Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीश्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा संदेश

श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा संदेश

समर्थ कृपा – विलास खानोलकर

गुरुपौणिमेच्या दिवशी भक्त स्वामींची पूजा करतात आणि स्वामींना प्रश्न विचारतात, संसार करता करता परमार्थ कसा साधावा? स्वामी त्यांना संदेश देतात. नित्य प्रपंच करत सहज नामस्मरणाने परमार्थ साधता येतो. उपवास याचा अर्थ जवळ राहून सेवा करणे पण आताच्या काळात उपवास म्हणजे निरनिराळे पदार्थ खाणे असा अर्थ प्रचलित झाला आहे. पण त्यामध्ये देवाची सेवा कमी व खाण्यात बदल फार असल्याने समाधान, सुख, परमार्थ फारच थोडा लाभतो. देवळात जाऊन दर्शन घेणे, प्रदक्षिणा घालणे, नामस्मरण करणे, ‘देवासमोर बसून जप करणे, स्तोत्र वाचणे फार महत्त्वाचे आहे.

प्रपंच म्हटले की, नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सुखदुःख हे असतेच. प्रपंचाचे नित्य धावपळीत देवाचे नंतर करू म्हणून ‘काळ’ जातो व वयोमानानुसार पुन्हा ते करणे अशक्य होते. म्हणूनच रोजच्या जीवनात नित्यकर्म थोडा तरी वेळ गुरूंची सेवा व श्री स्वामी समर्थ नामस्मरण, जप करावा. म्हणजे दुःखाचा नाश होऊन सुख समाधानाची प्राप्ती होते. पूर्वीपासून जगात अनेक स्वामी अवतरले, पण त्यामध्ये सर्वश्रेष्ठ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ होत. १८५६ साली अक्कलकोट गावात निवास करून भक्तांची नाना संकटे दूर केली. त्यामुळे भक्तांची अखंड श्रद्धा श्री स्वामी समर्थांवर निर्माण झाली. कलियुगात धावपळीच्या प्रपंचात आजही भक्त श्री गुरुदेव स्वामी समर्थांची सेवा, जप करतात व दु:ख मुक्त होऊन समाधानाने आनंदी होतात, अशी महाराजांच्या ‘श्री स्वामी समर्थ’ नामजपाची जगभर प्रसिद्धी आहे.

स्वामी समर्थ चालिसा

चाळीस जन्म
सोबत समर्थ स्वामी
जे स्वामी चालिसा
वाचतील मनोमनी ||१||
जे स्वामी समर्थ रोज स्मरती
नित्य त्यात दत्तगुरु पाहती ।। २।।
साक्षात श्रीदत्तगुरुंची हसरी मूर्ती
करी साऱ्या कामाची पूर्ती ।। ३ ।।
दत्तगुरु प्रथम प्रेमळ अवतार
व्दितीय श्रीपादवल्लभ
अवतार ॥ ४॥
तृतीय ते नृसिंह सरस्वती अवतार
चतुर्भूज ते स्वामी समर्थ
अवतार ।। ५।।
कधी वारुळातुनी घेतला अवतार
कधी वटवृक्षाद्वारे घेतला
अवतार ।। ६।।
कधी घेतला ओंकारातून अवतार
कधी धरणीतूनच भूवरी
अवतार ।। ७।।
लोकांवाटे आकाशातूनच घेतला अवतार
कधी कोठे जंगलात
घेतला अवतार ।। ८।
कधी शोधू नये नदीचे मूळ
कधी शोधू नये गुरुचे कुळ ।। ९।।
हसत हसत बोले औदुंबराचे मूळ
कधी डोले वटवृक्षाचे
पारंबी मूळ ।। १०।।
आदित्यासम तेजस्वी चेहरा
चंद्रासम शीतल तू गुरुवरा ||११||
करुण वत्सल स्वामी दयाघना
अति प्रेमळ मूर्ती मनामना ||१२||
चित्त बुद्धी स्थिर करिशी ध्याने
भक्तिमार्ग तव डोळस श्रध्देने ||१३||
सार्थक झाले शत जन्माचे
ऋण फिटले सात जन्माचे ।।१४।।
कर्म करूनही न उरली आसक्ती
दिनरात करता तुझीच भक्ती ||१५||
सुख समाधानात शांतीची शक्ती
तुझ्यामुळेच आली
अंगात शक्ती ।।१६।।
तू साऱ्यांचा करुणा सागर
शीतल भक्तीने भरली घागर ||१७||
हाती धरला नामजपाच्या नांगर
साक्षात झाला सोन्याचाच
नांगर ।।१८।।
अजानबाहु तुझे मनोहर रूप
तू स्वामी सर्वांगाने सुस्वरूप ।।१९।।
अज्ञानींसाठी घेतले सामान्यरूप
विद्वानांसाठी घेतले गुरुरूप ||२०||
शरण आणण्या शत्रूस घेतले उग्ररूप
जसे अर्जुनास दाविले
श्रीकृष्ण विश्वरूप ||२१||
भूत पिशाच्चं केले सरळ
अनेकांच्या मनातील
झटकले वारूळ ।।२२।।
राजे राजवाडे केले अनेक सरळ
गच्च दातखिळी
हाती दिला नारळ ।।२३।।
भक्ता हाती सदिच्छेचे श्रीफळ
भक्त बालकांप्रती
प्रेम सुफळ ।।२४।।
गर्व न बाळगता आले जे शरण
चुकविले स्वामीने
त्यांचे मरण ।।२५।।
फोडिले अनेक संकटाचे धरण
भुकेलेल्या दिले प्रसाद
भात-वरण ।। २६ ।।
प्रेमळ स्वामी समर्थ दत्त अवधूत
तेहतीस कोटी
देवांचा तू दूत ।। २७ ।।
गंगेकाठी जशी पापे धूत ।।
स्वामी नजरेने सारी पापे धूत ||२८||
छेली खेडेग्रामी तू अवतरला
जगउद्धारासाठी
खरा अवतरला ।। २९ ।।
चोळप्पा बाळाप्पाचे केले कल्याण
अक्कलकोटाचे झाले
महाकल्याण ।। ३० ।।
तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू
तुझ्यासारखा नाही
कोणी मायाळू ।।३१।।
ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श
त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ||३२||
ज्याचा घरात येई संकट
स्वामी नाम घेता पळे संकट ||३३||
सोपा सुखकर मार्ग दाविती
सदा गावी स्वामींची कीर्ती ||३४||
स्वामी नामात नाही अंधश्रद्धा
नास्तिक हो ठेवा पूर्णश्रद्धा ||३५||
येईल अनुभव याच जन्मी
पारणे फिटेल जन्मोजन्मी || ३६||
मनोभावे जे स्वामी पुजती
नाही चिंता नाही भीती ।। ३७ ।।
स्वामी नाम घेता
अंधारात उजाला
सिकंदर पौरस
सामना जिंकला || ३८||
अमर दत्तरूप तू मानव देही
भक्त मागती
ती संपदा तू देई ।। ३९ ।।
भक्त विलासाची वाहे सरिता
स्वामी चालीसाचा
जप आचरिता ।। ४०।।
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -