पेण(देवा पेरवी)- आज संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. पण शारीरीक कमतरतेमुळे गतीमंद आणि अपंग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता. मात्र उद्योजक राजू पिचिका यांच्या पेणमधील “रामेश्वर कन्ट्रक्शन” ने अनोखा उपक्रम राबवत गतीमंद मुलांच्या दहीहंडीचे आयोजन केले होते.
या दहीहंडी उत्सवामध्ये 55 गतीमंद मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला. ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती, यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. गतिमंद मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम “आई डे केअर’ संस्था करत असून गेल्या 14 वर्षांपासून रामेश्वर कन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद होत असल्याचे संस्थेच्या स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले.
रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पीचीका यांच्या मार्फत हा अनोखा उपक्रम राबविण्याचे हे चौदावे वर्ष आहे. या कार्यक्रमानंतर सर्व मतिमंद मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, उद्योजक राजू पिचिका, सुषमा अनिरुद्ध पाटील, धर्मेश पोटे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व खाऊ देण्यात आला.