माझे कोकण – संतोष वायंगणकर
गेल्या काही वर्षांतील आपल्या देशातील राजकारण आणि राजकीय स्थित्यंतरे पाहिली की आपणालाच नव्हे, तर अखंड देशाला पहिली आठवण जर कोणाची होत असेल तर ती संसदपटू बॅ. नाथ पै यांचीच होते. नि:स्वार्थी भाव जपत संसदेच्या लोकसभागृहात १९५७ ते १९७१ अशी तब्बल १४ वर्षे देशाचे सभागृह आपल्या अभ्यासू अमोघ वक्तव्यानी गाजवणाऱ्या बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी सभागृह भारलेलं असायचं. देशात काँग्रेसची सत्ता त्यात बॅ. नाथ पै यांच्यासारखा विरोधी विचारांचा सदस्य; परंतु दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूदेखील बॅ. नाथ पै यांचे सभागृहातील भाषण, विचार ऐकायला आवर्जून येऊन बसत असत. जसं लोकसभागृहात एक वेगळ स्थान आणि मान जसा बॅ. नाथ पै यांना होता. तसाच बॅ. नाथ पै यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा कोकणातील त्यांचा मतदार होता. बॅ. नाथ पै यांच्या विचारांची जादू एवढी प्रचंड होती की, कोकणातील जनता नेहमीच बाकी कोणताही विचार न करता बॅ. नाथ पै यांना निवडून देत राहिली. नाथांप्रती कोकणातील जनतेच्या मनात नितांत आदर आणि विश्वासाची भावना होती. नाथांच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशीही फार वेगळ नातं तयार झालं होतं. कुणाही शेतकऱ्यांच्या घरी घोंगडीवर बसून चटणी-भाकरीचा आस्वाद घेत जनतेशी असलेली कनेक्टिव्हिटी नाथांनी जपली होती.
नाथांनी खरं तर कोकणाला ज्ञानाचं प्रचंड मोठं भांडार दिलं. विद्वत्ता आणि साधेपणा कसा जपला जाऊ शकतो हे केवळ नाथांकडून शिकण्यासारख आहे. वेंगुर्ले येथे बॅ. नाथ पै यांचं स्मारक उभं झालंय.
बॅ. नाथ पै समुदाय केंद्र स्थापन झालय. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. चालणं, बोलणं आणि वागणं, आचार-विचार नेहमी सुसंगत असावेत असं म्हटलं जातं. या विचारातील शुद्धता आणि त्याच पद्धतीने आचरण हे तशी सोपी गोष्ट नाही; परंतु बॅ. नाथ पै जसं बोलायचे तसच त्यांच वर्तन होतं. त्यांचा भाषेवर, विचारांवर, अभ्यासावर आणि स्वत:वर प्रचंड विश्वास होता. यामुळेच बॅ. नाथ पै यांच बोलणं एेकायला संसदेत आणि जनतेतही ओढ असायची. अशा या विचारवंत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच उिचत स्मारक बॅ. नाथ पै समुदाय केंद्राच्या रूपाने वेंगुर्लेत उभं आहे. नाथांच्या विचारांनी भारलेलं कोकण होतं. या नाथांच्या विचारांचा प्रचंड पगडा कोकणातील जनतेवर होता. आजही नाथांचा सहवास लाभलेल्यांना त्यांच्या आठवणीत रमताना व्याकुळ व्हायला होतं. अशा पद्धतीची बॅ. नाथ पै आणि जनतेमध्ये कनेक्टिव्हिटी राहिली आहे. नाथांनी कोकणाला काय दिले असेल, तर नाथांनी कोकणाला विचारांचा मोठा वारसा दिला आणि यामुळेच गेल्या साठ वर्षांनंतरही राजकारण, समाजकारणाच्या आदर्शांची चर्चा होते. तेव्हा-तेव्हा नाथांच नाव घेतल्याशिवाय ती चर्चा पुढे सरकलीच जात नाही. वेंगुर्लेतील बॅ. नाथ पै यांचे स्मारक वेंगुर्ले नगर परिषद तर्फे बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून हे स्मारक उभे राहिले आहे. ही केवळ एक वास्तू नाही. हे अभ्यास केंद्रच नव्हे, तर प्रचंड मोठा विचारांचा वारसा लाभलेल्या एका अभ्यासू आदर्शाची ती वास्तू आहे. बॅ. नाथ पै यांच्या समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. बॅ. नाथ पै यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. बॅ. नाथ पै यांना पाहिलेल्या, अनुभवलेल्या अनेक व्यक्तींनी आपल्या बोलण्यातून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. अभ्यासूपणा आणि वैचारिकतेतून एखाद्या आदर्शाचा पगडा आजही कोकणच्या मनावर आहे. नाथांच्या विचारांनी भारलेली प्रेरित झालेले अनेक आहेत. नाथांच्या गुणात्मकतेवर प्रेम करणारे त्यांच्या विचारांना, आदर्शांना नतमस्तक होणारेही असंख्य आहेत. या स्मारकातून अभ्यास करून, वाचनातून नवीन पिढीला प्रेरणा देणार काही घडेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नसावी.
