अरुण बेतकेकर
२८ सप्टेंबर १९२९, साक्षात गान सरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्या हयात असत्या तर ९५ वर्षांच्या आणि तरीही गात असत्या. त्यांचे निधन ही एक आपल्या जीवनातील दुःखद घटना. आपले संपूर्ण जीवन त्यांची गाणी ऐकत आनंदात लोटली. त्या ६ फेब्रुवारी २०२२ स्वर्गवासी झाल्या, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा ऐकले त्यातच त्या गेल्याचे विस्मरण झाले. ते अगदी कालपर्यंत. लतादीदी म्हणूनच अजरामर. त्यांचा आजचा जन्मदिनही, प्रजा सर्वार्थाने लतादीदी यांना अर्पण करेल. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक ते सोशल मीडिया तसेच सर्वच नाट्यगृहात त्यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम पेश होतील. सर्वच हाऊसफुल्ल. असाच एक कार्यक्रम “लतांजली”. भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष, आमदार आशीष शेलार यांनी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आयोजित केला होता. तोही षण्मुखानंद सभागृहात. ज्याची प्रेक्षक क्षमता अंदाजे तीन हजार.तोही हाऊसफुल्ल आणि तितकेच शौकिन सभागृहाबाहेर प्रवेशिकाविना ताटकळत होते. सुदैवाने या कार्यक्रमास उपस्थित राहून मी हा दिवस सार्थकी लावला होता. माझ्या स्वतःजवळ लतादीदी यांनी गायलेल्या गाण्यांचा प्रचंड संग्रह आहे. नित्यनियमाने मी ती ऐकतो व आनंदी राहतो.
संगीतातील लतादीदींच्या योगदानाच्या उल्लेखाशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. या इतिहासातील लतादीदी या सोनेरी पान. त्यांच्या गायनाविषयी भरपूर काही लिहिले-बोलले गेले आहे. तसे ते अनंत काळासाठी चालत राहील; परंतु त्यांच्यातील या कलागुणांचा वेगळ्या परिपेक्षेतून ऊहापोह करणे कालानुरूप ठरेल. वर्षातील ३६५ दिवस, त्यातील प्रत्येक क्षण लतादीदींचा आवाज जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे उमटत राहतो. भूतलावर असा एकही देश नसेल जेथे लतादीदी ऐकल्या जात नसतील. एक व्यक्ती म्हणून विचार केल्यास देश-विदेशातील संगीत क्षेत्रातील दिग्गज उदा. बीटल्स, मायकल जॅक्सन वा मॅडोना असोत. राजकारणातील गांधी असतील, अमेरिकेचे अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग वा आफ्रिकेतील नेल्सन मंडेला वा हुकूमशहा चीनचे माओ त्से तुंग, रशियाचे व्लादिमिर लेनिन, जोसेफ स्टालिन, जर्मनीचे एडोल्फ हिटलर असोत. अशा सर्वांची तुलना केल्यास सर्वाधिक ऐकला जात असलेला आवाज हा लतादीदींचाच. जगभरात सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती या नि:शंक लतादीदींचं.
