मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज
लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात
मुंबई : मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी अनुभवायला मिळणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली आहे.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे व आसपासच्या परिसरातील दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकांना लाखोंचे लोणी चाखायला मिळणार असून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. तसेच परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेत देखाव्याचे सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. तर महिला गोविंदा पथकांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईसह ठाण्यात मोठ्या स्तरावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी आयोजकांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांसह बॅन्जो आणि डीजेचीही व्यवस्था केली आहे.
वरळीतील जांबोरीवर भाजपाच्या दहीहंडीची धूम
उबाठाचे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी यंदाही भाजपातर्फे वरळीतील जांबोरी मैदानात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत परिवर्तन दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची मानाची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. तर पाच थरांसाठी ५ हजार, सहा थरांसाठी ७ हजार, ७ थरांसाठी ११ हजार आणि ८ थरांसाठी ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. भाजपच्या संतोष पांडे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन केले आहे. तर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे वरळीतील विभाग अधिकारी संकेत सावंत आणि आकर्षिका पाटील यांनी वरळीतील श्रीराम मिल चौकात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून आकर्षक चषकासह एकूण ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी बॅन्जो आणि डीजेसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण होणार आहे. तर ठाकरे गटाच्या युवा सेनेने दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत शिवसेना भवनसमोरील राम गणेश गडकरी चौकात निष्ठा दहीहंडी आयोजित केली आहे.
Dahihandi festival : मनसेचा डोंबिवली पूर्वेतील दहीहंडी उत्सव रद्द!
राहुल नार्वेकरांकडून कुलाब्यात ११ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे
कुलाब्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व भाजपचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी पारंपरिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवात एकूण ११ लाख ११ हजार १११ रुपयांची पारितोषिके आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर पाच थरांसाठी २ हजार, सहा थरांसाठी ५ हजार, सात थरांसाठी ७ हजार, आठ थरांसाठी २५ हजार आणि नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकास १ लाख १ रुपये देण्यात येणार आहे.
काळाचौकीत बाळा नांदगांवकरांकडून १२ लाखांची बक्षिसे
शिवडी विधानसभेतर्फे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकीमधील अभ्युदयनगर येथील शहीद भगतसिंग मैदानात सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गोविंदा पथकांना बक्षीस म्हणून १२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मनसेतर्फे बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.