अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक.
सरत्या आठवड्यामध्ये रोजगार, उद्योग आणि चांदीच्या दराबाबत काही लक्षवेधी बातम्या समोर आल्या. आखाती युद्धामुळे राजस्थानमध्ये तीन लाख युवक बेरोजगार झाले असल्याची पहिली बातमी कोड्यात पाडणारी ठरली. दरम्यान अन्नसेवा उद्योगात भारताची ७.७६ लाख कोटींची उलाढाल झाल्याचे आकडेवारीमुळे स्पष्ट झाले. याच सुमारास भारत परदेशात कच्च्या तेलाचा साठा करणार असल्याची बातमी पुढे आली.
सरत्या आठवड्यामध्ये रोजगार, उद्योग आणि चांदीच्या दराबाबत काही लक्षवेधी बातम्या समोर आल्या. आखाती युद्धामुळे राजस्थानमध्ये तीन लाख युवक बेरोजगार झाले असल्याची पहिली बातमी कोड्यात पाडणारी ठरली. दरम्यान अन्नसेवा उद्योगात भारताची ७.७६ लाख कोटींची उलाढाल झाल्याचे आकडेवारीमुळे स्पष्ट झाले. याच सुमारास भारत परदेशात कच्च्या तेलाचा साठा करणार असल्याची बातमी पुढे आली. आणखी एक खास वृत्त म्हणजे चांदी प्रतिकिलो सव्वा लाख रुपयांवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांमध्ये राजस्थानमध्ये ८०० हून अधिक कारखाने बंद झाले असून, सुमारे तीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. जोधपूर जिल्हा तर सर्वाधिक प्रभावित झाला आहे. येथील हस्तकला, कापड, मसाले आणि गवार गम यांसारख्या उद्योगांचे दर वर्षी दोन हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे. हुथी बंडखोरांच्या सततच्या हल्ल्यांमुळे शिपिंग कंपन्यांनी राजस्थानमधून परदेशात माल पाठवण्याचे भाडे अनेक पटींनी वाढवले आहे. त्यामुळे शेकडो कोटींच्या ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या जोधपूर आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये तयार होणाऱ्या फर्निचरला परदेशात मोठी मागणी असते. हा व्यवसाय आता ४० टक्क्यांनी घटला आहे. राजस्थानमध्ये जोधपूर, जयपूर, रतनगड आणि सरदारशहर येथून हस्तकलेच्या सर्वाधिक वस्तूंची निर्यात केली जाते. येथे बनवलेले लाकडी-लोखंडी फर्निचर, लहान संगमरवरी वस्तू, हाडांच्या कामाच्या वस्तू, पेंटिंग्ज, सजावटीच्या वस्तू, चामड्याचे फर्निचर, पिशव्या, उशा आणि कपड्यांपासून बनवलेल्या इतर वस्तूंची निर्यात केली जाते. त्याची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे.
अनेक नामांकित परदेशी कंपन्या येथे दोन महिने अगोदर ऑर्डर देतात. माल तयार झाल्यानंतर बंदरात जातो. नंतर तो शिपिंग लाइनद्वारे (मालवाहू जहाजे) परदेशात पोहोचतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये हा व्यवसाय ४० टक्क्यांनी घसरला आहे. फक्त ४००० कोटी रुपयांचा व्यवसाय शिल्लक आहे. जयपूर येथील हस्तकला निर्यातदार आणि ‘इंडियन एक्सपोर्ट प्रमोशन काऊंसिल ऑफ हॅण्डिकाफ्ट’चे अध्यक्ष दिलीप वैद्य यांनी सांगितले की, राजस्थानमधील दोन हजार निर्यातदार नोंदणीकृत आहेत. हस्तशिल्पांमध्ये राजस्थान सर्वात जास्त फर्निचरची निर्यात करतो. हुथी बंडखोरांमुळे सध्या ही समस्या निर्माण झाली आहे. येमेनचे बंडखोर किंवा हुथी सुएझ कालव्यातील मालवाहू जहाजांवर सतत हल्ले करत आहेत. हे बंडखोर जहाजांचे अपहरणही करत आहेत. यामुळे मालवाहू जहाजांना मार्ग बदलावा लागत आहे. परिणामी राजस्थानपासून फ्रान्स-इटली-इंग्लंडसारख्या शहरांचे सागरी अंतर दुप्पट झाले आहे. अशा परिस्थितीत मालवाहू कंपन्यांनी त्यांच्या मालवाहतूक दरामध्ये अनेक पटींनी वाढ केली आहे. पूर्वी कंटेनर पाठवण्यासाठी ५०० डॉलर लागत होते, आता त्याचे भाडे चार हजार डॉलरवर पोहोचले आहे. त्यामुळे राजस्थानमधील ८०० उद्योग बंद पडले आहेत.
