साओ पाऊलो : ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे एक विमान या भागात कोसळल्याचे (Plane crashed) वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी ग्लोबोन्यूजने दिले आहे. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचे एटीआर-७२ हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होते. साओ पाऊलो राज्य अग्निशमन दलाने समाजमाध्यमांद्वारे या वृत्ताची पुष्टी केली आहे. विमान ज्या भागात कोसळले तिथे अग्निशमन दलाची पथकं व बचाव पथकं रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, एअरलाईन कंपनी वोपासने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी विमान अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, या विमानात एकूण ५८ प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारीदेखील या विमानात होते. परंतु ही विमान दुर्घटना कशामुळे झाली ते कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
दुपारी १.३० च्या सुमारास विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. काही वेळाने थेट विमान कोसळल्याची माहिती मिळाली.
ग्लोबोन्यूजने एका रहिवासी भागाजवळ पेटलेले विमान कोसळत असल्याचा एक व्हिडीओ जारी केला आहे. व्हिडीओत दिसतंय की जंगल असलेल्या भागात विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन काळा धूर सर्वत्र पसरला.
दरम्यान, दक्षिण ब्राझीलमधील एका कार्यक्रमात ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी या विमान अपघाताचे वृत्त सांगत शोक व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमातून त्यांनी विमान अपघातात दगावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली.