‘चारचौघी’ आणि रोहिणी हट्टंगडी...!

राजरंग - राज चिंचणकर


नाटक, चित्रपट, मालिका आदी क्षेत्रांत ज्येष्ठ रंगकर्मी रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या अभिनयाची अमीट छाप उमटवली आहे. मालिकांच्या माध्यमातून तर त्या अगदी घराघरांत पोहोचल्या आहेत. रंगभूमीवरही त्यांनी स्वतःचे ठोस अस्तित्व कायम केले आहे. चित्रपटांतल्या त्यांच्या विविध भूमिका कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. देशभरात त्यांची ओळख ‘कस्तुरबा’ म्हणून अधिक असली, तरी महाराष्ट्रातल्या रसिकजनांना एक मराठी कलावंत म्हणून त्यांच्याविषयी प्रचंड आपलेपणा आहे. याच आठवड्यात राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे.


सध्या रोहिणी हट्टंगडी चर्चेत आहेत, त्या ‘चारचौघी’ या नाटकामुळे...! ३१ वर्षांपूर्वी ‘चारचौघी’ हे नाटक रंगभूमीवर आले होते आणि दोन वर्षांपूर्वी हेच नाटक पुन्हा एकदा नव्याने मराठी रंगभूमीवर आले. या नाटकात रोहिणी हट्टंगडी यांनी ‘आई’ची भूमिका अफलातून उभी केली. कणखरपणा, धीरोदात्तपणा आदी विभ्रम त्यांच्या या भूमिकेतून दृगोच्चर करत, ‘चारचौघी’तली ही आई त्यांनी रंगभूमीवर दमदारपणे ठसवली. गेल्या दोन वर्षांत या नाटकाने सव्वा तीनशेहून अधिक प्रयोगांची मजल मारली आणि या टप्प्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचताना या नाटकाने आता थांबण्याचे ठरवले आहे. या निमित्ताने रोहिणी हट्टंगडी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. ‘चारचौघी’ हे नाटक, त्यातली त्यांची भूमिका आणि आता नाटक बंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोगत व्यक्त करताना त्या म्हणतात, “आमचे नाटक ३१ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येऊन सुद्धा इतके छान सुरू आहे. त्यामुळे आता ते बंद होताना वाईट वाटणारच. या नाटकाच्या अानुषंगाने विचार करायचा तर, इतक्या वर्षांनंतरही समाजात काही बदल झाला आहे का, असा एक प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात सतत येत राहतो. या नाटकामुळे गेल्या दोन वर्षांत सगळ्यांशी छान मैत्री झालेली आहे. आमचा जमलेला मित्रपरिवार, नाटकाचा दोन वर्षांचा अनुभव, गावोगावी जाऊन आम्ही केलेली धमाल, नाटकाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद; हे सर्व आठवताना खूप समाधान वाटते. मी खूप वर्षांनंतर एक चांगले मराठी नाटक केले. त्यामुळे या नाटकाची आठवण कायमच राहील. मराठी नाटकाच्या बाबतीत म्हणायचे तर माझे ‘रथचक्र’ हे नाटक जास्त चालले होते. पण ते नाटक मला ‘गांधी’ या चित्रपटासाठी अर्ध्यावरच सोडावे लागले होते. त्यामुळे त्या नाटकाचे मी तसे कमी प्रयोग केले होते. पण ‘चारचौघी’चे आता ३३३ प्रयोग झाले आहेत. मी आतापर्यंत जी मराठी नाटके केली; त्यातला हा सर्वात मोठा आकडा आहे. हे नाटक बंद होत असले, तरी मी नाटक कधीच सोडणार नाही. नाटकाला माझे कायमच प्राधान्य असेल”.


बालरंगभूमीवर लोककलेचे प्रतिबिंब...!


रंगभूमीवर बालनाट्यांच्या माध्यमातून छोट्या मंडळींचे मनोरंजन होत असते. पण या मुलांची झेप केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, या मातीतल्या पारंपरिक कलेची ओळख मुलांना व्हावी, या उद्देशाने बालरंगभूमीवर आता लोककला अवतरणार आहेत. हे सर्व साध्य करण्यासाठी ‘बालरंगभूमी परिषद’ पुढे सरसावली आहे आणि त्यासाठी ‘जल्लोष लोककलेचा’ या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. साहजिकच, विविध प्रांतातल्या मुलांपर्यंत लोककला पोहोचण्यास यातून मदत होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रात २५ शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी १९ जिल्ह्यांत हा ‘लोककला महोत्सव’ होणार आहे. यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूर, अकोला, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने मिळून रंगणाऱ्या या उपक्रमाद्वारे मुलांवर लोककलेचे संस्कार घडवले जातील अशी आशा आहे. कारण केवळ मनोरंजनात्मक असे याचे स्वरुप नाही; तर या अंतर्गत सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी लोककला प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन सुरु आहे. लोप पावत चाललेल्या लोककलांविषयी, या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींकडून यात मुलांना माहिती देण्यात येत आहे, हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. लोककलांवर आधारित समूहनृत्य, एकलनृत्य, समूहगीत, एकलगीत व लोकवाद्य असे या महोत्सवाचे स्वरूप असल्याने मुलांना या निमित्ताने समग्र लोककलेचा परिचय होऊ शकेल.


महाराष्ट्रातली तब्बल २५ हजार मुले यात सहभागी होतील असे उद्दिष्ट बालरंगभूमी परिषदेने ठेवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, केवळ हा महोत्सव करूनच संबंधित मंडळी थांबणार नाहीत; तर मुलांसाठी पुढेही विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. या अंतर्गत, दिव्यांग मुलांसाठीच्या महोत्सवाचे नियोजनही सुरू आहे. त्याचबरोबर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनाचा समारोप ज्या रत्नागिरीत होणार आहे; तिथे संमेलनाचे पहिले तीन दिवस बालरंगभूमीला दिले जाणार असल्याची माहिती आहे. आता या सगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने एकूणच लोककलेला आणि बालरंगभूमीला नव्याने उर्जितावस्था प्राप्त होऊ शकेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Comments
Add Comment

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता

मराठी चित्रपटात नावीन्य हवे

युवराज अवसरमल नावीन्याचा ध्यास घेऊन नवीन कलाकृती दिग्दर्शित करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’

मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६

‘रणपति शिवराय : स्वारी आग्रा’, शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

मी मागे माझ्या एका लेखामधे म्हटले होते की, राज्यनाट्य स्पर्धेमधील काही नाटके व्यावसायिक दर्जाची असतातच. त्याला