राजरंग – राज चिंचणकर
लेखक, दिग्दर्शक व निर्माते आनंद म्हसवेकर यांच्या ‘सुनेच्या राशीला सासू’ हे नाटक रंगभूमीवर खूप गाजले. आजही या नाटकाचे अधूनमधून प्रयोग होत असतात. याच नाटकाच्या चार प्रयोगांचा एक दौरा होता आणि या मालिकेतला एक प्रयोग अचानक रद्द झाला. पण त्यामुळे नाउमेद न होता, आनंद म्हसवेकर यांनी त्याचा सदुपयोग करून घेतला आणि त्या निमित्ताने त्यांच्या मनात एक हृद्य घटना कायमची बंदिस्त झाली. तर, रद्द झालेला तो प्रयोग त्या मालिकेतला मधलाच प्रयोग असल्याने या नाटकमंडळींना तिथे मुक्काम करणे क्रमप्राप्तच ठरले. त्या ठिकाणी आनंद म्हसवेकर यांची काही मित्रमंडळी होती आणि रद्द झालेल्या प्रयोगाच्या ऐवजी तिथल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघासाठी नाटकाचा विनामूल्य प्रयोग करण्याची इच्छा त्यांनी त्या मंडळींकडे व्यक्त केली.
आनंद म्हसवेकर यांच्या नाटकांचे एक वैशिट्य आहे. त्यांची नाटके ‘सुटसुटीत’ या व्याख्येत अचूक बसणारी असतात. त्यांची बहुसंख्य नाटकांसाठी रंगमंचाची अट नसते आणि उपलब्ध नेपथ्यानुसार त्यांचे सादरीकरण होत असते. हीच बाब या ‘विशेष’ प्रयोगाच्याही उपयोगी पडणार होती. तर, त्या मित्रमंडळींना आनंद म्हसवेकर यांचा प्रस्ताव आवडला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका छोटेखानी हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी नाटकाचा प्रयोग ठरला.
नाटकाचा प्रयोग छान रंगला. ज्येष्ठ रंगकर्मी नयना आपटे त्या नाटकात भूमिका रंगवत असल्याने रसिकांसाठीही ती पर्वणी ठरली. प्रयोग संपल्यावर, तिथे उपस्थित असलेल्या एका कॉलेजच्या रिटायर्ड प्रिन्सिपल सरांनी त्या ज्येष्ठ रसिकांना आवाहन करत थोडा वेळ थांबवून घेतले आणि ते म्हणाले, “या मंडळींचा एक प्रयोग रद्द झाल्याने हे नाटक पाहण्याची आपल्याला संधी मिळाली आणि तेही विनामूल्य! तर त्यासाठी आपण या टीमला काहीतरी द्यायला हवे”.
आता पुढे काय, असा प्रश्न आनंद म्हसवेकर यांना पडला असतानाच त्या प्रिन्सिपल सरांचे शब्द त्यांच्या कानी पडले. “दोन-अडीच तास आपण सर्वजण आपआपले ताणतणाव आणि व्याधी विसरून खळखळून हसत होतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी दोन्ही हात वर करून या नाटकाच्या टीमला सुखी व आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद देऊ या”, असे ते उपस्थितांना उद्देशून म्हणाले. त्याला प्रतिसाद म्हणून, “तुम्ही सर्व आनंदी रहा आणि शतायुषी व्हा”, असे त्या सर्व ज्येष्ठ रसिकांनी कोरसमध्ये म्हटले. अर्थातच, हे सर्व अनुभवताना आनंद म्हसवेकर थक्क झाले होते. इतक्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींचे एकत्र आशीर्वाद, त्यांना एका रद्द झालेल्या प्रयोगाच्या निमित्ताने लाभले होते. विशेष म्हणजे, त्या नाटकाच्या त्या दिवसापर्यंत झालेल्या सव्वाशे प्रयोगांपैकी तो सर्वाधिक रंगलेला प्रयोग ठरला होता.