समर्थ कृपा - विलास खानोलकर
गणपतराव जोशी श्री स्वामी समर्थांच्या सहवासात व सेवेत होते; परंतु त्यांना श्री स्वामींचे देवत्व, अवतारित्व आणि सर्वसाक्षित्व पुरेसे कळले नव्हते. रूढ अर्थाने ते श्री स्वामींची सेवा करीत होते, श्री स्वामी हे निरिच्छ, निर्मोही, निःसंग होते. त्यांना कुणी काही दिले तरी ते घेतीलच असे नव्हे. घेतलेच तर ते स्वतःजवळ, स्वतःसाठी ठेवतीलच असेही नव्हे. त्यांना लहर आली, तर जे असेल, ते सर्व दुसऱ्यास देऊन टाकीत. ते सदैव दिगंबर अवस्थेत असल्याने ‘कौपिनवंत खलु भाग्यवंत’ हे वचनही त्यांच्यापुढे लटके पडावे असे ते होते.
असे हे श्री स्वामी एके प्रातःकाळी अकस्मात गणपतराव जोशी यांच्या घरी आले. जोशींना खूप आनंद झाला. त्यांनी श्री स्वामींस स्नान घातले. त्यांची पूजा केली. त्यांना नैवेद्य अर्पण केला. त्यांना मोठ्या प्रेमाने पिवळा (पितांबर) मुकटा नेसवला व त्यांना भोजनास पाटावर बसविले. पण गणपतराव जोशांच्या मनात आले की, स्वामी महाराज आपण नेसवलेला हा किंमती पिवळा मुकटा कोणास तरी देऊन टाकतील. अशा क्षणिक शंकेने गणपतराव मनातून बेचैन झाले. त्रिकालज्ञानी श्री स्वामींना गणपतराव जोशांची ही मानसिक अवस्था समजल्या वाचून कशी राहील? त्यांना जोशांचे वर्तन आवडले नाही. ते भोजन न करताच भरल्या ताटावरून उठले आणि म्हणाले, ‘हा घे तुझा मुकटा !’ मुकटा सोडून दिगंबर अवस्थेत ते गणपतराव जोशांच्या घरातून निघून गेले.
दान, दक्षिणा आणि नैवेद्य करताना त्यावर ‘तुळशीपत्र’ ठेवूनच देण्याचा प्रघात आहे. कारण की ते देणे, निरपेक्ष, निर्हेतूक, निरलस असावे. एकदा एखादे दान दिले की, दात्याचा त्या दानाशी संबंध तुटतो. त्याचे पुढे काय करावयाचे ते घेणाऱ्याने ठरवावे. दात्याने त्याबाबत गाजावाजा, प्रसिद्धी, गर्व आदी करू नये. त्या दानाचे काय करावे, हेही सुचवू नये; परंतु बऱ्याचदा दान अथवा एखादी वस्तू देताना अथवा दानधर्म करताना प्रसिद्धी, अहंकार, स्वार्थ-लाभ-लोभ, घेणाऱ्यास मिंधे करण्याची भावना मनात निर्माण होते, अथवा दात्याचा त्यामागे काही ना काही हेतू वा उद्देश असतो. असल्या दानाने कोणतेही पुण्य पदरी पडत नाही. ‘उजव्या हाताने केले जाणारे दान वा सत्कृत्य डाव्या हातालाही कळता कामा नये.’ असा अलिप्तपणा दात्यामध्ये असावा लागतो. असा दानाचा धर्म आहे.
या लीला कथेत गणपतराव जोशींकडून नकळत का होईना मुकट्याविषयी मनात विचार येण्याची चूक झाली होती. तीसुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थांबाबत. हा विचार मनात आला म्हणून ते न जेवता व त्याचा मुकटा देऊन त्याच्या घरातून निघून गेले. पुढे तात्या वैद्य नावाच्या गृहस्थांनी श्री स्वामी भक्तिपूर्वक प्रार्थना करताच ते त्याच्या घरी भोजनास गेले. तात्या वैद्यास त्याची शुद्ध भक्ती कामी आली. म्हणून साधक-उपासक-भक्तांनी दान दक्षिणा अथवा काही अर्पण करताना कसे असावे हेच श्री स्वामी महाराजांनी आपणास येथे प्रबोधित केले आहे.
श्रीकृष्णम् अर्पणम् अस्तू।
सदा सर्वदा स्वामी संमर्पणम् अस्तू।।
सदा स्वामीनाम घ्यावे नंतर कार्य स्वामीचरणी वाहावे.
नाथांचे नाथ स्वामीनाथ
शांत शांत व्हा जगदोद्धारा
न लागो (जनासी) वणव्याचा वारा ।।१।।
नका वटारू तुमचे नेत्र
आम्ही कर्माने गलीत गात्र ।।२।।
आमचे जीवन क्षणमात्र
तू दशसहस्त्र वर्षांचे गंगा पात्र ।।३।।
माफ करा बालकासी तो अपात्र
खरे स्वामीभक्त निरांजनातील वात ।।४।।
तुमच्या आशिर्वादे संकटावर मात
पाऊल पालखीसोबत सात ।।५।।
सातजन्म देतील साथ
अग्नी वादळवारा होती शांत ।।६ ।।
स्वामी तुम्ही असता नाही भ्रांत
करणार नाही तुम्ही अनाथ ।।७।।
साऱ्या नवनाथांचे तुम्हीच नाथ
आसेतु हिमाचल तुमचाच प्रांत ।।८ ।।
तू केवळ माता जनिता
सर्वता तू हितकर्ता ।।९।।
तूच आप्तजन भ्राता
सर्वांचा तूच त्राता ।।१०।।
भयकर्ता तू भयहर्ता
दंडकर्ता तू प्रणीपाता ।।११।।
तुझ्या दर्शनात आनंदीवार्ता
स्वामी समर्था तूच आश्रयदाता ।।१२ ।।
सारी संकटे करू पार
तुझ्या आशिर्वादाने आरपार ।।१३।।
सारी पंचमहाभूते तुझी ताबेदार
तुझे दर्शनच स्वर्गाचे दार ।।१४ ।।
vilaskhanolkarkardo@gmail.com