दोन चिमुरड्यांवरील बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद; बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन
पोलिसांचा लाठीमार, दगडफेकीची घटना
बदलापूर : बदलापूर पूर्व (Badlapur) येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आता पालकांचा उद्रेक पाहायला मिळाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापुरकर नागरिक रस्त्यावर उतरले. या दोन चिमुरडींना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल दहा तासापेक्षा अधिक काळ बदलापुर रेल्वे स्थानकांनी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केल्याने मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली. संपुर्ण बदलापूर बंदची हाक दिल्याने सोमवार सकाळपासून वातावरण तणावग्रस्त होते. विशेष म्हणजे हे प्रकरण आता इतके चिघळले की संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड केली. आरोपीला तात्काळ फाशी दया, ही आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार झाला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई झाली होती. त्याचा आक्रोश पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन करताना दिसला. सकाळी दहा वाजल्यापासून हे रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू असून यामुळे बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलक क्षणाक्षणाला आक्रमक होत असून आरोपीला आत्ताच भरचौकात फाशी द्या, अशी मागणी जोर धरू लागली होती.
Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार!
बदलापूरमध्ये नागरिक आंदोलनावर ठाम होते. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समाजावून सांगण्याचा आणि आंदोलन थांबवण्याचे आवाहन करत होते. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी पोलिसांकडून उदघोषणा करून सांगण्याचा प्रयत्न झाली की, ‘या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींचा खटला आपण फास्टट्रॅकमध्ये चालवणार आहोत. त्यासाठी सरकारी वकिलांची नेमणूकही करण्यात येणार आहे.’ परंतु, इतकं सांगूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे यावर ते ठाम असून ‘वुई वॉन्ट जस्टिस’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
पालकांचा उद्रेक, आंदोलनाला हिंसक वळण
संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे. शाळेनं माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या, जमाव आक्रमक
बदलापुरातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा कारवी, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. पण जमाव अद्याप पांगलेला नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.अशातच आता चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे.
मध्य रेल्वे विस्कळीत, तब्बल ३० लोकल रद्द
बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या ३० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लांबपल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. बदलापुरात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार घटनेच्या विरोधात हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले. सकाळी १० वाजल्यापासून हे आंदोलन सुरु असल्याने अंबरनाथच्या पुढे एकही लोकल जाऊ शकलेली नाही. रेल रोकोचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे.
Badlapur Crime : विरोधकांची संवेदना बोथट झाली; राजकीय पोळी भाजत राजकारण करणाऱ्यांवर फडणवीस भडकले
सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष लोकल सोडल्या जात आहेत. लोकल ट्रेन प्रमाणेच लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. अनेक रेल्वे ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. बदलापूर आंदोलनामुळे ३० मेल एक्सप्रेस आणि ३० लोकल सेवा वळवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे १२ मेल एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत. कोयना एक्सप्रेसचा मार्ग वळवण्यात आला असून बदलापुरहून कल्याणला आणण्यात येत आहे. बदलापूरनंतर दिवा आणि पनवेल मार्गे कर्जतकडे मार्गस्थ करण्यात आल्या आहेत.