राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्या दाव्यांवर संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची खात्री पटवणारे आरोप सचिन वाझे याने केले आहेत. सध्या तुरुंगात असलेला सचिन वाझेने म्हटले आहे की, देशमुख हे आपल्या पीएमार्फत पैसे घ्यायचे आणि त्याचे पुरावेदेखील सीबीआयकडे असल्याचा वाझे याने खळबळजनक आरोप केल्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सचिन वाझे हे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या जवळचे होते. त्यांच्या म्हणण्याला अर्थ आहे, त्यांच्या आरोपांनाही अर्थ आहे; पण केवळ एका व्यक्तीने केलेले आरोप एवढ्यावर हे प्रकरण संपवता येणार नाही. सचिन वाझे याने आताच केलेले आरोप हे साधेसुधे नाहीत, तर ते एक पोलीस अधिकारी राहिलेल्याने महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर केलेले आरोप आहेत, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यायला हवे. हे मुळात सारे प्रकरण महाविकास आघाडीच्या काळातील आहे. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या आपल्या खास शिफारशीने सचिन वाझेला महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी बनवले होते. सचिन वाझे हा अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात आरोपी आहे. त्याच्या आरोपांना महत्त्व आहे. सचिन वाझे म्हणतो की, “गृहमंत्री देशमुख त्यांच्याबद्दलचे पुरावे सीबीयकडे आहेत आणि आपण कधीही नार्को टेस्टला तयार आहोत. वाझेच्या म्हणण्याला निश्चित महत्त्व आहे आणि सरकारने त्या दृष्टीने आता तपास करावा म्हणजे यातून ‘दूध का दूध आणि पानी का पानी बाहेर येईल’ हेच खरे…!” वाझे पुढे म्हणतो की, “मी देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे आणि यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे आणि हे साहजिक आहे. भाजपा नेते देशमुख यांच्यावर संतापणार, हे उघड आहे; कारण देशमुख हे आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवावी, यात काही नवल नाही; पण यावरून राज्याच्या राजकारणात ठाकरे यांच्या काळात किती घाणेरडे राजकारण खेळले जात असेल आणि तेही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून केले जात आहे, याचे प्रत्यंतर पुन्हा आले आहे.
देशमुख यांनी नुकतेच फडणवीसांवर गलिच्छ आरोप केले होते, त्यांना सचिन वाझेच्या उत्तराने परस्परच उत्तर मिळाले आहे. देशमुख यांच्या आरोपांनी राज्यातील वातावरण तापले होते आणे वेगवेगळे पक्ष आपल्या भूमिका घेत होते; पण सचिन वाझेच्या खुलाशाने आणि केलेल्या आरोपांनी देशमुख यांचे तोंड तर फोडले आहेच; पण देशमुख यांच्या खंडणी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपा नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे, त्यांच्या प्रतिक्रियांना तितकेसे महत्त्व दिले गेले नाही, तरीही देशमुख यांच्या आरोपांनतर जो काही गदारोळ उठला आहे, तो महत्त्वाचा आहे. कारण कोविडच्या काळात घडलेला हा प्रकार आहे. या काळात कोविडचा आडोसा घेऊन, सरकार काय भयंकर प्रकार करत असेल, याची चुणूक यांमुळे दाखवून दिली आहे.
सचिन वाझेला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता, त्यामुळे सचिन वाझेच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याचे काम कुणी केले आणि मनसुख हिरेनची हत्या कुणी केली याचा तपास लावण्यासाठी आता या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी झाली पाहिजे. या भाजपाच्या मागणीत तथ्य आहे. चौकशी केल्यामुळे अनेक बाबी उघड होणार आहेत, त्यामुळे या चौकशीतूनच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याचे काम कुणी केले आणि मनसुख हिरेन याची हत्या कुणी केली याचा तपास लागणार आहे, त्यामुळे सचिन वाझेच्या म्हणण्याची पूर्ण चौकशी होऊन, खरे काय ते समोर आलेच पाहिजे; कारण यातच राज्याचे हित आहे.
भाजपा नेत्यांच्या आरोपांमध्ये एक बाब मात्र लक्षणीय आहे आणि ती म्हणजे आरोपांचे सातत्य. ज्याप्रमाणे सचिन वाझे म्हणतो की, माझी नार्को टेस्ट करा, त्याप्रमाणे देशमुखांवर सचिन वाझेने केलेल्या आरोपांमुळे तत्कालीन सरकारचा आणि देशमुख यांचा बुरखा टराटरा फाटला आहे. ठाकरे यांचे सरकार असताना पैसे मागितले जात होते आणि ते सचिन वाझेच्या आरोपांनी पुरेपूर उघड झाले आहे, हे सत्य समोर आले आहे. तत्कालीन ठाकरे यांचे सरकार किती गलिच्छ होते आणि किती बरबटलेले होते याचे पुरावेच समोर आले आहेत. ठाकरे यांचे सरकार सत्तेत असताना सारा अंदाधुद कारभार होता आणि प्रत्येक कामासाठी पैसे मागितले जात होते, याचे पुरावेच समोर आले आहेत. सचिन वाझेच्या आरोपांनी या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. आता या प्रकरणाची सर्व तपशीलवार चर्चा झाली पाहिजे म्हणजे यातील नक्की काय ते जनतेला कळेल आणि या प्रकरणातील खरे पडद्यामागील चेहरे समोर येतील. तत्कालीन शिवसेनेचे (ठाकरे गट) सरकार किती किळसवाणे होते आणि बरबटलेले होते हे समोर आलेच आहे. आता त्यावर चौकशीने संपूर्ण शिक्कामोर्तब करावे. ठाकरे यांचे सरकार किती पाताळयंत्री होते, याचे कित्येक पुरावे आहेत, आता हा यातील आणखी एक पुरावा आहे.