नव्या पिढीला वाचता येण्यासारखं नाथांचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासारखं खूप काही आहे. आजच्या समाजव्यवस्थेत नतमस्तक व्हावे अशी माणसं सापडत नाहीत. आदर्श या शब्दाला साजेसे असणारेच दुर्मिळ होत चालले आहेत. आजच्या समाजव्यवस्थेत आदर्शाची व्याख्याच बदलली आहे. यामुळेच दुर्मिळ बनत चाललेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये बॅ. नाथ पै यांच्यासारखा ‘आदर्श’ आजही समाज मनात वेगळ स्थान निर्माण करून आहे. संसदेतल नाथांच कार्य दिल्लीतील संसदेच्या ग्रंथालयात चिरकाल साक्ष देत रहाणार आहेच; परंतु बेळगावचे असलेले बॅ. नाथ पै यांच वेंगुर्लेशी फार वेगळं अतूट नातं आहे. समाजमनावर चाळीस-पन्नास वर्षें एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे अधिराज्य राहते हे फारच दुर्मिळ आहे. तरुण पिढीलाही बॅ. नाथ पै समजून घ्यावेसे वाटतात. संसदेतील कार्याची माहिती घेण्याचा प्रयत्न होतो. या सर्व गोष्टीतून नाथांचा मोठेपणा त्यांच्या कार्य, कर्तृत्वाची उंची हिमालयालाही छोटी ठरवणारी आहे. बॅ. नाथ पै यांनी १९५७ ते १९७१ या काळात कोकणातील लोकसभेचे प्रतिनिधित्त्व केलं. कोकणातील लोकसंस्कृतीत रमणारे नाथ दशावतार कलेवर प्रेम करीत रात्रभर जागून दशावतारी नाटक बॅ. नाथ पै पहायचे. नाथांच्या दशावतार कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न बॅ. नाथ पै यांचा राहिला.
कोकणातील गोर-गरीब सर्वसामान्य दशावतारी कलावंत केवळ हौस, आवड आणि कोकणातील ही लोककला टिकून राहण्यासाठी बॅ. नाथ पै यांना या लोककलेवर प्रेम करत त्याचं जतन करणाऱ्या लोककलावंताना प्रोत्साहन मिळावे यासाठीच नाथांचे प्रयत्न होते. नंतरच्या काळात दशावताराला राजाश्रय मिळत गेला. बॅ. नाथ पै यांच नाव उच्चारताच अशा अनेक आठवणींना उजाळा मिळून जातो. आज कोकणातून धावणारी आणि दक्षिणेकडे जाणारी कोकण रेल्वे बॅ. नाथ पै यांच फार मोठं योगदान आहे. कोकण रेल्वेचा हा प्रकल्प सुरू होण्यास त्याची पुर्तता होण्यास पुढची अनेक वर्षे लागली; परंतु रेल्वे कोकणात यायला पाहिजे या विचाराला पुष्ठी देत तसे प्रयत्न देशाच्या सभागृहात बॅ. नाथ पै यांनीच केले. नंतरच्या काळात स्व.प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुढाकारातून, इच्छाशक्तीतून हा कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण होऊ शकला. बॅ. नाथ पै यांच वेंगुर्लेतील स्मारक कोकणातील जनतेसाठी पुढच्या पिढीसाठी आदर्श व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारं स्मारक म्हणूनच कोकणवासीय नेहमीच बॅ. नाथ पै यांच्या प्रती आदर व्यक्त करत नतमस्तक होतील एवढ निश्चित!