मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असणारे धरणे,नदी-नाले तुडुंब भरले गेले आहेत. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या सर्व धरणे देखील काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी प्रश्न सुटणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांजवळ पोहचला आहे. आज सकाळी ६ वाजता या जलाशयांमधील पाणीसाठा १४,३९,२७१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच एकूण ९९.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे.
कोणत्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा?
- अप्पर वैतरणा – ९९.७९ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर – १०० टक्के पाणीसाठा
- तानसा – ९९.५८ टक्के पाणीसाठा
- मध्य वैतरणा – ९८.७९ टक्के पाणीसाठा
- भातसा – ९९.३५ टक्के पाणीसाठा
- विहार – १०० टक्के पाणीसाठा
- तुलसी – १०० टक्के पाणीसाठा