डॉक्टर स्नेहलता देशमुख यांची १९९५ साली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांतील वैद्यकीय प्रशासनासाठीचा सुरू केलेला पदविकेचा अभ्यासक्रम खास उल्लेखनीय. यानंतर स्नेहलताबाई अर्भकांना जन्मत:च येणाऱ्या व्यंगांवर संशोधन केले. कोणत्या गुणसूत्रांच्या अपकारक जोडणीमुळे अशी व्यंगे येतात, त्यांवर कोणते उपाय करायचे, यावर संशोधन केले व असे व्यंग अर्भकामध्ये येऊ नये म्हणून गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबद्दलचे ज्ञान समाजात प्रसृत करण्याचे त्यांनी जणू व्रत घेतले. त्यावर अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली व त्याचा फायदा गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात होऊ लागला. स्नेहलताबाईंनी गर्भवती महिलांसाठी लिहिलेली पुस्तके -गर्भवती आणि बाळाचा आहार, गर्भसंस्कार तंत्र व मंत्र, टेक केयर, तंत्रयुगातील उमलती मने ही त्यांची पुस्तके विशेषकरून खूप गाजली. स्नेहलता देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना अनेक महत्त्वाचे मान सन्मान मिळाले. त्यामध्ये पुढील महत्त्वाच्या सन्मानाचा समावेश आहे. ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, १९९८,‘धन्वंतरी पुरस्कार,’ २००५ अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचे २९ जुलै २०२४ रोजी वयाच्या ८५व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. डॉक्टर स्नेहलता देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली!
लता गुठे
अचानक डॉ. स्नेहलता देशमुख गेल्याची बातमी कानावर येऊन धडकली आणि अनेक आठवणींचा गदारोळ मनात सुरू झाला. अतिशय उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व, तरीही पाय जमिनीवर ठेवून आकाश कवेत घेणारं. मी २००७ ला विलेपार्ले येथे राहायला आले आणि त्यानंतर स्नेहलताताईंना या ना त्या कारणाने बोलणं, भेटणं त्यांना ऐकणं होऊ लागलं. त्या फार बोलत नसत; परंतु जे बोलत ते ऐकताना साक्षात सरस्वती त्यांच्या वाणीतून प्रकट होत असे.
डॉ. स्नेहलता देशमुख यांना प्रथम भेटले तेव्हा, मदर टेरेसा यांचं एक वाक्य आठवलं, ते म्हणजे “एखाद्या माणसाला मदत करताना त्याला मदतीच्या हातांबरोबर आपलं काळीजही द्या.” या वाक्याचा प्रत्यय बाईंना भेटताक्षणीच आला. बाईंना भेटले अन् मी मनाशी एक खूणगाठ बांधली ती म्हणजे, जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल, तर माणसातलं माणूसपण जपायला हवं. एकदा मी संपादित करत असलेल्या ‘ताऱ्यांचे जग’ दिवाळी अंकाच्या निमित्ताने मला स्नेहलताबाईंची मुलाखत घ्यायची होती. कारण आरोग्यविषयक दिवाळी अंक होता. स्नेहलताबाईंना मी फोन केला. त्यांना सांगितलं, ताई मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. त्यावेळी ताई म्हणाल्या, “अगं मुलाखत कसली घेतेस ये गप्पा मारायला. छान गप्पा मारूया.” त्यांनी वेळ दिली. त्यानुसार मी त्यांच्याकडे गेले. हातात कागद-पेन न घेता. बोलायला सुरुवात केली आणि काही मिनिटांतच त्यांच्या मोठेपणाचं दडपण नाहीसं झालं.
डॉ. स्नेहलता देशमुख ह्या एक ख्यातनाम बालरोग शल्यचिकित्सक आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू म्हणूनही सुपरिचित होत्या. त्याचबरोबर त्या उत्तम सिद्धहस्त लेखिकाही होत्या. कित्येक वर्षांपासून त्या अनेक गरीब स्त्रियांना विनाशुल्क गर्भसंस्कार करत आहेत हे सर्व मी जाणत होते. तरीही खूप काही जाणून घ्यायचं बाकी होतं. कारण ज्यांच्या पंखात बळ असतं त्यांनाच उंच गगनभरारी घेता येते. एखाद मोठं स्वप्न पाहून ते पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी जिद्द, चिकाटीबरोबरच भरपूर अभ्यास करावा लागतो हे त्यांच्या जीवनाचा पट उलगडून दाखवला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. ताईंशी बोलताना कधी दीड-दोन तास कसे गेले समजलेही नाही. “आयुष्यातले अनेक खाचखळगे चालताना अनेक अनुभवानी मला समृद्ध केलं” असं शेवटी ताई म्हणाल्या. त्यामुळेच त्यांच्या वागण्यात प्रेमलता आणि नावात स्नेहलता होतीच. जेव्हा मी मुलाखत लिहिली आणि त्यांना वाचून दाखवायला गेले, तेव्हा ताई म्हणाल्या, “तू खूप छान लिहितेस. अगं तुझ्या शब्दातून मलाच माझी नव्याने ओळख झाल्यासारखे वाटते.” त्यांनी ही शाबासकीची थाप दिली.
