उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचे सुरू आहे गलिच्छ राजकारण
मुंबई : बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. परंतु राज्यातल्या विरोधकांची संवेदना बोथट झाली असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलापूर अत्याचार (Badlapur Crime) घटनेप्रकरणी राजकारण करणाऱ्या विरोधकांवर केली आहे.
बदलापूर घटना प्रकरणाची (Badlapur Crime) केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचा शब्द याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळा कर्मचाऱ्यानेच हा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याविरोधात बदलापूरमध्ये नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूरमधील घटना निंदनीय असून शाळा कर्मचाऱ्याचे कृत्य निंदनीय आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असाच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. घटना उघडकीस आल्यानंतर जी जी कारवाई केली पाहिजे. जी कारवाई झाली पाहिजे, तशीच कारवाई सुरु आहे. या केसच्या तपासासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. परंतु, विरोधकांच्या मनात केवळ राजकारण असून संवेदना बोथट झालेल विरोधक आहेत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
विरोधी नेते अशा घटनांमध्ये राजकीय पोळी भाजतात. विरोधकांच्या मनात केवळ राजकारण आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी असे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे हे त्यांना शोभत नाही. ज्यावेळी अशा संवदेनशील घटना घडतात तेव्हा राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल, न्याय कसा देता येईल असे वागले पाहिजे. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचे असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
बदलापूरची घटना १३ ऑगस्टला घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ कारवाई सुरु झाली. या प्रकरणी कोणी दिरंगाई केली आहे का? त्याचा तपास केला जाईल. दिरंगाई करणाऱ्यांविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असून चौकशी जलदगतीने होणार आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.