नाट्यक्षेत्रात अनेक घटना घडत असतात. काही घटनांतून माणुसकी पणाला लागलेली दिसते; तर काही घटनांतून संवेदनशीलतेचे उदाहरण कायम होते. मराठी रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवलेले दिग्दर्शक व अभिनेते हेमंत भालेकर यांच्या बाबतीत एका नाटकाच्या निमित्ताने अशीच एक घटना घडली. एका नाटकाच्या दौऱ्यावरून परतताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. काही दुखापतींवर सर्व निभावले, तरी त्यानंतर नाटक सोडून नोकरी करण्याच्या ते विचारात होते. पण त्याचवेळी नाट्यव्यवस्थापक विजय पांचाळ हे त्यांच्या निर्मात्यांना घेऊन, हेमंत भालेकर यांच्या घरी आले आणि या भेटीने जादू घडवली. हेमंत भालेकर यांना नोकरीचा विचार बदलावा लागला आणि ते पुन्हा रंगभूमीवर सक्रिय झाले.
पण एकदा एक धक्कादायक बातमी त्यांच्या कानांवर आली आणि ती म्हणजे विजय पांचाळ यांना कॅन्सरचे निदान झाले होते. ही घटना सांगताना हेमंत भालेकर भावनाविवश होत म्हणतात, “विजयच्या आजाराची बातमी कळल्यावर, मी त्याच्या घरी गेलो. त्याची विचारपूस केल्यावर, त्याने त्याला कॅन्सर असल्याचे सांगत फार तर सहा महिन्यांचा काळ हाताशी असल्याचे सांगितले. पण पुढे विजयने एक इच्छा व्यक्त केली की, त्याला आवडलेले एक नाटक त्याला व्यावसायिक रंगभूमीवर आणायचे होते. त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो. त्याच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांचा सोबती असणारा विजय, रंगभूमीवर नाटक आणण्याचा विचार करत होता. मी त्यावर त्याच्यापुढे त्याचा आजार, उपचारांचा खर्च आणि नाटकासाठी लागणारे आर्थिक बळ याचे गणित मांडले. पण तो तो ठाम होता आणि ते नाटक मी दिग्दर्शित करावे, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. अखेर दिग्दर्शनाचे मानधन घेणार नाही, या अटीवर हेमंत भालेकर हे नाटक करण्यास तयार झाले. ‘सौ. तारा सखाराम’ हे ते नाटक! दिग्दर्शक म्हणून हेमंत भालेकर यांचे ते पहिलेच व्यावसायिक नाटक होते. किशोर नांदलस्कर, भारती पाटील, कल्पना साठे, अनिल गवस, राजेश कदम, मेघा मटकर, राजा नाईक आदी कलावंत त्या नाटकात होते. नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेने विजय पांचाळ सुखावत होते आणि त्यांच्या आजाराचाही त्यांना विसर पडला होता.
नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग दामोदर हॉलमध्ये उत्तम रंगला. प्रयोग संपल्यावर विजय पांचाळ यांनी हेमंत भालेकरांना गाठले आणि एक पाकीट त्यांच्यासमोर धरले. हा संवेदनशील प्रसंग कथन करताना हेमंत भालेकर सांगतात, “मी विजयला अटींची आठवण करून दिली. पण विजय ऐकायला तयार नव्हता. मी काहीच घेतले नाही, तर मनाला रुखरुख लागून राहील, असे तो म्हणत राहिला. शेवटी मी त्याच्याकडून ‘एक रुपया’ घेण्यास संमती दिली. त्याने मला एक रुपयाचे नाणे दिले आणि घट्ट मिठी मारली. पुढे सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळ विजय आमच्यात होता, पण या नाटकामुळे तो त्याच्या व्याधी पार विसरून गेला होता.”
मराठी रंगभूमीवर ‘सर्किट हाऊस’ हे नाटक काही वर्षांपूर्वी आले होते आणि खूप गाजलेही होते. या नाटकाने अलीकडे नव्याने रंगभूमीवर पाऊल टाकले आणि पूर्वीसारखाच प्रतिसाद या नाटकाला रसिकांकडून मिळत आहे. या नाटकाने सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घातला असून, या नाटकात प्रमुख भूमिका रंगवणारे अभिनेते संजय नार्वेकर यांची जादू आजही तितकीच कमाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, चित्रपट तसेच नाट्यसृष्टीत लेखक व दिग्दर्शक अशी ओळख असलेले गणेश पंडित ‘सर्किट हाऊस’ नाटकात चक्क भूमिका रंगवत आहेत. नव्याने रंगभूमीवर आलेल्या या नाटकाच्या निमित्ताने संजय नार्वेकर यांचे दर्शन पुन्हा एकदा रंगमंचावर होत आहे आणि त्यांच्यासह गणेश पंडित हे रंगभूमीवर अभिनय करताना दिसत आहेत.
या नाटकाच्या निमित्ताने एकूणच रंगभूमीविषयी बोलताना संजय नार्वेकर म्हणतात, “रंगभूमी हे माझे वेड आहे. रंगभूमी माझी शाळा आहे. रंगभूमीवर मला शिकायला मिळते. नवीन काही करायचे असेल, तर ते मला रंगभूमी शिकवते. एक विद्यार्थी म्हणून मी रंगभूमीकडे पाहतो. त्यामुळे मी नाटक कायम करतच राहणार.” ‘सर्किट हाऊस’ या नाटकाचे लेखन गौतम जोगळेकर यांनी केले आहे आणि विजय केंकरे यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. श्रीकांत तटकरे व मिहीर गवळी हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकात संजय नार्वेकर, गणेश पंडित यांच्यासह अंकुर वाढवे, माधुरी जोशी, सावित्री मेधातुल, सुषमा भोसले, प्रमोद कदम, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे आदी आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या कलाकारांनी त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका समरसून केल्या असून, प्रत्येकाने स्वतःची छाप नाटकावर उमटवली आहे. पुन्हा रंगभूमीवर आलेले ‘सर्किट हाऊस’ हे नाटक सध्या नाट्यगृहांवर धमाल उडवत असून, या नाटकाची आता पन्नासाव्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…