Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखबांगलादेश पुन्हा अस्थिरतेकडे...

बांगलादेश पुन्हा अस्थिरतेकडे…

बांगलादेशातील परिस्थिती आता आटोक्याबाहेर गेली असून आरक्षणाच्या प्रश्नावरून पेटलेले राजकारण पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा घेऊनच शांत होणार असे दिसते. कारण शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर पकडला असतानाच त्यांच्या हातात कसलीही परिस्थिती राहिलेली नाही असे समोर आले आहे. बांगलादेशाच्या लष्करप्रमुखांनी शेख हसीना यांना अल्टीमेटम दिला असून त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान हसीना यांनी ४५ मिनिटांच्या आत देश सोडावा. पण शेख हसीना कुठे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशात हसीना सरकार आता कोसळल्यात जमा आहे आणि नवे सरकार सत्तारूढ होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटलेली ही आग बांगलादेशात नियंत्रणाबाहेर गेली आहे. लष्करानेच अल्टिमेटम दिल्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. वृत्तांच्या अहवालानुसार त्यांनी देशही सोडला आहे. त्या फिनलंडला गेल्याची बातमी आहे. आरक्षणाच्या आगीत पुन्हा एकदा बांगलादेश होरपळला गेला आहे. काल तर बांगलादेशातील ९१ लोक ठार झाले होते. जागोजागी लोकांनी आंदोलकानी हिंसक निदर्शने केली आणि कित्येकांना रस्त्यावर आणून ठार मारले. शेख हसीना भारतात येण्याच्या तयारीत असल्याचे एक वृत्त आहे. बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन आता आणखी तीव्र झाले असून शेख हसीना यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना भारतात येण्यास निघाल्या असल्याचे वृत्त आहे. लाखो आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानाकडे निघाल्याने त्यांना भारतात येण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही असेही सांगण्यात आले.

बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तांनुसार, अनेक ठिकाणी आंदोलक आणि बांगलादेशी पोलिसांमध्ये चकमकी झाल्या आहेत आणि त्यात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. आरक्षणाच्या या आंदोलनात आणि विशेषतः शेख हसीना यांच्या विरोधात ४ लाख आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत असे चित्र दिसत आहे. बांगलादेश प्रथमपासूनच अशांत देश म्हणूनच लौकिक प्राप्त करून आहे आणि येथे कधीही लोकशाही नांदली नाही. आताही तेथे माजी लष्करप्रमुख यांनी शेख हसीना यांना रस्त्यावरून सैनिकांना हटवण्यास सांगितले तेव्हाच बांगलादेशातील राजकारण कुठे जाणार हे स्पष्ट झाले होते आणि शेख हसीना यांच्या कारकिर्दीचा शेवट जवळ आला आहे हे स्पष्ट झाले होते. रविवारी बांगलादेशात हिंसक निदर्शने करणाऱ्या आणि सत्तारूढ अवामी लीग विरोधात जोरदार चकमकी झाल्यावर त्यांच्यात संघर्ष समोर आला होता. बांगलादेशचे माजी लष्करप्रमुख इक्बाल करीम भुईया यांनी म्हटले आहे की, आम्ही सरकारला सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राजकीय पुढाकार घेण्याचे आवाहन करत आहोत.

दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. पंतप्रधान शेख हसीनाच निघून गेल्याने तेथे अंतरीम सरकार स्थापन करण्यात आले आहे. हसीना यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन पेटले होते आणि त्यात भरपूर हिंसाचार झाला होता. हसीना यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांनी देशातून पळ काढला आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा प्रश्न सुटणार की नाही हे माहीत नसले तरीही देशातील काही काळ तप्त वातावरण थंड होण्यास मदत होणार आहे. शेख हसीना आंदोलकांना उद्देशून एक निवेदनही जारी करणार होत्या. पण सुमारे सव्वालाख आंदोलक त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले असल्याच्या बातमीने त्यांना हा बेत रद्द करावा लागला. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमून जोरदार हिंसक निदर्शने केली आणि घोषणाही दिल्या. शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी झाला. त्यांनी देशाच्या दहाव्या पंतप्रधान म्हणून काम केले. १९९६ पासून ते जुलै २००१ पर्यंत त्या पंतप्रधान होत्या. बंगाली राजकारणी आणि अवामी लीगच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म पूर्व पाकिस्तानात झाला. पाच वेळा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून राहिल्या आहेत. त्या बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबूर रहेमान यांच्या कन्या आहेत. आपल्या वडिलांच्या सहकारी म्हणून त्यांनी काम केले.

शेख हसीना यांच्या वडिलांची १५ ऑगस्ट १९७५ रोजी हत्या झाली आणि त्यानंतर शेख हसीना पूर्णवेळ राजकारणात आल्या. लोकशाहीच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या म्हणून मानल्या जातात आणि त्यांच्या या आंदोलनांमुळे अनेकवेळा त्यांना हाऊस अरेस्ट खाली जावे लागले आहे. १६ वर्षांनंतर जेव्हा प्रथमच बांगलादेशात मुक्त वातावरणात निवडणुका पार पडल्या तेव्हा शेख हसीना संसदेत बहुमत मिळवू शकल्या नाहीत. सत्ता त्यांच्या प्रतिस्पर्धी बेगम खलिदा झिया यांच्याकडे गेली. पण त्यानतंर या दोघी राजकारणात कायमच्या शत्रू झाल्या. पुन्हा बांगलादेश त्याच संकटात सापडला आहे आणि त्यांच्या सरकारला विरोध करणाऱ्या निदर्शनामुळे बांगलादेश एका अजब पेचात सापडला आहे. जॉब कोटा सिस्टीमला विरोध केल्यामुळे बांगलादेशात सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला असून त्यात ३०० जणांची आहुती पडली आहे. सध्या या चळवळीला जोरदार पाठिंबा मिळत आहे आणि हा शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनास जबाबदार आहे. देशात आता राजकीय अस्थैर्य येण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा बांगलादेशचे शत्रू पाकिस्तानला उठवण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -