मुंबई : महापालिका प्रशासनाने (BMC) ३० मे पासून मुंबईसह इतर शहरांना ५ टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) जारी केला होता. तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय लागू केला होता. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीच्या संकटांना (Water Shortage) सामोरे जावे लागत होते. मात्र जुलै महिन्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे सावट लवकरच दूर करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांसह धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या सात तलावांमध्ये मिळून ६,८४,४४० दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईवरील पाणीकपात रद्द करण्याबाबत जल विभागाची आयुक्तांकडे निर्णायक बैठक होणार आहे. त्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
मुंबई शहराला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा, आणि तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे महानगर पालिका पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.