‘मन’ नाजूकशी मोती माळ

Share

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

मनाचा अभ्यास म्हटला की, पहिला आठवतो तो फ्राॅईड. मानसशास्त्राचे सखोल पृथक्करण करणारा मनोतज्ज्ञ म्हणून त्याचे सिद्धांत आपण अभ्यासतो, तेव्हा १९व्या शतकात मनाचा इतका सूक्ष्म विचार इतक्या विस्तृत पातळीवर कुणी करून ठेवला असेल, असे वाटत नाही. जागरूक मन (चेतन मन), अचेतन मन आणि अवचेतन मन असे तीन भाग पाडल्यावर जाणिवा निर्माण करणाऱ्या जागरूक मनाबाबत आपण लिहितो, बोलतो, संवादतो. जगभरातील ८० टक्के साहित्य हे जागरूक मनाशी संबंधित आहे. चं. प्र. देशपांडे देखील ‘मन’ या एकल नाट्यातून नीळकंठ या पात्राच्या तोंडून जगण्यासंबंधीचे अनेक प्रश्न मांडतात. या प्रश्नांद्वारे जागरूक मनाच्या अनेक अवस्थांची उकल होता होता एका व्यक्तीच्या जीवनाचा आकृतिबंध आपल्या समोर उभा राहतो. चं. प्रं.च्या नाटकांबाबत नेहमी हेच गूढ कायम राहिले आहे.

त्यांना खूप काहीसे सांगायचे असावे, असा संशय समीक्षकांना येत असावा आणि मग या लिखाणावर व्यक्त होणारा प्रत्येक भाष्यकार स्वतःची व्याख्या (इंटरप्रिटेशन) मांडत राहतो. चं. प्र. ना खरंच असे काही सैद्धांतिक मांडायचे आहे का? फ्राॅईडच्या आडून एखाद्या नव्या मनःसत्याचा आविष्कार सादर करायचा का? किंवा जागरूक मनाच्या अवस्था मर्यादित स्वरुपात सादर केल्यास, त्या अधिक प्रभावाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात का? तर अशा प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा नीळकंठ या पात्राचा वयाच्या दोन टप्प्यांवर स्वतःच्या जगण्याबाबतचा दृष्टिकोन, एवढाच त्यातून अर्थ निघू शकतो, असे माझे निरीक्षण सांगते. नीळकंठ त्याच्या सोशिओ इकाॅनाॅमिक (सामाजिक अर्थशास्त्र) व कौटुंबिक चढ-उतारांबाबत बोलताना आढळतो. त्याचे मन या दोन्ही विषयांबाबत कायम इंटिमेट पद्धतीने थेट प्रश्न उपस्थित करत राहते आणि त्यामुळेच प्रेक्षक त्या प्रश्नांना स्वतःशी रिलेट करू पहातात. मग साऱ्या आविष्काराची स्पेस फक्त आणि फक्त निळकंठाच्याच मनाची होऊन जाते म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे चं. प्र. ना या ‘मनातून’ फार काही सैद्धांतिक वगैरे मांडायचे नसावे. तसे असते तर सामाजिक, आर्थिक तथा कौटुंबिक मुद्द्यांनुसार त्यांनी शारीरिक मुद्दा का मांडला नाही? मनाच्या दुर्बिणीतून ते जेव्हा या तिनही मुद्द्यांकडे पाहतात, अशावेळी नीळकंठाचे शरीर हे मनाशी निगडित नाही का? उलट शारीरिक क्रियांचा मनाच्या अवस्थेशी गहिरा संबंध जोडला गेला आहे, असे फ्राॅईड सांगतोच की…!

उदाहरणार्थ, नीळकंठाची एखाद्या व्यक्तीशी आलेल्या शरीर संबंधाची जाणीव आर्थिक, सामाजिक किंवा कौटुंबिक मनोविश्लेषणापेक्षा अधिक गडद होऊ शकली असती; परंतु एकंदर नाट्याचा परिवेश पाहता चं. प्र. ना त्या वाटेला जायचेच नाही, असे नीळकंठाच्या एकंदर व्यक्त होण्यातून जाणवत राहते. समाजरचनेच्या आधाराने बायकोचा उल्लेख व संदर्भ जरूर येतो; परंतु तो कौटुंबिक बांधिलकी व्यक्त करण्याच्या उद्देशाने, शरीरधर्माच्या दृष्टिकोनातून नाही. त्यामुळे नीळकंठाचे मन जाणिवेपर्यंतच सीमित आहे, हे अधोरेखित होते. नेणिवांचा त्यास लवलेशही नाही. आत्मरुपी, परमात्म्य, अद्वैत सिद्धांत, अाध्यात्मिक चिंतन आदी संज्ञांच्या वाटेला नीळकंठाची नेणीव जात नाही म्हणूनच व्यावहारिक जगाने वाढून ठेवलेले विष प्राशन करूनही जगायची धडपड करणारा नीळकंठ कुठेही क्लिष्ट वाटत नाही. आरंभ ते अंततः नीळकंठ कळतो, आकळतो आणि साकळतो सुद्धा…!