स्नेहलताताईंशी भेटीगाठी वाढत गेल्या. प्रत्येक भेटीत नवीन काहीतरी ऐकायला, शिकायला मिळत होतं. प्रथम बाईच्या घरी गेले अन् अंगणातच रमले. त्यांच्य इमारतीसमोरच्या हिरव्यागार पाना-फुलांनी बहरलेल्या वेलींवर मन फुलपाखरासारखं भिरभिरलं. घराबाहेर सुंदर नटराजाची आणि सरस्वतीची मूर्ती आणि दारावर वारली पेंटिंग हे सर्व संस्कृती आणि संस्काराचे चिन्ह पाहून मन प्रसन्न झालं. दार उघडताच स्नेहलताबाईंच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य पाहून आनंदाच्या लहरी खोल काळजात झिरपल्या. मंदिरात गेल्यानंतर एखाद्या सुंदर मूर्तीकडे पाहून जे भाव मनात उमटतात, अगदी तसे काहीसे वाटले.
एकदा मी त्यांना विचारलं, “ताई गर्भसंस्कार करण्याची काय गरज आहे?” तेव्हा त्या म्हणाल्या, अगं मी बालरोग शल्यचिकित्सक असल्यामुळे अनेक लहान मुलांच्या सर्जरी करायची. अनेक मुलं जन्माला येतानाच व्यंग घेऊन येतात. त्यांच्या आई-वडिलांची तळमळ पाहून मलाही खूप वाईट वाटायचं. मुलं जन्माला येताना ती हेल्दी असावीत म्हणून मी गर्भसंस्कार करण्याचे ठरविले. प्रत्येकीला वेगळ्या संस्काराची गरज असते; म्हणजे ऑफिसमध्ये एसीमध्ये काम करणाऱ्या मुलींमध्ये डी जीवनसत्त्वाची कमी असते. भाजी विकणाऱ्या स्त्रिया भाजी विकून झाली की उरलेली सर्व भाजी हॉटेलला विकतात. अशा स्त्रियांना सांगावं लागतं, बाई-तुझ्यासाठी एखादं गाजर, बीट, पालक, भोपळा ठेव. ज्या महिलांचा घरात छळ होतो, त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहात नाही. अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांवर संस्कार करावे लागतात. याशिवाय काही अशा महिला येतात त्यांना मुलाला जन्म देणे शक्य नसते; पण त्यांना स्वतःचं मूल हवं असतं. उदा. सांगायचं झालं तर, एकदा एक मुलगी माझ्याकडे आली. तिला किडणीचा आजार होता. तिला खूप समजावलं, की तुला मूल होणं धोक्याचं आहे. दत्तक मुलाचा पर्याय सुचवला; पण ती काही केल्या ऐकेना. शेवटी तिने मूल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिची सर्वप्रकारे काळजी घेतली. तिची व्हिल पॉवर खूप स्ट्राँग असल्यामुळे तिने चांगल्या हेल्दी बाळाला जन्म दिला. अशा कितीतरी गोष्टी घडतात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.”
डॉ. स्नेहलताबाईंना काही तासांत समजून घेणं अशक्य गोष्ट होती. भाग्यरेषा हातात असल्याशिवाय कर्तृत्वाला सोनेरी किनार लाभत नाही. कुठेतरी वाचलेलं हे वाक्य मला बाईंशी बोलताना नेमकं आठवलं. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर नियुक्ती होणं हा भाग्ययोग कसा आला, विचारल्यावर स्नेहलताबाई क्षणभर थांबल्या आणि त्या प्रसंगाशी एकरूप होऊन बोलू लागल्या. त्यावेळचे गव्हर्नर पी. सी. अलेक्झांडरसाहेब होते. त्यांच्याकडून ही बातमी मिळाली. मी भारावून गेले. सायन हॉस्पिटलमधील माझ्या कामाची दखल घेऊन माझं नाव मुंबई विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलर पदासाठी पाठवलं गेलं होतं. पदाबरोबर खूप मोठी जबाबदारीही पेलावी लागणार हे ओघानेच आलं. त्या पदावर असतानाच शाळेत मुलांच्या नावापुढे वडिलांच्या नावाबरोबर आईचंही नाव लावण्याचा पहिला निर्णय घेतला. निर्णयाला विरोध झाला, पण नंतर ह्या निर्णयाचं कौतुकही झालं आणि तसा ठरावही पास झाला. आईच्या सन्मानाची कुठंतरी दखल घेतली जाईल याचं समाधान मिळालं. दुसरं उदाहरण म्हणजे एक दिवस सकाळी मला फोन आला. समोरून एक मुलगी म्हणाली, “मॅडम, माझी रात्री डिलेव्हरी झाली आहे. आज माझा पेपर आहे, माझा अभ्यासही झाला आहे. मी पेपर नाही दिला तर माझे वर्ष वाया जाईल. ती मुलगी मला मदत करण्याची विनंती करत होती. मी एक चांगला सुपरवाईझर पाठवून त्या मुलीचा पेपर हॉस्पिटलमध्ये लिहून घेतला. ती मुलगी पास झाली. तो आनंद खूप समाधान देऊन गेला. त्या काळात अनेक वादळांना तोंड द्यावं लागलं. माझं कुटुंब माझ्याबरोबर ठामपणे उभं होतं. परमेश्वरावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास होता. मी चांगल्या कामासाठी, दुसऱ्यांच्या भल्यासाठी लढत होते. त्यामुळे मला भय, चिंता नव्हती. माझा प्रामाणिकपणा हे मोठं शस्त्र माझ्या हातात होतं. त्यामुळे त्या वादळातून मी सहीसलामत बाहेर पडले. बाईंचा शब्द न शब्द तोलून मापून घ्यावा असा मौल्यवान होता.
