आरक्षणाला विराेध काॅंग्रेसच्या अंगलट

Share

पाण्यामध्ये विहार करणाऱ्या माशाला पाण्याबाहेर काढल्यावर जशी त्याची तडफड होते, तशी अवस्था दिल्ली दरबारी आणि विविध राज्यांमध्ये वर्षांनुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांची झालेली आहे. यापूर्वी केंद्रामध्ये मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रतापसिंग, देवीलाल, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी अशा अनेकांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची सरकारे आली. त्या त्या वेळी असलेल्या काँग्रेसविरोधी लाटेचा राजकीय फायदा उचलत काँग्रेस विरोधकांची सरकारे सत्तेवर आली. पण काँग्रेस विरोधी सरकारे फारशी प्रभावी कामगिरी करू शकली नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांचा अपवाद वगळता अनेकांना त्यांचा कालावधीही पूर्ण करता न आल्याने देशाला मध्यावधी निवडणुकांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आपल्याशिवाय देशाचा कारभार कोणी करूच शकत नाही. देशाला स्थिर सरकार अन्य कोणी देऊच शकत नाही असा काँॅंग्रेसचा समज झाला; परंतु २०१४ साली काँग्रेसचा भ्रमाचा भोपळा फुटला. ‘अच्छे दिन आयेगे’, ‘अब की बार-मोदी सरकार’ या दोनच घोषणांनी त्या परिस्थितीत देश भारावून गेला आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या नेतृत्वाची अर्थात पंतप्रधानपदाची धुरा सोपविली.

या निवडणुकीत व त्यानंतरही २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पालापाचोळा उडाला. देशाला तब्बल १० वर्षे प्रबळ विरोधी पक्ष नेताच संसदेत नसल्याचे चित्र या लोकशाही देशामध्ये पाहावयास मिळाले. मुळात पर्याय नसल्याने काँग्रेसचा स्वीकार देशातील जनता करत होती आणि पर्याय व तोही नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाल्याने काँग्रेसला अडगळीत जाण्याची वेळ आली. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्याने व दहा वर्षे भाजपा सत्तेत असल्याने अत्यल्प स्वरूपात विरोधी मते वाढल्याने काँग्रेसला खासदारांची शंभरी गाठता आली. राहुल गांधींच्या रूपाने काँग्रेसला युवा नेतृत्व मिळाल्याने काँग्रेस भरारी मारेल, असा काही काळ राजकारणात सूर आळविण्यात आला; परंतु राहुल गांधींना सक्षमपणे उभारी घेता न आल्याने व जनसामान्यांचा विश्वास जिंकता न आल्याने त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडत गेल्या. त्यातच त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने भारतविरोधी भूमिका मांडत परदेशात भारताची प्रतिमा मलीन करण्याचे कार्य केल्याने देशवासीयांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा, संतापाचा सूर आळविला जात आहे.

आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका त्यांनी वेळावेळी सार्वजनिकरीत्याही स्पष्ट केलेली आहे. काँग्रेसने केवळ निवडणूक काळात मागासवर्गियांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी आपण देशातील मागासवर्गियांचे, उपेक्षितांचे तारणहार असल्याचे चित्र निर्माण केले. अर्थांत हे चित्र फसवे असल्याचे काळाच्या ओघात स्पष्ट झाल्याने त्यांचा हक्काचा पारंपरिक मतदार त्यांच्यापासून कायमचा दुरावला आणि काँग्रेसला सत्ता गमविण्याची वेळ आली. काँग्रेसच्या नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार, घरामध्ये सत्तेचे केंद्रीकरण, आर्थिक लुटमार याशिवाय फारसे काहीही केले नाही. आज काँग्रेसला एससी, एसटी व अन्य मागासवर्गिय घटकांचा, जाती-जमातीचा पुळका आला आहे. अर्थात हा पुळका म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे. स्वातंत्र्यापासून देशाचा कारभार हाकताना काँग्रेसला खरोखरीच मागासवर्गियांचा, मागास जाती-जमातींचा विकास करायचा असता तर आज काही वेगळेच चित्र दिसले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये भाषणामधून हीच वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने त्यांच्या सत्ता कालावधीत एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला पुढे जाऊ दिले नाही. काही दिवसांपूर्वीच परदेशात भाषण करताना देशामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आरक्षण रद्द करण्याबाबतची भूमिका विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मांडली होती. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद देशामधील मागासवर्गिय समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले. संतापाचा व निषेधाचा सूर आळविला जाऊ लागला. हे वक्तव्य आपल्यावर उलटणार असल्याचे दिसताच काँग्रेसकडून सारवासारव सुरू झाली. राहुल गांधींच्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, अशी भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली. केवळ राहुल गांधीच नाही तर काँग्रेसचे नेते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही आरक्षणविरोधी भूमिका जाहीरपणे मांडली होती.

पंतप्रधान मोदी गणेशोत्सवामध्ये गणरायाच्या दर्शनासाठी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांच्या घरी गेले असता, काँग्रेसने मोठे आकांडतांडव केले. गणेशोत्सवामध्ये गणरायाच्या दर्शनावरही काँग्रेसने आक्षेप घेतला होता. गणेशोत्सवामध्ये कर्नाटकमध्ये तर काँग्रेसने कहर केला. त्यांचा गणेशोत्सवाला एवढा विरोध आहे की, त्यांनी गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले. ज्या गणेशमूर्तीची लोक पूजा करत होते ती मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेली. गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे आणि महाराष्ट्राची भूमी त्याची साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. प्रत्येक समाजाला, वर्गाला एकत्र आणले होते. काँग्रेसने मात्र या गणेशोत्सवाचा तिरस्कार केला आहे. काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. काँग्रेसचे तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या बिछान्यामध्ये काही कोटी रुपये सापडले होते. या देशात भ्रष्टाचाराचा भस्मासूर काँग्रेस राजवटीतच निर्माण झाला आणि काँग्रेसी नेत्यांच्या सक्रिय योगदानामुळे फोफावला देखील. काँग्रेसचा मुखवटा आता गळून पडला असून त्यांचा भ्रष्टाचाराचा, हिंदुत्वविरोधाचा आणि आरक्षणविरोधी खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अमरावती येथील कार्यक्रमात काँग्रेसच्या कारभाराची व मुखवटाधारण केलेल्या चेहऱ्याची खऱ्या अर्थांने चिरफाड करत त्यांच्या कार्याचा व खऱ्या चेहऱ्याचा पंचनामाच केला आहे.

Recent Posts

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

3 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

25 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

27 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

2 hours ago