विद्याधर शेणोलीकर – कोथरूड, पुणे
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही आता एक संस्कृती न राहता एक विकृती झालेली आहे, असं खेदानं म्हणावंसं वाटतं. मूळचे पुणेकर या उत्सव-विसर्जन इत्यादींपासून केव्हाच दूर झाला आहे. किंबहुना बऱ्याच पुणेकरांना आता विसर्जनाच्या दिवशी पुण्यात थांबणंही नकोसं वाटायला लागलंय…
गणेश विसर्जनाच्या दिवशी आख्खं शहरच जणू परकं झाल्याप्रमाणे वाटू लागतं… कुणीतरी आपल्या संपूर्ण अस्तित्वावरच आक्रमण करतं आहे अशी भावना येते… आणि याला कारण असह्य कानठळ्या बसवणारे लाऊडस्पीकर्स, त्यावर चालणाऱ्या बीभत्स नृत्यं नावाच्या शारीरिक हालचाली, संपूर्ण पुणे शहराची दोन दिवस संपूर्ण नाकेबंदी आणि अहोरात्र भूकंपाचा अनुभव…
प्रश्न असा पडतो की, हे सर्व कुणाच्या आनंदासाठी?
आणि काही मोजक्या टवाळांच्या विकृत आनंदासाठी आख्खं पुणे शहर वेठीला धरलं जातं… पोलीस, प्रशासन, राजकीय नेते वगैरे मंडळी यावेळी मोडीतच निघालेली असतात…तुम्हाला तुमच्या घरात देखील शांतपणे राहू देणार नाही अशा निश्चयानं आख्खं शहर पूर्ण दोन दिवस हादरत ठेवलं जातं…
तुम्ही नामवंत डॉक्टर असाल, मोठे उद्योजक असाल, उत्तम प्राध्यापक असाल, सॉफ्टवेयर इंजिनीअर असाल, निवृत्त बडे सरकारी अधिकारी असाल…
कोणीही असा… या विकृतीपुढे तुम्ही निव्वळ कचरा आहात…डीजेच्या दणदणाटापुढं काय
तुमची ‘औकात’?…
मुकाट सहन करा… नाही तर मरून जा…
आज जिथे विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरातही शांतपणे बसणं अशक्य आणि असह्य झालं आहे, त्याच पुण्यात आम्ही पुणेकर एकेकाळी भर विसर्जन मिरवणुकांमध्ये लक्ष्मी रोडवरून उलट्या दिशेने पार बाबू गेनू चौकापर्यंत जाऊ शकत होतो… काहीही त्रास न होता…
आज ज्या लक्ष्मी रोडवरचे रहिवासी परगावी निघून जातात, तिथे एकेकाळी आम्ही मित्रांना वशिला लावून कुणाच्या ना कुणाच्या गॅलरीत जागा पटकावून बसायचो…मानाचे गणपती बघायला…
दहा दिवस गणेशोत्सव हा खरोखर एक सर्वार्थानं उत्सव असायचा… कारण उत्सवाचं वातावरण तेव्हा मुळात मनामध्येच तयार व्हायचं… आषाढी एकादशीला उपास वगैरे झाले की, आयाबायांची श्रावणातील व्रतवैकल्यं सुरू व्हायची. शुक्रवारची गोष्ट वाचणे, सवाष्ण जेवायला बोलावणे, जिवत्यांची पूजा या सगळ्यांमध्ये आया-आज्ज्या व्यस्त असायच्या. आम्ही शुक्रवारी ओवाळून घ्यायला उशीर केला की, आई रागवायची, कारण मुलांना ओवाळल्याशिवाय आया जेवत नसत… मुलांच्या पानात पुरणाचा नैवेद्य आणि साजुक तूप असायचं हे सांगायला नकोच…
गणपतींच्या मागे-पुढे साधारण तिमाही परीक्षा असायच्या… पण मुलांच्या डोक्यात विचार असायचे ते घरच्या गणपतीची आरास… मंडळाच्या गणपतीच्या मीटिंगला हजेरी… यावेळी पडदा लावून कुठला सिनेमा दाखवणार ? कुठले कुठले देखावे बघायचे? वगैरे…चतुर्थीपासून “आपल्या” मंडळाच्या गणपतीच्या मांडवात रोज मुक्काम असायचा…काही महाभाग तर रात्री चक्क मांडवातच ताणून द्यायचे… सगळे कार्यकर्ते, बालगोपाल सगळं एक कुटुंब असल्यासारखं वाटायचं.
विसर्जन मिरवणुकीत भले एकच ढोल आणि एकच ताशा किंवा टिमकी असेल… पण बाप्पापुढं श्वास फुलून येईपर्यंत नाचायचं… शाळांचीही पथकं जायची. मंडळांपुढं लेझीमनृत्य करायला… विसर्जनानंतर काहीशा उदास मनानं, थकून भागून रित्या मंडपात यायचं… तिथे मोठे कार्यकर्ते सुकी भेळ, चिरलेले कांदा-टोमॅटो वगैरेंचा डोंगर ठेवत त्याचा फडशा पाडायचा… विसर्जनाच्या दिवशी पहाटेपर्यंत मिरवणुका पाहायच्या… पहाटे दमलेल्या पायांनी घरी येऊन, पाहिलेले देखावे मनात घोळवत निद्राधीन व्हायचं… तो सुंदर हवाहवासा गणेशोत्सव…. आणि आजचा “कधी हे सगळं बंद होईल बाप्पा?” अशी भावना मनात येणारा बेताल, मोकाट गणेशोत्सव…आजच्या गणेशोत्सवापासून मूळचा पुणेकर रहिवासी केव्हाच दूर झाला आहे… असहाय्यपणे तो हे सगळं पाहतो आहे… पोलीस काही करतील यावरचा त्याचा विश्वास केव्हाच उडाला आहे…
राजकारणी काही करतील हा विचार तर सोडाच, उलट ह्या नंग्या नाचाला बळ देणारी बडी धेंडंच आहेत हे सूज्ञ पुणेकर जाणतो… आणि पुण्याची एकेकाळची शान असलेल्या गणेशोत्सवाचं हे आजचं वेडंवाकडं, संस्कृतीहीन रूप तो हतबलतेनं पाहत आहे… आता बाप्पानंच काही चमत्कार केला तर बरं !