मुंबई: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका CAS ने फेटाळून लावली आहे. याचा अर्थ आता भारताच्या खात्यात रौप्य पदक येणार नाही. विनेश फोगाटचे वजन फायनल सामन्याआधी १०० ग्रॅम अधिक भरले होते. या कारणामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्या आले होते. यासंदर्भात तिने रौप्य पदक देण्यात यावे अशी याचिका केली होती. याचा निर्णय १६ ऑगस्टला सुनावला जाणार होता मात्र CAS ने त्याआधीच तिची याचिका फेटाळून लावली आहे.
यासंबंधी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तसेच या निर्णयाने त्यांनाही धक्का बसला आहे. विनेशने ७ ऑगस्टला रौप्य पदक मिळावे अशी याचिका केली होती. CAS ही मागणी स्वीकारलीही होती. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑगस्टला झाली. याच विनेशला चार वकिलांनी प्रतिनिधित्व केले आणि सोबतच भारताचे टॉप वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनाही मदतीसाठी पाठवण्यात आले होते.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आधीच स्पष्ट केले होते की ते विनेश फोगाट अथवा इतर कोणत्याही खेळाडूसाठी नियमांत बदल करण्याच्या बाजूने नाही. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनीही यासंबंधी हेच विधान जारी केले होते.
अपात्र ठरवल्यानंतर घेतली निवृत्ती
विनेश फोगाटने फायनल सामन्याआधी अपात्र घोषित झाल्यानंतर ८ ऑगस्टला कुस्तीतून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर ट्वीट करत लिहिले, आई कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ करा. तुमचे स्वप्न आणि माझे धैर्य तुटले आहे. माझ्यामध्ये आता अधिक हिंमत नाही. कुस्तीला माझा सलाम. माझे करिअर २००१-२०२४ पर्यंतच होते. दरम्यान, संपूर्ण देशाला आशा लागून होती की विनेशला रौप्य पदक दिले जाईल मात्र याचिका फेटाळल्याने भारतीयांच्या आशांना मोठा झटका बसला आहे.