केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद!
नवी दिल्ली : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commisssion) आज दुपारी ३ वाजता महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत आयोग जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त हरियाणा विधानसभा निवडणुकीचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. हरियाणामध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. आता तिथे ३ जागा रिक्त आहेत. तेथे भाजपचे ४१ आमदार, काँग्रेसचे २९ आमदार, जेजेपीचे १० आणि INLD आणि HLP चा एक आमदार आहे. तर पाच अपक्ष आमदार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या. मे २०२२ पर्यंत जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण ९० मतदारसंघ झाले आहेत. त्यात जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ विधानसभा आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८७ जागा होत्या. २०१९ साली कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. तर तेथील राजकीय पक्षांकडून राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे की, सुरुवातीला निवडणुका होतील, त्यानंतर राज्याचा दर्जा पुन्हा मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये तीन किंवा चार टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत सुरक्षेचं मोठं आव्हान असणार आहे. मागील काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याचा परिणाम निवडणुकीवरही दिसण्याची शक्यता आहे.