हलकं-फुलकं – राजश्री वटे
भुरका रंग असतो नाही का… किंवा करडाही म्हणतात. भुरकट, मातकट हे रंग ही या भुरक्या रंगात मोडतात म्हणजे असे की, फार उठावदार नसतात हे!
रंगाच्या दुनियेत याला फारसे महत्त्व नाही.
पण…
पण… भुरका… वा! असे म्हणत जो मारला जातो ना (जरा जपून मारला तर लागेल)… हं… नुसते ऐकले तरी तोंडाला पाणी सुटतंय बघा …
आता आठवलेच असेल भुरका कशा कशाचा मारतात ते!!
पहिले आठवते कढी… मसालेभात व कढी… यांची फार दोस्ती… हे दोन एकत्रच जेवणाची लज्जत वाढवतात… कधी ताकही येतं मसालेभाताशी दोस्ती करायला… तेव्हा मात्र कढीची हकालपट्टी होते!
असे मस्त मांडी घालून बसावे आणि मसालेभातावर तुपाची धार व गरम कढी… फुर्र आवाज करत भुरका मारावा तो थेट अंतर्मात्मा तृप्त व्हावा!
टमाट्याच्या साराचा भुरका… अहाहा… थंडीमध्ये गरमा गरम मारतच राहावा… फुर्र!!
पुरणपोळीच्या जोडीला कटाची आमटी झालीच पाहिजे… पुरणपोळीवर तुपाची धार, वर कटाच्या आमटीचा भुरका…
दिल खूश!
गोळा भात व चिंचेचे सार… वा वा! याची तर तुलनाच नाही… चिंचेच्या साराचा भुरका थेट गळ्यातून पोटात जाऊन विसावतो गुळचट-
आंबट चवीचा!
भुरका कसा मारायचा… बघा… बैठक मारून तब्येतीने बसायचे… वाटीमध्ये मस्त गरम कढी, कटाची आमटी, टोमॅटो सार, चिंचेचे सार, सोलकढी बरोबर माशाचे कालवण घ्यायचे… एकावेळी एकच हं… नाहीतर.. सगळ्या वाट्या एकदम घेऊन बसाल… तर काय करायचे पाचही बोटं वाटीत बुडवायची, त्याचा द्रोण करून त्यात जेवढे सामावेल तेवढे उचलायचे व तोंड जरा ताटात वाकवत, सपकन भुरका मारायचा व पांची बोटं ओरपायची! हळूच चोरून आजूबाजूला कोणी बघत नाही ना याकडे एक नजर टाकायची, हळूच हनुवटीवरचा ओघळ उलट्या मुठीने पुसायचा व तोंडात टाकलेल्या भुरक्या बरोबर आनंद पोटात रिचवायचा, कधी कधी तो भुरका ओघळतो मनगटापर्यंत… अशावेळी मोठी जीभ पटकन बाहेर येते व ढोपरापर्यंत तो ओघळ जाऊ नये याची काळजी घेते कोणाच्या लक्षात येण्या आधीच!!
आपल्याकडे जरा संकोचत भुरका मारला जातो. पण दक्षिणेकडे बिनधास्त रस्सम भात, सांबार भात खाताना ढोपरापर्यंत गेलेल्या ओघळाचाच भुरका मारला जातो. अशावेळी जिभेला जरा जास्त कष्ट पडतात, पण ती आपले स्वच्छता अभियान मस्त राबवते… तसे जीभ व भुरका यांची जोडी एकमेकांना पूरकच!!
रोजच्या जेवणातले चिंच-गुळाचे वरण व गरमा गरम मऊ भातावर तूप असे भुरकले जाते ना… ब्रह्मानंदी टाळी लागलीच पाहिजे! केवढे सुख आहे त्यात… खाऊनच समजेल!
अरे… फक्त बोटानीच नव्हे… सरळ वाटी तोंडाला लावून फुर्र करण्यात ही मजा असते गोडाची! बासुंदी, मसाला दूध… फुरक्या मारतच प्यावं… भुरक्याचा भाऊ फुरक्या!
आणि राहिलंच की… अरे गरम चहा पण फुंकर मारत बशीतून फुर्र फुर्र प्यावा…
मग येताय ना पांढरा रस्सा… तांबडा रस्सा पांची बोटं बुडवून फुरक्या मारत भुरकायला… लईच टेष्टी वाटल बगा…
फुर्र… फुर्र… फुर्र…!!