लतादीदींना वन वुमन आर्मी असे गणल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या देशातील उद्योजक उदा. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी वैगेरे अशा उद्योगक्षेत्रातील दिग्गजांचा विचार केल्यास देशाच्या प्रगतीत यांचा मोलाचा वाटा आहे. यांच्या उद्योगक्षेत्रात लाखो कर्मचारी नोकऱ्या करतात. ते ही जेथे त्यांच्या अस्थापना अस्तित्वात आहेत त्या ठरावीक ठिकाणी. लाखो कुटुंब व कोटींच्या संख्येत जनतेचा उदरनिर्वाह यांच्यावर अवलंबून असतो. पण हा सर्व खेळ ऊन-पावसाचा, स्थैर्य नसलेला, शास्वतीचा अभाव. याच्या तुलनेत लतादीदींचे योगदान निखळ, आनंददायी आणि अढळ, व्याप्तीही सर्वत्र. त्यांच्या संगीतावर लाखो कुटुंब पोसली जातात. त्यांनी गायलेले एखादे गाणे वा अनेक गाणी यावर देश- विदेशात कार्यक्रम आयोजित होतात. लतादीदी म्हणजे संगीताचे महाविश्वविद्यालय. यात सहभागी कलाकार आणि यातून होणारी आर्थिक उलाढाल ही कोणाही उद्योजकांपेक्षा उणी नसावी. त्याची गिनती करणे अशक्य. कोणतेही बेरजेचे यंत्र निकामी करून टाकणारे. लतादीदींच्या गाण्यांचे कार्यक्रम सर्रास होत असतात. अशा कार्यक्रमाविषयी विचार केल्यास गायक, वाद्यवृंद त्यांचा अनेक दिवसांचा रियाज. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कार्यक्रमाच्या यशोस्वितेसाठी राबणारे हात शिवाय सभागृह, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया यांच्याद्वारे होणारे प्रक्षेपण तेही अखंड काळापर्यंत आणि उपस्थित रसिकगण, लतादीदी अशा सर्वांना आपल्या कवेत सामावून घेतात. निखळ आनंद, आयुष्य वृद्धिंगत करणारे, सरस्वतीसारखे स्थिर व शास्वत.
दैवाने आपल्या आयुष्यातील काही काळ इतरांना अर्पण करण्याची सोय केली असती, तर निःसंशय एकमेव लतादीदी या अजरामर झाल्या असत्या. किती बरे झाले असते पिढ्यानपिढ्या लोकांना लता मंगेशकर प्रत्यक्ष ऐकता, अनुभवता आल्या असत्या. अलीकडे सोशल मीडियावर लतादीदींच्या प्रत्येक गाण्याचा अभ्यासपूर्ण विश्लेषण पाहायला मिळते. शास्त्रीय संगीतातले नव्या पिढीतील तरुण दिग्गज राहुल देशपांडे, रोहित कटारिया, कौशिकी चक्रवर्ती, शंकर महादेवन, महेश काळे इत्यादी लतादीदींच्या गायकीचा सोप्या भाषेत विश्लेषण करतात.
शिवाय विविध वाद्यांवर लतादीदींची गाणी वाजविली जातात, कार्यक्रम होतात. यास लक्ष – दशलक्ष उपस्थिती, व्ह्यूज, लाईक, शेअर्स प्राप्त होतात. शिवाय रिमिक्स! रिमिक्स जरी कर्णकर्कश बेसुरे तरी यातून आर्थिक उलाढाल होते ती शेकडो-हजारो कोटींची. यात गुंतलेल्या हातांची गिनतीच अशक्य. शिवाय नव-नवे प्रयोग अखंड सुरू असतात. त्यांनी गायलेल्या गाण्यांचे मूळ रेकॉर्डिंग ज्या टेप्स वा यंत्रणेवर उपलब्ध असतात त्यावर संशोधन करत, शास्त्रोक्त प्रक्रिया करत त्या अत्यंत सुस्पष्ट स्वरूपात पुन्हा-पुन्हा सादर होत असतात. यास Revive म्हटले जाते. त्यानंतर गाणी जशीच्या तशी मूळ स्वरूपात राखत त्यातील संगीत जे दोन-चार वाद्यांवर आधारित असे ते वगळून त्याऐवजी तसेच संगीत मोठ्या वाद्यवृंदात तयार करून मूळ गाण्यास जोडून ते पुनर्रजीवित केले. यास Recreate म्हटले जाते. अशा वैविध्यतेने लतादीदींना ऐकण्याला नवा साज चढला. महत्त्वाचे म्हणजे असंख्य शौकिनांनी त्यांची विस्मरणात गेलेली, हरवलेली गाणी शोधून काढली व जनतेसमोर पेश केली.
