Sunday, March 16, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखबदलापूरमध्ये माणुसकीला काळिमा

बदलापूरमध्ये माणुसकीला काळिमा

मुंबईतील मध्य रेल्वेच्या मार्गावरील विस्तारीत उपनगर असलेल्या बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींचे त्यांच्या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याच्या घटनेनंतर जनतेत मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. उरण, मीरा-भाईंदर, बेलापूर अशा अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरच्या शाळेत दोन बालिकांवर बलात्कार केल्याची घटना अतिशय भयानक व धक्कादायक आहे. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर येऊन आक्रोश केला. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी दिवसभर ठिय्या मारून कल्याण-कर्जत रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा फटका बसला. दोन बालिकांचे शाळेत झालेले लैंगिक शोषण ही अंगावर काटा आणणारी घटना आहे. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याला फाशीच दिली पाहिजे, या मागणीसाठी हजारो स्त्री-पुरुष रस्त्यावर व रेल्वे मार्गावर उतरले होते. केवळ बदलापूरलाच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रालाच काळिमा फासणारी ही घटना आहे. कोलकत्याच्या सरकारी इस्पितळात एका ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप होतो व तिची निर्घृण हत्या केली जाते, या घटनेने देश हादरला. कोलकत्याच्या त्या सामूहिक बलात्कार व हत्येवर देशभर संताप प्रकट होत असताना महाराष्ट्रात मुंबईजवळ बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडावी, हे लांच्छनास्पद आहे.

महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना जोरदार राबवली जात आहे. रक्षाबंधनापूर्वीच लक्षावधी बहिणींच्या बँक खात्यात सरकारने देऊ केलेले दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमाही झाले. त्याचाही गाजावाजा मोठा झाला. पण बदलापूरच्या घटनेनंतर शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या व आम्हाला फुकटचे पैसे नकोत तर आम्हाला आमच्या लेकरांची सुरक्षा महत्त्वाची आहे म्हणून टाहो फोडताना दिसल्या. ज्या शाळेत दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाले, ती शाळा व शिक्षण संस्थाही नामांकित आहे. अशा शाळेत लैंगिक शोषणाची घटना घडली, हे धक्कादायक आहे. शाळेच्या व्यवस्थापनात काही त्रुटी होत्या की शाळा राम भरोसे चालू होती? शाळेचे चालक व व्यवस्थापन एका विशिष्ट विचाराचे आहेत, अशीही चर्चा सुरू झाली. पण शाळेत येणारे लोक किंवा नेमलेले कर्मचारी कोणत्या विचाराचे असतात, कोणत्या संस्कारातून पुढे आलेले असतात, हे कुणालाच ठाऊक नसते. आई-बाप आपल्या मुलांना व मुलींना शाळेत पाठवतात, ते शाळेवर विश्वास ठेऊनच. शाळेत चांगले संस्कार होतील, चांगले शिक्षण मिळेल, चांगल्या वातावरणात आपली मुले मोठी होतील या हेतूने पालक मुलांना शाळेत पाठवत असतात. पण शाळेत अंदाधुंदी चालू असेल, तर चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण होणार असेल, तर पालकांनी काय करायचे? बदलापूरमधील या शाळेच्या विश्वासाला तडा गेला आहे. शाळेच्या प्रतिमेला डाग लागला आहे. बदलापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

बदलापूरमधील घटनेनंतर पोलिसांनी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यावर गेलेल्या पालकांना तासनतास बसवून ठेवले असेल तर तो अक्षम्य गुन्हा म्हटला पाहिजे. घटना घडल्यावर तब्बल बारा तासांनी एफआयआर नोंदवला गेला असेल तर तो पोलिसांचा अक्षम्य हलगर्जिपणा आहे. चौकशीत त्या शाळेत सीसीटीव्ही नव्हते, असे आढळले आहे, तो तर व्यवस्थापनाचा दोष आहे. बदलापूरमध्ये अतिशय संवेदनशील धक्कादायक घटना घडली याची कल्पना पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते यापैकी कुणालाच नव्हती याचे मोठे आश्चर्य वाटते. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी आणि श्रावणातील मंगळागौरीच्या दिवशी दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल न्याय मागण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर व रेल्वे मार्गावर येऊन आंदोलन करतात, हे पोलीस, प्रशासन व राज्यकर्त्यांना भूषणास्पद नाही. रेल्वे पोलीस आयुक्त, उल्हानगर येथील महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी किंवा राज्याचे एक मंत्रिमहोदय बदलापूरला जाऊन आंदोलकाना शांत करण्याचा प्रयत्न करतात व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करतात. पण त्याला आंदोलक प्रतिसाद देत नाहीत, हेच चित्र वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावरून संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. लोकांचा पोलीस-प्रशासनावर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. मुंबई व पुणे येथील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पुढे काय झाले हो, हे लोकांना चांगले कळते. बदलापूर घटनेत फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवू, आरोपीला कठोर शासन करू असे जरी सरकारच्या वतीने सांगण्यात येत असले तरी त्यावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.

म्हणूनच सरकारच्या वतीने एक मंत्रिमहोदय बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन ठिय्या मारलेल्या लोकांना आंदोलन मागे घ्या असे आवाहन करू लागले. तेव्हा जमावातून फाशी-फाशी अशाच वारंवार घोषणा दिल्या जात होत्या. काही संतप्त महिलांची तर त्या नराधमाला आमच्यासमोर फाशी द्या, अशी मागणी करण्यापर्यंत मजल गेली होती. दोषींना सोडणार नाही, असे सांगण्याची एक पद्धत झाली आहे, विरोधकांनी टीका केली की त्यांनी राजकारण करू नये, असे बजावले जाते. पण बदलापूरमध्ये जो प्रक्षोभ आणि आक्रोश प्रकट झाला, त्यामध्ये कुठेही, कोणत्याही राजकीय पक्षांचे फलक नव्हते किंवा झेंडे नव्हते. आंदोलकांनी शाळेत घुसून मोडतोड केली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पण आंदोलक हटायला तयार नव्हते. बदलापूरमध्ये जनआक्रोश प्रकटलेला बघायला मिळाला. निष्पाप चिमुरड्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल व समाज त्यांच्याकडे कसा बघेल हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. बदलापूरच्या घटनेनंतर प्रकट झालेला जनक्षोभ शांत करणे हे पोलीस-प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -