वर्षभरापूर्वी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने सगळीकडे खळबळ उडवून दिली होती. वृत्तपत्रांपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत आणि राजकारण्यांपासून धर्मकारण्यांपर्यंत सर्वांनीच त्यावर प्रशंसेची किंवा टीकेची झोड उठवली. धर्मांतर हा ज्याच्या त्याच्या आयुष्यातला वैयक्तिक प्रश्न आहे इथपासून याचा समाजावर कसा आणि किती परिणाम होतो, इथपर्यंत विविध ठिकाणी चर्चा झाल्या. जसं इतर कोणत्याही विषयाचं होतं, तसंच झालं. कालांतराने धुरळा बसला, चर्चा संपल्या आणि सर्वजण पुन्हा आपल्या नित्य व्यवहारात गर्क झाले. पण धर्मांतराच्या घटना संपत नाहीत, तोपर्यंत हा विषय संपत नाही. या ना त्यानिमित्ताने या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येतातच. ओ. श्रुती या केरळमधल्या तरुणीने तिच्या धर्मांतराच्या प्रवासाची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मुलींचे ज्या पद्धतीने ब्रेनवॉशिंग केले जाते, त्याची सत्यकथा तिने लिहिली आहे. श्रुती ही केरळमधल्या हव्याका ब्राह्मण समाजातील मुलगी. धर्म, पूजा-अर्चा या गोष्टी आपल्यापुरत्या असाव्यात, परधर्माचाही आदर करावा, असे संस्कार तिच्यावर झाले होते. पण कॉलेजमध्ये गेल्यावर तिचे आयुष्य बदलले. तिच्या कॉलेजमध्ये मुस्लीम मुली बहुसंख्य होत्या. मुलं तर नव्हतीच. मुली तिला धर्माबद्दल प्रश्न विचारायच्या. तिने सुरुवातीला दुर्लक्ष केले. कुंकू का लावतात, यज्ञ का करतात, पूजा का करतात, आरती म्हणजे काय, ती का करतात, तुमच्या धर्मात इतके वेगवेगळे देव का आहेत वगैरे. पण हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की या मुली विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नव्हती. तिच्या आई-वडिलांनाही अशा प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती.
श्रुती अस्वस्थ झाली. तिने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. तिने इंटरनेटवर शोधले, पुस्तकं वाचली. पण कुठेच कसलीही स्पष्टता नव्हती. तिचा गोंधळ वाढू लागला. त्या मुलींचे त्यांच्या धर्माविषयीचं सखोल ज्ञान आणि श्रुतीचे स्वधर्माबद्दलचं तोकडे ज्ञान, यामुळे श्रुतीला परधर्माचे कुतूहल आणि स्वधर्माविषयीचा हीनगंड यांनी ग्रासले. संभ्रमित श्रुतीला एम.ए. करताना आणि शिक्षिका झाल्यावर परधर्माच्या प्रभावाखाली आणण्यासाठी खूप प्रयत्न झाले. तिच्यावर इस्लामचा प्रभाव पाडण्यासाठी हिंदू धर्माच्या नालस्तीचा मार्ग अवलंबला जाऊ लागला. यात विद्यार्थी ते कॉलेज व्यवस्थापन यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होता. श्रुती हळूहळू प्रचारसाहित्य आणि झाकिर नाईकसारख्या धर्मप्रसारकांच्या व्याख्यानांमध्ये गुरफटली. त्यात हिंदू धर्माची यथेच्छ नालस्ती असे. अनेकेश्वरवाद, प्राण्यांमध्ये देव पाहणे या गोष्टी पाप आहेत, अशा धर्माच्या अनुयायांचे मृत्यूनंतर नरकात हाल केले जातात, अशी भीती घातली जाई.
भारतीय स्त्रियांचे परपुरुषांशी बोलणे, काही देवतांचे पोशाख या गोष्टी अशिष्ट आहेत. हिजाब अथवा बुरखा घातल्यानेच शीलरक्षण होते, असे बिंबवले गेल्याने श्रुती हिजाब वापरू लागली. आई-वडील आमचा धर्म पाळत नसतील तर त्यांची जागा नरकात आहे, हे तिच्या डोक्यात भरवले गेले. श्रुतीला स्वत:च्या आई-वडिलांबद्दल घृणा वाटू लागली.
एकदा तर मशिदीतून ऐकू येणाऱ्या अजानची वाट पाहणाऱ्या श्रुतीने देवपूजेचा प्रसाद देणाऱ्या आईला संतापून थप्पडही मारली होती. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर श्रुतीने काही काळ शिक्षिका म्हणून नोकरी केली. पण इस्लाम धर्मात स्त्रीने पुरुषांसमोर चेहरा आणि शरीर दाखवणं अयोग्य मानले जाते. त्या केवळ त्यांच्या पतीलाच चेहरा दाखवू शकतात, ही कल्पना मनात पक्की असल्यामुळे तिने नोकरी सोडून दिली. लवकरच श्रुती घरातून पळून गेली आणि ‘मौनतुल इस्लाम सभा’ या धर्मांतर केंद्रात दाखल झाली. तिथे ६५ स्त्रिया इस्लाम स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. प्रियकराने दबाव आणल्यामुळे, काही आर्थिक आमिष दाखवल्यामुळे त्यातल्या अनेकजणी आल्या होत्या. इथेही श्रुतीला ‘अन्य धर्म सैतानी असून त्यांचे अनुयायी मुस्लिमांचे शत्रू आहेत’, असे कडवेपणाचे धडे दिले गेले. कलमा पढवला गेला आणि श्रुतीची ‘रहमत’ बनली. आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये केल्यावर पोलिसांनी ‘रहमत’ला न्यायालयात हजर केले. आई-वडिलांची केविलवाणी अवस्था पाहून तिने फक्त दोन दिवस त्यांच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली. मी इस्लाम धर्माची आहे आणि मी दोन दिवस घरी राहून परत येईन, असे कोर्टात आणि मौनतुल केंद्रात लिहून दिले. घरी गेल्यावर तिला आई-वडिलांनी काहीसे जबरदस्तीनेच ‘आर्ष विद्या समाजम’ या संस्थेच्या योग केंद्रात नेलं.
अशा अनेक प्रकरणांचा अनुभव असणारे आचार्य मनोज यांच्याशी तिने तीन तास चर्चा केली. आचार्यांनी तिच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि आरोपाचे दोन्ही धर्मांमधील धर्मग्रंथांच्या साह्याने निरसन केले. आचार्य मनोज यांनी तिला गांभीर्याने विचार करून पुढील आयुष्याबाबत निर्णय घ्यायला सांगितलं. इथे ‘रहमत’ला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि पूर्ण विचार करून ‘रहमत’ पुन्हा एकदा श्रुती बनली. श्रुतीने ‘ए स्टोरी ऑफ रिव्हर्शन’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘आर्ष विद्या समाजम’ने या पुस्तकासह ब्रेनवॉशिंगमधून सावरलेल्या आणखी चार तरुणींची आत्मकथने प्रसिद्ध केली आहेत. यात ख्रिश्चन धर्मातल्या तरुणींचाही समावेश आहेच. धर्मांतरांमागील खरी कारणे आणि त्यांचे निराकरण यावर श्रुती चर्चा करतात. त्यांना आशा आहे की, त्यांच्या आई-वडिलांना ज्या वेदना आणि अपमानाला सामोरे जावे लागले, ते इतर कोणाला सहन करावे लागू नये आणि इतर कोणी गैरसमजांना बळी पडू नये. अवघ्या सहावीतल्या विद्यार्थ्याने धर्मांतरासाठी आपल्या शिक्षिकेला सात लाख रुपयांचे आमिष दाखवल्याचा श्रुती यांचा अनुभव धार्मिक कडवेपणा किती खोलवर रुजला आहे आणि धर्मांतराचा रेटा किती तीव्र असू शकतो, हेच सांगतो.
या संपूर्ण घटनेतला महत्त्वाचा भाग असा की कोणीही पुन्हा हिंदू धर्मात परत येऊ शकतो आणि आपल्या सनातन धर्माचा शोध घेऊ शकतो. ओ. श्रुतीने हे स्वत:च्या अनुभवातून सांगितले आहे. त्या आजही आर्ष विद्या समाजाचा भाग आहेत. हजारो तरुणांना धर्माच्या पटलात परत येण्यास त्या मदत करतात. त्यांनी यावर अनेक भाषणे दिली आहेत. त्यांचे स्वतःचे यू ट्यूब चॅनेलदेखील आहे. खरा प्रश्न असा आहे की, भारतासारख्या निधर्मी म्हणवणाऱ्या देशात या गोष्टी सरसकट सुरू असतात. सरकार डोळ्यांवर कातडे ओढून गप्प बसते आणि लहान-सहान गोष्टींवर प्रचंड चर्चा करणारे सारे राजकीय, सामाजिक, धार्मिक धुरंधर आणि विश्लेषक याविषयी शब्दही काढत नाहीत. ‘फक्त कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे, तर त्यापलीकडे जाऊन हिंदू धर्माची मूलतत्त्वे, नैतिकता, अध्यात्मिकता आणि धर्माची मूळ बैठक शिकवणारे, हिंदू धर्माच्या सामाजिक धारणेविषयी चर्चा करणारे, धर्माच्या संकल्पना स्पष्ट करणारे, त्यातील विविध प्रकारच्या चालीरीती आणि समजुती यातील गोंधळ दूर करणारे कोणतेही व्यासपीठ हिंदू धर्मात आणि हिंदू धर्माला उपलब्ध नाही, ही खरी शोकांतिका आहे. एकीकडे धर्मांतरासाठी संघटित प्रयत्न सुरू असताना आणि त्याची जाणीव सर्वांना असतानाही हिंदू धर्म शिकवणारी कोणतीच ठोस व्यवस्था आपल्याकडे नाही, अशी खंत ओ. श्रुती यांना वाटते.
पालक आपल्या मुलांना धर्म शिकवू शकत नाहीत. कारण त्याविषयी त्यांना स्वत:लाच फारशी माहिती नाही. केवळ गोडधोड पदार्थ बनवून सण साजरे करणे म्हणजे धर्म नव्हे किंवा सणांच्या आणि धार्मिकतेच्या नावाखाली मिरवणुका काढणे, रेकॉर्डस लावून अंगविक्षेप करत नाचणे आणि त्यासाठी तासनतास रस्ते अडवून ठेवणे ही हिंदू धर्माची ओळख निश्चितच नव्हे. श्रुती यांची धडपड लक्षात घेता हिंदू धर्म नेमका का, कसा आणि कोणत्या पायावर उभा आहे हे देशाच्या निधर्मी आणि सर्वधर्मसमभावाच्या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणांना समजून देणे आवश्यक आहे हे नक्की.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…