राष्ट्रीयत्वाची आणि भारतीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे हा आहे.
गुजरातच्या छोटा उदेपूर, नर्मदा आणि भरुच जिल्ह्यातील दुर्गम पहाडी विस्तारात राहणाऱ्या अत्यंत गरीब, वनवासी कुटुंबातील लोक साध्या साध्या सोयी-सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शिक्षणाच्या अभावामुळे सुद्धा त्यांची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन इथल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी १२ विविध आश्रमातून राहणाऱ्या १२५० मुलांच्या भरण पोषण, संस्कार व शिक्षणाची जबाबदारी भारत माता मंदिरानं घेतली आहे. इथल्या मुलांना सकस आहार गेले अनेक वर्षे पुरवला जातो. आपल्या धार्मिक सणांबरोबरच राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी विविध राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. २३ मार्चला हुतात्मा दिन, १४ ऑगस्टला अखंड भारत संकल्प दिन साजरा केला जातो.
त्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता कीर्तन महोत्सव, प्रवचनमाला आयोजित केल्या जातात. ज्या अंतर्गत आतापर्यंत अनेक राष्ट्रीय विचाराचे महान वक्ते येऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण करून दिले आहेत. महान वक्ते पुष्पेद्रं कुलश्रेष्ठ, राम माधव, हरिशंकर जैन, विष्णुशकंर जैन, एडवोकेट विक्रम एडके, अनुज धर, प्रखर श्रीवास्तव ह्यांची जाहीर प्रवचन ऐकून प्रत्येकजण विचार करायला प्रवृत्त झाला आहे. वेदांचे रक्षण, प्रसार आणि संवर्धन करणं हा देखील संस्थेचा एक मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीने संहिता पारायण, शाखा पारायण, घनपाठ अशा धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचं दरवर्षी आयोजन केलं जातं. याच अंतर्गत देशात प्रथमच १२ ते १७ मार्च २०२३ दरम्यान अखिल भारतीय चतुर्वेदीय महासम्मेलन आयोजित करण्यात आले होते. चारही वेदांवर आधारित या संमेलनात विचार मंथन झालं.
नवीन पिढीमध्ये वेद, उपनिषदांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्थेकडून नित्य वेद आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. हनुमान मंदिर असल्यामुळे हनुमान जयंती, रामनवमी उत्सव, श्रावण शनिवारी इथे उत्सव साजरे केले जातात. दर मंगळवारी सामूहिक आरती केली जाते. यावेळी मोठ्या संख्येने लोक आरतीला उपस्थित राहतात तसेच महाराष्ट्राची खास कीर्तनाची धार्मिक परंपरा आहे आणि ती मराठी माणूस कुठेही राहत असला तरी त्याला भावते. त्यामुळे मराठी बांधवांसाठी कीर्तन महोत्सवाचंही आयोजन करण्यात येतं आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभतो. सध्या ५१ ठिकाणी हनुमान मंदिर बांधण्याची योजना सुरू आहे, त्यापैकी १४ मंदिर बांधून झाली आहेत. तीन ते चार फूट उंचीच्या हनुमानाच्या ५१ मूर्ती संस्थेला मिळाल्या होत्या, त्यांची प्रतिष्ठापना वेगवेगळ्या गावात करण्याचं काम सध्या सुरू आहे असं संस्थेच्या ट्रस्टी माधवी मोगरकर यांनी सांगितलं. संस्थेचे सर्व कार्यक्रम लोकांच्या सहकार्यातून आणि मदतीतूनच होत असतात.