मुंबई : महापालिका प्रशासनाने (BMC) ३० मे पासून मुंबईसह इतर शहरांना ५ टक्के पाणीकपात ( Mumbai Water Cut) जारी केला होता. तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय लागू केला होता. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीच्या संकटांना (Water Shortage) सामोरे जावे लागत होते. मात्र सध्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुंबईकरांवर असणारे पाणीकपातीचे सावट दूर करण्याबाबत महापालिका निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार महापालिकेने पाणीकपात बंद करण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांतच हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई शहराला लागू असलेली १० टक्के पाणीकपात येत्या सोमवारी म्हणजेच २९ जुलैपासून दूर करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ६६. ७७ टक्के इतका झाला आहे. आज सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९,६६,३९५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ६६. ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी हा आकडा ५५.१८ टक्के होता.