चाकरमान्यांना कोकण संघटनेचे आवाहन
अलिबाग : गोवा हा राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी नादुरुस्त झालेला असला, तरी पूर्वीपेक्षा खूप चांगली परिस्थिती आहे. जेथे महामार्ग खराब आहे, तेथे पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याने गोवा महामार्गावरूनच गणेशोत्सवासाठी कोकणात जावे, असे आवाहन समृद्ध कोकण संघटनेचे प्रमुख संजय यादवराव यांनी केले आहे.
गोवा महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, बाजारपेठा, कोकणी चाकरमानी शिमग्याला, गणपतीला येतात आणि त्यांच्या पाठबळावर हे व्यवसायिक असतात. हेच सगळे व्यवसायिक गेली १७ वर्षे खूप अडचणीत आले आहेत. मात्र यावर्षीपासून रस्ता चांगला असल्यामुळे ही परिस्थिती बदलेल असा विश्वास आहे. त्यासाठी सर्व कोकणवासियांनी गोवा महामार्गावरुनच कोकणात येणे अपेक्षीत आहे. कोकणात जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग असून, पहिला मार्ग मुंबईतून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन येऊन खोपोली टोलनाका येथे बाहेर पडून पालीमार्गे विळेभागाड एमआयडीसी, निजामपूर, रायगडच्या दिशेने जाऊन दहा किलोमीटरमध्ये उजवीकडे एक फाटा आहे. या फाटयाने माणगावच्या पुढे जाऊन माणगावमधील ट्रॅफिक टाळता येते. दुसरा मार्ग लोणेरे ते संगमेश्वर चांगला रस्ता आहे. संगमेश्वर ते लांजा खराब रस्ता आहे. पण ज्यांना राजापूर आणि सिंधुदुर्गात जायचे आहे त्यांनी संगमेश्वरला डाव्या बाजुला वळून देवरूखला जाऊन देवरुख साखरप्यावरून दाभोळ आणि दाभोळ्यावरून भांबेडमार्गे वाटूळला जावे. संगमेश्वर ते वाटूळ हा अतिशय देखणा सह्याद्रीमधला रस्ता आहे.
वाटुळच्या पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे चांगला रस्ता आहे.तिसरा मार्ग म्हणजे रत्नागिरीमध्ये ज्यांना जायचे आहे, त्यांना दोन रस्ते आहेत. संगमेश्वरच्या अलिकडे फुनगुस जाकादेवीमार्गे गणपतीपुळे आणि रत्नागिरीमध्ये जाता येईल किंवा संगमेश्वरच्या पुढे उजवीकडे उक्षी फाटा आहे. उक्षीवरून जाकादेवी आणि रत्नागिरीत जाता येईल. हा रस्ता सुद्धा चांगला आहे. त्यामुळे हे हे रस्ते वापरून कुठेच अडचण न येता चांगल्या रस्त्याने कोकणातील गावी जाता येईल असा विश्वास समृद्ध कोकण संघटनेने व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री
गणेशोत्सव काळात प्रवास सुखकर व्हावा यासाठी बंदी
गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन क्षमता असणाऱ्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्ग विविध दिवशी तब्बल २१६ तास बंद असणार आहे. या कालाधीत फक्त अवजड वाहनांना या मार्गावरुन वाहतूक करता येण्यास मज्जाव केला आहे. अवजड वाहनांना बंदी घातली असताना दुसरीकडे मात्र रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने गणेशभक्तांचा प्रवास खडतर असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सरकारने सूट दिली आहे.
गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन क्षमता असणाऱ्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई ते सावंतवाडीदरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. तर ५ व ७ दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांचे गणेशमुर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.
या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना ८ सप्टेंबर रात्री ११ वाजेपासून ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील. हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.