Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNarayan Rane : ज्यांनी वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चावर बनवला, त्यांना टीका करण्याचा...

Narayan Rane : ज्यांनी वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चावर बनवला, त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

खासदार नारायण राणे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडून (MVA) राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर आज राजकोट किल्ला परिसरात ठाकरे गटाचे आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायणे राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अक्षरश: वाभाडे काढले. तसेच शिवद्रोही भाषा करणा-या ठाकरेंची काय ती भाषा, उद्धव ठाकरेंनी महाराजांचा एकही पुतळा उभारला नाही. स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील भारत सरकारच्या खर्चावर बनावला. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी खरडपट्टी काढत राणे यांनी उबाठांचा खरपूस समाचार घेतला.

माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी होती. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र ऐन पावसाळ्यात हा पुतळा कोसळला. मी यामध्ये कोणावरही आरोप करणार नाही. कशामुळे हा पुतळा कोसळला, याचे कारण बाहेर यावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी. हा पुतळा ज्यांनी कोणी बांधला त्यांची चौकशी करावी तसेच हा पुतळा का कोसळला याची देखील चौकशी व्हावी, अशी माझी आणि येथील जनतेची इच्छा आहे, असे माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाला, तो निकृष्ट दर्जाचा होता, याचा एकतरी पुरावा आहे का? हा पुतळा लवकरात लवकर उभारावा आणि दोषींवर कारवाई करावी, या दोनच आमच्या मागण्या आहेत. यापलीकडे आम्हाला राजकारण करायचे नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, निवडणुका समोर असल्याने काही विरोधक याचा भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात त्यांना भाजपावर टीका करण्यासाठी कोणतेही कारण मिळत नसल्याने शिवसेना (उबाठा गट), शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस या पुतळ्यावरून आमच्यावर टीका करत आहेत. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला तेव्हा जिल्ह्यातील लोकं महाराजांसमोर नतमस्तक झाली. मात्र आज बाहेरून आलेले सर्व पुढारी गेल्या आठ महिन्यात कधी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आले नाही, असेही यावेळी नारायण राणे म्हणाले.

शिवद्रोही हे लोकं आहे असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र त्यांच्याकडून चांगल्या भाषेची काय अपेक्षा करणार, त्यांनी त्यांच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाला निर्वाहाचा साधन बनवले आणि पैसे कमावले, असा आरोप देखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. तसेच त्यांना शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारी नाही. त्यांना बोलता येत नाही. शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणसाठी काय केले? कोकणातील किती लोकांना नोकऱ्या दिल्या, किती प्रकल्प आणले, किती पूल बांधले, असा सवाल नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरापर्यंत पोचू शकला नसता

राजकोट किल्ल्यावरील ठाकरे गट आणि राणे समर्थकांमधील जोरदार बाचाबाचीमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. तब्बल दीड तास राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरु होती. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना या गोंधळाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा नारायण राणे यांनी म्हटले की, आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. आम्ही म्हटलं येथून आम्ही हटणार नाही, त्यांनी दुस-या रस्त्याने जावे. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. आम्हाला काही करायचे असते तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का?, असे नारायण राणे यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे हे आमच्यामुळे राजकोट किल्ल्यावर राडा झाला, असे म्हणतात. पण राड्यामुळेच शिवसेना नावारुपाला आली. तेव्हा आदित्य ठाकरे शेंबडा होता, उद्धव ठाकरेंनाही काही माहिती नव्हते, ते इकडे नव्हते, असे नारायण राणे यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -