उबाठा सेनेचे नेते व प्रवक्ते रोज काहीतरी बरळत असतात आणि जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपली सत्ता गमावली आहे, आपल्याला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे, चाळीस आमदार व अनेक खासदार आपल्यावर अविश्वास प्रकट करून आपल्याला सोडून गेले आहेत, याचे भान अजूनही पक्षप्रमुखांना नसावे याचेच आश्चर्य वाटते. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवून अडीच वर्षे झाली. गेल्या लोकसभेपेक्षा निम्मे निवडून आणताना उबाठा सेनेची यंदा दमछाक झाली. केंद्रात पुन्हा सलग तिसऱ्यांदा भाजपाप्रणीत सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधापदाची हॅटट्रीक संपादन केली. राज्यात महाआघाडीत सौदेबाजी करताना उबाठा सेनेला घाम फुटताना दिसतो आहे.
महाआघाडीत अजून जागा वाटपही झालेले नाही. तरीही पक्षप्रमुख मुख्यमंत्रीपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पक्षप्रमुखांनी नुकत्याच केलेल्या दिल्लीवारीत त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आपले नाव जाहीर करावे यासाठी त्यांची खटपट चालू आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसल्यामुळे त्याचे महत्त्व पक्षप्रमुखाना चांगले ठाऊक आहे. त्यांचे प्रवक्ते तर सकाळ-संध्याकाळ पक्षप्रमुखांना खूश करण्यासाठी तेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असे भाकीत वर्तवत आहेत. महाराष्ट्रात ठाकरे सरकार ०२ कारकिर्द सुरू होणार अशी पोपटपंची करीत आहेत. केंद्रात मोदी सरकार ०३ कारकिर्द सुरू झाली आहे. पण मोदी आणि ठाकरे यांची किंचित तरी तुलना होऊ शकते का? मोदींनी पंतप्रधानपदाच्या दोन टर्म यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. ठाकरे यांना अडीच वर्षांत बहुमत गमावल्याने सत्ता सोडून वर्षावरून मातोश्रीवर पळ काढावा लागला. कोविड काळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर केलेले काम अद्वितीय होते असे ते स्वत: सांगत असतात. कुटुंबप्रमुख अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती, असेही ते वारंवार बोलत असतात. मग राज्यात कोविड काळात दीड लाख बळी का पडले?
रेमडिसिव्हिअर इंजेक्शनचा काळाबाजार का झाला? ऑक्सिजनसाठी जनतेला वणवण का फिरावे लागले? सुरुवातीच्या काळात पंधरा-वीस रुपयांचा मास्क दीडशे रुपयाला का विकला गेला? कोविड उपचार केंद्रात जेवण-खाणाची कंत्राटे सग्यासोयऱ्यांना दिली. त्यात लुटमार कशी झाली? राज्याचा मुख्यमंत्री अडीच वर्षांत केवळ दोन वेळा मंत्रालयात जातो हे काय भूषणावह होते का? यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा, असे केवळ त्यांचे खूशमस्करेच म्हणू शकतात.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री तेच होणार, असे त्यांच्या पुढे-मागे करणाऱ्या प्रवक्तेच सांगत आहेत.
पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे या मागणीला काँग्रसने हिंग लावून प्रतिसाद दिला नाही. शरद पवारही त्यांनी एकदा केलेली चूक पुन्हा करणार नाहीत, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत असतात. मुळात निवडणुकीला महाआघाडी म्हणून सामोरे जायचे आहे, एकाचा चेहरा घेऊन नाही, असे काँग्रेसने पक्षप्रमुखांना बजावले आहे. लोकसभा निवडणूक ही दोन डझन विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिनाने भाजपाच्या विरोधात लढवली. तेव्हाही इंडियाने पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. मग राज्यातील विधानसभा निवडणुकीला महाआघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कशाला घोषित करील? लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनाचा उदारपणा दाखवून उबाठा सेनेला जास्त जागा दिल्या. पण उबाठाचा स्ट्राईक रेट कमी आहे. उबाठा सेनेची कामगिरी खराब आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कमी जागा लढवूनही त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही स्ट्राईक रेट चांगला आहे. उबाठा सेनेला यश कमी मिळाले, हे अजूनही पक्षप्रमुखांच्या लक्षात आलेले नसावे. आमचं ठरलेलं आहे, महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पक्षप्रमुखच असतील व विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे ०२ सरकार येईल हे उबाठाच्या नेते व प्रवक्त्यांचे स्वप्नरंजन आहे. पक्षातून आणखी पडझड होऊ नये म्हणून अशा पुड्या प्रवक्ते सोडत असावेत. महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार उबाठाचे पक्षप्रमुख असतील असे ठरले असेल तर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा सेना यांनी संयुक्तपणे तसे जाहीर करायला हवे. पक्षप्रमुखांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची कोणाला घाई झाली आहे, त्यासाठी कोण उतावीळ झाले आहे?
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी-शहा व अन्य भाजपाचे नेते सर्वत्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार येणार असे सांगत होते तेव्हा कधी पक्षप्रमुखांनी आक्षेप घेतला नाही मात्र निकाल लागल्यानंतर अमित शहा यांनी आपल्याला मातोश्रीवर मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते असा टाहो फोडला. काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांची अगतिगता वेळीच ओळखली. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होता कामा नयेत म्हणून त्यांनी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या आसनावर बसवले. भाजपा नको हेच त्यामागचे प्रमुख कारण होते. आता शरद पवार किंवा राहुल गांधी हे ठाकरे यांना पुन्हा घोड्यावर बसवतील का? पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलेच तर महाआघाडीचा पराभव अटळ आहेच, पण आघाडीच्या बहुसंख्य उमेदवारांच्या अनामत रकमाही कोणी वाचवू शकणार नाही. खिशात नाही दाणा, नि मला बाजीराव म्हणा, अशी उबाठा आहे.