ऑलिम्पिकच्या गुणतक्त्यामध्ये १४४ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशाची अद्यापि कामगिरी फारशी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होऊन अनेक दिवस लोटले तरी भारताच्या खात्यात सुवर्णपदक अद्यापी जमा झालेले नाही. एक रौप्य पदक व चार कांस्यपदक हीच भारताची आतापर्यंतची पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरी राहिलेली आहे. सांघिक बाबतीत हॉकी खेळामध्ये भारताला कांस्य पदक मिळाले आहे.
भारताचा ‘अव्वल’ भालाफेकपटूने नीरज चोप्रावर तमाम भारतवासीयांची सुवर्णपदक मिळविणारच, असा आशावादच नाही तर खात्री व्यक्त केली जात होती, त्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भारताची सुवर्णपदकाची तहान नीरज भागविणारच, असा दावाही भारतवासीयांकडून करण्यात येत होता. नीरज चोप्राने मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या. नीरज चोप्राने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. नीरज चोप्राचा हा या हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो ठरलेला. यामुळे भारतातील कोट्यवधी चाहत्यांच्या आशा नीरज चोप्राकडून होत्या. भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात होती.
अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.२९ मीटर थ्रो टाकला. अर्शद नदीमने टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. नीरज चोप्राचा दुसरा थ्रो ८९.४५ मीटर होता, त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्याने बाद ठरले. यामुळे नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. ज्या चोप्राकडून आपण सुवर्णपदकाची आशा बाळगली होती, त्यालाच रौप्य पदक मिळाल्याने भारताला यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळेल की नाही याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एखाद् दुसरा चमत्कार घडला तरच भारताला सुवर्णपदक मिळेल, अन्य अजून एखादे कांस्य-रौप्य पदक मिळवत भारताच्या ऑलिम्पिक चमूला पॅरिसमधून भारतात यावे लागणार आहे. भारतात क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटचा अपवाद वगळता अन्य खेळ फारसे खेळले जात नाहीत. हॉकी, फुटबॉल, टेनिस यांसारख्या मोजक्या खेळामध्ये भारतीय खेळताना दिसत असले तरी या व अन्य खेळांकडे भारतीयांचा फारसा कल झुकलेला आजही पाहावयास मिळत नाही. हॉकी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे, हे आपल्याकडील नवीन क्रीडापटूंना फारसे कदाचित माहीतही नसेल. एकेकाळी हॉकी या खेळामध्ये भारताचा जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात नावलौकिक होता. विविध ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीमध्ये भारताला सुवर्णपदकही मिळालेले आहे. कालांतराने या खेळामध्ये अन्य देशांनी प्रगती केली व भारताची पिछेहाट होत गेली. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते आणि आता सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली. भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी पार पडलेल्या सामन्यात कांस्य पदकाच्या लढतीमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग याने केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारताने कांस्य पदकावर नाव कोरले. त्याअगोदर महाराष्ट्राला भूषणावह अशी कामगिरी स्वप्नील कुसळेंनी केली होती. कोल्हापूरच्या मातीतील स्वप्नील कुसळे याने भारताला नेमबाजीच्या प्रकारामध्ये कांस्यपदक मिळवून दिले. भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नील पूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.
भारताला १९५२ साली कुस्ती खेळामध्ये कांस्यपदक मिळवून देणारे खाशाबा जाधवही हे महाराष्ट्राचेच, विशेषत: तेही कोल्हापूरचेच होते. त्या घटनेला तब्बल ७२ वर्षे लोटल्यावर महाराष्ट्राला भूषणावह वाटेल अशी कामगिरी कोल्हापूरकर स्वप्नील कुसळेंनी करून दाखविली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर या २२ वर्षीय मुलीचा उल्लेख हा सन्मानानेच करावा लागणार आहे. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक जिंकून भारताचे पदकांचे खाते उघडले आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकनंतर देशासाठी पहिले पदक जिंकले. या विजयामुळे तिला २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमधील निराशा भरून काढण्यास मदत झाली. मनू भाकर आणि सरबज्योत सिंगने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांचा १६-१० असा पराभव केला. यासह मनू भाकरने इतिहास रचला आहे.
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. मनूला पूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडू सोबत एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकता आली नव्हती. भारताच्या चार कांस्य व एक रौप्य पदक खात्यात जमा असले तरी काही कटू आठवणीही पॅरिस ऑलिम्पिकमुळे भारतीयांना विसरता न येणाऱ्या आहेत. भारताची कुस्तीगीरपटू विनेश फोगाट यांना कुस्तीच्या ५० किलो वजनी गटामध्ये अंतिम स्पर्धेमध्ये केवळ १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविला गेला आहे. याविरोधात भारतामध्ये नाराजीचा व संतापाचा सूर आळविला जात आहे. विनेश फोगाटला तमाम देशवासीयांची सहानुभूती प्राप्त झाली आहे.