Tuesday, September 30, 2025

चिमणी झाली बेघर

चिमणी झाली बेघर

कथा - रमेश तांबे

एक होती चिमणी. एकदा तिला खूप भूक लागली. पण तिला घरट्याच्या बाहेर पडायचे नव्हते. कारण ती खूपच आळशी बनली होती. ती आपल्या छानशा घरट्यात बसूनच आल्या गेलेल्यांकडे खायला मागायची. असे अनेक दिवस सुरू होते. एकदा भुकेमुळे ती कासावीस झाली होती. पण ती काही अन्न शोधायला बाहेर पडली नाही. तिच्या शेजारच्या फांदीवरच एक कावळा बसला होता. चिमणी त्या कावळ्याला म्हणाली,

कावळे दादा कावळे दादा थोडेसे धान्य द्या ना मला माझ्या घरट्यात घेईन तुम्हाला! चिमणीचे बोल ऐकून कावळा खूश झाला. तो चिमणीच्या घरट्यात शिरला आणि म्हणाला, चिऊताई चिऊताई हा घे तुला बाजरीचा दाणा दे मला तू घरट्यात जागा! मग चिऊताईने तो बाजरीचा दाणा पटपट खाल्ला. पण त्यामुळे चिऊताईला आणखीनच भूक लागली. ती घरट्याच्या बाहेर डोकावू लागली. तेवढ्यात तिला दिसली मैना. ती मैनेला म्हणाली,

मैनाताई मैनाताई थोडेसे धान्य द्या ना मला माझ्या घरट्यात घेईन तुम्हाला ! चिमणीचे बोल ऐकून मैना खूश झाली. कारण तिला राहायला घरटे मिळणार होते. आता ती चिमणीच्या घरट्यात शिरली. तिथे छान बसायला जागा होती. हवा उबदार होती. ती आनंदाने म्हणाली, चिऊताई चिऊताई हा घे तुला गव्हाचा दाणा दे मला तू घरट्यात जागा! मग चिऊताईने तो गव्हाचा दाणा पटपट खाल्ला. पण त्यामुळे चिऊताईला आणखीनच भूक लागली. ती पुन्हा घरट्याच्या बाहेर डोकावू लागली. तेवढ्यात तिला दिसला पोपट. ती पोपटाला म्हणाली,

पोपटराव पोपटराव थोडेसे धान्य द्या ना मला माझ्या घरट्यात घेईन तुम्हाला! चिमणीचे बोल ऐकून पोपटराव खूश झाले. ते थेट चिमणीच्या घरट्यात शिरले आणि म्हणाले, चिऊताई चिऊताई हा घे तुला मक्याचा दाणा दे मला तू घरट्यात जागा!

पण एकेक दाणा खाऊन चिमणीचे पोट काही भरेना. तिची भूक अधिकच वाढत गेली. मग ती येणाऱ्या-जाणाऱ्या सगळ्या पक्ष्यांना विचारू लागली. एका एका दाण्याच्या बदल्यात ती त्यांना घरट्यात घेऊ लागली. कबुतर आले, साळुंकी आली, घार आली. चिमणीचे घरटे पक्ष्यांंनी अगदी भरून गेले. भुकेच्या नादात चिमणीच्या लक्षातच आले नाही की, आता घरट्यात आपल्यालाच बसायला जागा नाही. सगळे पक्षी मजा करत होते. कोण झोपलंय, कोण लोळतंय, तर कोण मस्त खेेळतंंय आणि घरट्याची मालकीण चिमणी मात्र कितीतरी वेळ बाहेरच! शेवटी चिमणी ओरडून म्हणाली, “एका दाण्याच्या बदल्यात तुम्ही सारेजण घरट्यात शिरलात. आता मलाच बसायला जागा नाही.” पण चिऊताईचे बोलणे ऐकून सारे तिलाच हसले अन् म्हणाले, “चिऊताई एका दाण्याच्या बदल्यात तूच आम्हाला घरट्यात घेतलेस. आता हेच आमचे घर. आम्ही कुठेही जाणार नाही.” शेवटी चिमणीलाच घरटे सोडावे लागले. काही दाण्यांच्या बदल्यात आपण आपले घर गमावले याचा तिला नंतर पश्चाताप झाला. पण काय करणार आता घरटे असूनही ती बेघर झाली. तिने भविष्यात काय घडेल याचा नीट विचार केला नाही. याची तिला शिक्षा मिळाली होती. पुढे अनेक वर्षे असेच घडत गेले. कारण चिमणीच्या अनुभवातून कुणीच धडा घेतला नाही!

Comments
Add Comment