नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आयसीसीच्या चेअरमनपदी निवडण्यात आले आहे. ते आयसीसीचे चेअरमन बनणारे सगळ्यात युवा भारतीय असतील. जय शाह ३६ वर्षाच्या वयात ही जबाबदारी सांभाळणार आहेत. जय शाह यांच्याआधी भारताच्या दिग्गजांनी हे पद सांभाळल आहे. विशेष म्हणजे जय शाह यांना बिनविरोध या पदासाठी निवडण्यात आले. ते आता १ डिसेंबरपासून पदभार सांभाळणार आहेत. जय शाह यांना यासाठी बीसीसीआयचे सचिव पद सोडावे लागेल.
आयसीसीचे सध्याचे चेअरमन न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. यानंतर जय शाह पदभार सांभाळतील. आयसीसीने २० ऑगस्टला याबाबतची महत्त्वाची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की बार्कले सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी राहणार नाहीत. ते २०२० पासून हे पद सांभाळत होते.
जय शाह यांच्याआधी चार भारतीयांना भूषवले आहे हे पद
जय शाह यांच्याआधी चार भारतीय आयसीसीचे चेअरमन राहिले आहेत. जगमोहन दालमिया १९९७ ते २००० पर्यंत अध्यक्ष होते. यानंतर २०१० ते २०१२ पर्यंत शरद पवार अध्यक्ष राहिले होते. तर एन श्रीनिवासन २०१४-१५ दरम्यान चेअरमन होते. तर शशांक मनोहर हे २०१५-२०२० पासून चेअरमन राहिले होते. खरंतर २०१५ आधी आयसीसीच्या प्रमुखांना प्रेसिडेंट म्हटले जात होते. मात्र यानंतर चेअरमन म्हटले जाऊ लागले.