गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची कामं युद्धपातळीवर करा, वाहतूक सुरळीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. रस्त्याची दुरावस्था पाहिल्यानंतर काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.
जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी काहीही करून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची कामं युद्धपातळीवर करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपीड क्विक सेटिंग हार्डनर (एम-६०) चा वापर करून हे खड्डे बुजवता येथील का याचाही आढावा त्यांनी आढावा घेतला. कामं सोडून गेलेल्या कंत्राटदारांना टर्मिनेटच करु नका तर काळ्या यादीत टाका. डिबार करुन टाका, असे एकनाथ शिंदे म्हणाले. कंत्राटदारांवर ३०२ प्रमाणं गुन्हा दाखल करा, इथं माणसं मरत आहेत, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला. कंत्राटदाराला नुसतं टर्मिनेट आणि दंड करुन उपयोग नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावणार आहे. कंत्राटदारांवर उद्या एफआयआर झाला पाहिजे. मला मोबाईलवर एफआयआर पाठवायची, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
जेलमध्ये टाकल्याशिवाय यांना धडा मिळणार नाही. ही मोगलाई आहे का? मेसेज एवढा कडक गेला पाहिजे की, परत कोणी काम सोडणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाटा येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी करताना आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.