एक दिवस त्यांच्या घरी गेले असता बोलता बोलता पुरस्काराचा विषय निघाला. त्यावर बाई म्हणाल्या, “स्त्रियांना स्वतंत्र विचाराने जगता आलं पाहिजे असं माझं मत आहे. स्त्रीचा सन्मान होत नसेल, स्त्रियांच्या अस्मितेला जर तडे जात असतील तर त्या पुरस्काराचा काय उपयोग? सुशिक्षित स्त्रियांनी धाडसाने पुढे येऊन आपले विचार निर्भीडपणे मांडावेत. स्त्रीनेच स्त्रीचा सन्मान करावा. तिला मानाने वागवावं असं झालं तरच स्त्रिया स्वतंत्र होतील. बाईंचे हे विचार ऐकून त्यांच्या मनात स्त्रियांविषयी किती आदर, आपुलकी, स्नेह आहे हे लक्षात आलं.
बाईंशी बोलताना त्यांच्यातील अनेक स्त्रियांची ओळख झाली. ती म्हणजे आदर्श पत्नी, सून, कर्तव्यदक्ष डॉक्टर आणि एका सक्षम आईची. त्या म्हणाल्या आई-वडीलच मुलांवर खूप चांगले संस्कार करू शकतात आणि ते संस्कारक्षम वयातच करावे लागतात. मुलांबरोबर जास्त वेळ देता यावा म्हणून मी केईएम हॉस्पिटलच्या जवळ गव्हर्नमेंट कॉर्टर्समध्ये राहणं पसंत केलं. माझे पती नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. लांब राहिलं तर जाण्या-येण्यात वेळ जाईल आणि मुलांकडे दुर्लक्ष होईल हे मला माहीत होतं. मुलं दहावी-बारावीला गेली अन् माझं प्रमोशन आलं. प्रमोशन घेतलं तर कामाची जबाबदारी वाढणार, नाकारलं तर परत पाच वर्षे थांबावं लागणार होतं. प्रमोशनपेक्षा मला माझ्या मुलांचं करिअर जास्त महत्त्वाचं होतं म्हणून मी प्रमोशन नाकारलं. “फक्त आईच ही गोष्ट करू शकते. अनेक वादळांना सामोरी जाणारी कणखर कुलगुरू, विज्ञानाच्या भक्कम पायावर उभी राहून संस्कार जपणारी, सामाजिक भान असलेली धैर्यशील स्त्री, इतरांच्या मनाचा विचार करणारी, माणसातलं माणूसपण जपणारी, स्वाभिमानी, सक्षम, वलयांकित, तेजस्विनी असंच आणखी बरंच काही.
महिला साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बाईंनी एक प्रसंग खूप छान सांगितला होता तो मला आजही आठवतोय त्या म्हणाल्या, “एक दिवस एक बाई तिच्या मुलाला घेऊन माझ्या हॉस्पिटलमध्ये आली. तिने मुलाला काय होतंय ते सांगितलं. मी तपासल्यानंतर लक्षात आलं, की त्याच्या पोटात कॅन्सरची गाठ आहे. ती आधीच खूप अस्वस्थ बैचेन होती. मी धाडस करून तिला सांगितलं की, मुलाच्या पोटात कॅन्सरची गाठ आहे. ते ऐकून तिचा धीरच सुटला. तिने मला एक अवघड प्रश्न विचारला, त्याचे उत्तर मलाही माहीत नव्हतं. ती रडतच म्हणाली, माझा मुलगा वाचेल ना? मी तिला धैर्य देण्यासाठी हो म्हणाले. त्या मुलाची सर्जरी करायला आत जाताना तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुम्हाला यश येईल. तिचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. त्या माऊलीची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. माझ्या हाताला यश आलं. मुलगा बरा झाला. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला न विसरता ती मला फोन करून शुभेच्छा देते. एक दिवस तिचा फोन आला, तेव्हा ती म्हणाली, “बाई तुमचा मुलगा सीए झाला.” तुमचा मुलगा या शब्दाने मी भारावून गेले. मला खूप आनंद झाला. असे काही मौल्यवान क्षण मी माझ्या हृदयात जपून ठेवले आहेत. त्या क्षणांनी मला माझ्या जगण्याचा अर्थ समजून सांगितला. परमेश्वराने मला ज्या कामासाठी पाठविले ते सफल झाल्यासारखे वाटते.