मी एखादे नाटक बघतो, ते मनापासून आवडते. मग मी त्यावर व्यक्त होतो. अगदी जाणून-बुजून नाही, तर समाज माध्यमावरील माझ्या स्पेसमध्ये माझी जी काही बरी वाईट रिअॅक्शन आहे, ती लिहून काढतो. मला शब्द मर्यादांचे भान नसते अथवा त्या केवळ नाटकाबाबतचे काहीही (अगदी वैचारिक सुद्धा) माझ्या लिखाणातून मी जगासमोर आणतो. आता नाटक बघणे ते त्यावर लिहिणे या मधल्या प्रवासात माझ्या मनाला ज्या जाणिवांनी घेरले होते, त्या मोकळ्या होतात. तेच जर एखाद्या अदृश्य शक्तीच्या अंमलाने मी हे लिखाण करतोय, असा समज मला ‘नेणिवे’कडे घेऊन जातो. मन बघताना, नीळकंठाचे जे जसे आहे, तसे मी तुमच्या समोर मांडतोय आणि केवळ मांडतोय…! त्यासाठी जजमेंटल होण्याची गरज नाही, मांडणीच्या प्रोसेसचा तो एक भाग समजावा बस इतका सोपा या नाटकाचा पट मला वाटतो.

हे नाटक सादरीकरणासाठी निवडणं यातच अभिजित झुंजाररावच्या दिग्दर्शकीय प्रगल्भतेची बाजू कळून चुकते. सातत्याने मुख्य पात्राकरवी रंगमंच खेळता ठेवण्याची पद्धत सैरभैर विचारांच्या पात्राशी पूर्णतः तर्कसंगत आहे. काही काही मूव्हमेंट्स तर इतक्या लाजवाब आहेत की, त्यावर सेपरेटली लिहावे लागेल. नीळकंठच्या वयोमानाच्या बदलाचा प्रसंग तर विशेष लक्षात राहण्याजोगा वठलाय आणि त्यास शाम चव्हाणची प्रकाशयोजना अत्यंत पूरक ठरलीय, केवळ सुरुवातीचा मेणबत्तीसाठी लाल रंगाच्या प्रकाशाचा केलेला वापर सोडल्यास संपूर्ण नाटक टंगस्टन सोर्सच्या इंटेंसिटीवर खेळण्याचा प्रयोग पाहिला आणि दिलीप कोल्हटकरांची आठवण झाली. त्यांनी विजयाबाईंच्या आणि एक-दोन नाटकांना एकही रंग न वापरता प्रकाशयोजना केली होती. आजच्या नव्या पिढीने शाम चव्हाण, अभिजित झुंजारराव, उल्लेश खंदारे आणि सुमित पाटील या नव्या दमाच्या पिढीकडून बरंच काही शिकावं असं हे ‘मन’ आहे. आणि सरते शेवटी रमेश वाणीशिवाय हे ‘मन’ भरून येत नाही, कदाचित येणारही नाही. आजवरच्या त्यांच्या नाटकातील विनोदी आणि मालिकांमधून सादर होणाऱ्या भूमिकांपेक्षा फारच अफाट आणि रमेश वाणींच्या संपूर्ण कारकिर्दीला अधोरेखित करणारी ही नीळकंठाची भूमिका आहे.

दिग्दर्शकाने दिशा दाखवल्यानंतर दोन पावले पुढे गेल्याने, रंगमंच होल्ड करण्याची ताकद रमेश वाणी आणि अभिजित झुंजाररावने दाखवून दिलीय. कृष्णा-देवा यांचे संगीत आणि प्रभाकर मठपती यांचे गीतही या एकूण रसायनात विरघळून गेले आहे. फक्त नेपथ्य ही एकच अशी बाजू की, जी इतर तांत्रिक अंगांप्रमाणे एकजीव झालेली नाही. या नाटकातील नेपथ्यासाठी वापरात आणले गेलेले एलिमेंट्स नकळत जड झाले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक प्रसंगात मणामणाने आदळत राहते. सूचक व कल्पक नेपथ्य असूनही ते स्वतःची भूमिका मांडण्यात कमी पडते, असे माझे निरीक्षण सांगते. न उमगलेल्या माझ्या आयुष्याच्या प्रश्नांना मनाने कसं सामोरं जायचं? यांचे पोस्टमार्टेम वगैरे न करता चं. प्र.नी मांडलेला धांडोळा ‘मनाने मनोराज्य’ करतो, यात शंकाच नाही.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

16 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

17 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

24 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

28 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

36 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

39 minutes ago