महान संगीतकार मदन मोहन यांच्याबरोबर लतादीदींनी गायलेली गाणी अत्यंत सुरेख ! दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची इच्छा की, आपल्या एखाद्या चित्रपटास मदनमोहन यांचे संगीत आणि लतादीदी यांचे स्वर असावे. दुर्दैवाने मदनमोहन यांच्या अकाली निधनाने ती इच्छा अधुरीच राहिली. मदनमोहन यांचे सुपुत्र संजीव कोहली यांना वाटे आपल्या वडिलांचे संगीत आपली आवडती जोडी अमिताभ-हेमामालिनी यांच्या अभिनय असलेल्या एखाद्या चित्रपटास असावे. दुर्दैवाने हेही साध्य झाले नाही. कोहली यांनी वडिलांच्या हयातीत अनेक दशकापूर्वी रचना करून ठेवलेले सूर शोधून काढले. त्या सुरांचा वापर अलीकडच्या २००४ सालातील यश चोप्रा यांच्या “विर-झारा” चित्रपटात केला. त्यातील सर्व गाणी लता दीदी यांनीच गायली. ही गाणी जगभर गाजली.
अशा प्रकारे यश चोप्रा यांचे स्वप्न, स्वतःचे दिग्दर्शन, मदनमोहन यांचे संगीत आणि लतादीदी यांचे स्वर, पूर्ण झाले. तसेच कोहली यांची इच्छा, मदनमोहन यांचे संगीत, लतादीदींचे स्वर आणि आणि आपली आवडती जोडी अमिताभ-हेमा यांचा अभिनय हे ही “विर-झारा”द्वारे पूर्ण झाले. शिवाय मदनमोहन यांचे संगीत असलेल्या शेवटच्या चित्रपटात लतादीदींनी सर्व गाणी गायली. विशेष उल्लेख करायचे म्हणजे यावेळी लतादीदी भावुक होऊन म्हणाल्या “मदनभाईंनी हे स्वर मला ३० वर्षांपूर्वी स्वतः ऐकवले होते आणि त्या सुरात मला तीच गाणी गाण्याचे भाग्य आज लाभले, वाटते मदन भय्या माझ्या बाजूला बसून गाणे म्हणवून घेत आहेत.” याची आठवण करून दिली.
भगवान शंकर – पार्वती पुत्र, कार्तिकेय व गणेश यांच्यात श्रेष्ठत्वाची स्पर्धा जुंपली. दोघे आपल्या माता- पित्याकडे पोहोचले. भगवान शंकर म्हणाले, जो कोणी प्रथम पृथ्वी परिक्रमा पूर्ण करेल तो श्रेष्ठ. कार्तिकेय तत्काळ आपले वाहन मयुरावर स्वार होऊन मार्गस्थ झाले. गणेश एकांतात ध्यानस्थ झाले.
थोड्याच वेळात माता-पित्यांकडे परतले. त्यांचे हात धरून त्यांना आसनस्थ केले. बेल-फुले वाहून त्यांची चरणपूजा केली आणि हात जोडून माता-पित्याभोवती सप्त परिक्रमा सुरू केली. याची माता-पित्यानी गणेशाकडे विचारणा केली असता गणेश म्हणाले, “सर्वतीर्थमयी माता… सर्वदेवमयो पिता…” अर्थात, पित्याच्या पूजनाने सर्व देवांची पूजा पूर्ण होते तर मातेभोवतीच्या परिक्रमेने पृथ्वी परिक्रमा पूर्ण होते. मी सात वेळा पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली. अशा बुद्धिमत्तेमुळेच गणेश हे श्रेष्ठ ठरतात. संगीत क्षेत्रात जे कोणी कार्यरत आहेत अशांनी साक्षात सरस्वती, लतादीदींच्या भोवती परिक्रमा करावी इतक्या त्या श्रेष्ठ आहेत.