केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे पक्ष कार्यालयात जंगी स्वागत
मुंबई : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या कपोलकल्पित बातम्या गेले काही दिवस आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा आपल्या मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली हे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांच्या टिकेतील हवाच काढून टाकली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड झाल्यानंतर आज सुनिल तटकरे प्रदेश कार्यालयात आले असता त्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मला जी समिती दिली आहे त्या समितीची जबाबदारी फार मोठी आहे. त्या समितीच्या कामकाजाबद्दल आता सांगणे योग्य नाही कारण ही समिती लोकसभेच्या अखत्यारीत येते. मात्र या समितीचे काम योग्यरितीने करण्याचे सातत्य माझ्याकडून ठेवले जाईल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
राज्यात जी विविध महामंडळे आहेत त्यावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे. निवड करण्यास विलंब झाला असला तरी काही दिवसातच माझ्या महत्वाच्या सहका-यांना काम करण्याची संधी मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य सुदर्शन सांगळे, मनिषा तुपे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.