दरम्यान भारतात रेस्टॉरंट उद्योगातील उलाढाल ७.७६ लाख कोटी रुपयांची होईल, असे सांगणारा एक अहवाल समोर आला. या अहवालानुसार, भारतीय अन्न सेवा उद्योगातील सध्याची उलाढाल ५.७ लाख कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे. २०२८ पर्यंत ती ७.७६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. अहवालामधील माहितीनुसार, भारतात अन्न सेवा उद्योग ८५.५ लाख लोकांना रोजगार देतो. दिल्लीचे लोक डंपलिंग, टॅको या पदार्थांना तसेच दक्षिण भारतीय पदार्थांपेक्षा समोसे, कचोरी, पकोडे, छोले भटुरे आणि कबाब यांना अधिक पसंती देतात. येथे ५१ टक्के लोक रेस्टॉरंटमध्ये फक्त उत्तर भारतीय स्नॅक्स खाण्यास प्राधान्य देतात. गुरुग्राममध्ये ५३ टक्के लोक चायनीज पदार्थ खातात. ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या इंडिया फूड सर्व्हिस रिपोर्ट, २०२४ मध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार दिल्लीतील ३२ टक्के लोकांनी कबूल केले आहे की, कोविडपूर्वीच्या काळाच्या तुलनेत त्यांची बाहेर खाण्याची सवय वाढली आहे.
देशातील २१ शहरांमधील ५,२०० रेस्टॉरंटमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या डेटासाठी ‘एनआरएआय’ने देशातील २१ शहरांमधील ५,२०० रेस्टॉरंटमध्ये सर्वेक्षण केले आहे. यासोबतच रेस्टॉरंट चेनच्या १२० ‘सीईओं’कडून त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांची माहितीही घेण्यात आली. दिल्लीतील ३० टक्के लोक चांगले जेवण घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जातात. दिल्ली आणि नोएडातील लोक रेस्टॉरंटमध्ये जाणे पसंत करतात. त्याच वेळी गुरुग्रामचे लोक द्रुत-सेवा रेस्टॉरंटमध्ये अधिक जातात. अहवालानुसार, दिल्लीत राहणारे ३० टक्के लोक उत्तम जेवण, २० टक्के लोक फास्ट फूड रेस्टॉरंट्स, १३ टक्के लोक कॅज्युअल जेवण, ११ टक्के लोक फूड कोर्ट आणि ९ टक्के लोक मिठाई, आइस्क्रीम आणि बेक्ड वस्तूंना प्राधान्य देतात. भारतातील अन्न सेवा उद्योग वेगाने वाढत आहे. हे क्षेत्र ८५.५ लाख लोकांना थेट रोजगार देत असून भारतीय तिजोरीमध्ये ३३,८०९ कोटी रुपयांचे योगदान देते.
आता एक खास बातमी. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. इतर देशांबरोबर हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तेलाचा साठा वाढवण्याचा प्रयत्न भारत करत आहे. सध्या भारत सरकार देशाबाहेर कच्च्या तेलाचा साठा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारत चार देशांमध्ये तेलाचे साठे तयार करणार आहे. जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये तेलाचे साठे तयार करण्याचा भारताचा विचार आहे; मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी देशाच्या हिताच्या अानुषंगाने संबंधित स्थान किती व्यावहारिक आहे. या घटकाचा विचार केला जाईल. ‘स्ट्रॅटेजिक स्टोरेज’साठी जागा निवडताना गोदामाचे भाडे वाहतुकीच्या खर्चापेक्षा जास्त होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. भारत देशाबाहेर कच्च्या तेलाचा साठा करण्याचा पर्याय पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही भारताने अमेरिकेसोबत असा करार केला होता. २०२० मध्ये, भारत आणि अमेरिकेने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हसंदर्भात एक करार केला होता. या करारात अमेरिकेत भारतीय तेल साठवण्याच्या शक्यतांचाही विचार करण्यात आला होता. दरम्यान आणीबाणीच्या स्थितीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून भारताने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत परदेशात कच्च्या तेलाचे साठे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान येत्या काही दिवसांत चांदीची चमक आणखी वाढू शकते. लवकरच चांदीची किंमत एक ते १.२५ लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकते. ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस’ने आपल्या अहवालात चांदीच्या किमतींबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. ‘बोकरेज हाऊस’ने आपल्या अहवालात गुंतवणूकदारांना किंमती घसरल्यास चांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने चांदीबाबतचा त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात गुंतवणूकदारांना घट झाल्यावर चांदी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ‘बोकरेज हाऊस’ने चांदीच्या किमतींबाबत आपल्या जुन्या लक्ष्य किमतीत सुधारणा केली आहे. मोतीलाल ओसवाल यांनी चांदीची जुनी लक्ष्य किंमत एक लाख रुपयांवरून सव्वा लाख रुपये प्रतिकिलो केली आहे.ब्अहवालात ‘ब्रोकरेज हाऊस’ने म्हटले आहे की, हे लक्ष्य १२ ते १५ महिन्यांत गाठले जाऊ शकते. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये चांदीच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे काही अंतराने नफा बुकिंग दिसू शकते. चांदीची कोणतीही घसरण ही खरेदीची संधी म्हणून वापरली पाहिजे. ८६,००० ते ८६,५०० रुपये ही चांदीची प्रमुख आधार पातळी आहे. चांदी स्लो मूव्हरच्या टॅगमधून बाहेर आली आहे आणि या वर्षी किमतीत मोठी वाढ झाली आहे. व्याजदर कमी करण्याच्या ‘फेड’च्या निर्णयाची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. अमेरिकेतील कमजोर आर्थिक डेटामधून धातूंना पाठिंबा मिळत आहे. चांदीची देशांतर्गत आयात वाढली असून २०२४ मध्ये चार हजार टनांपर्यंत पोहोचली आहे. चीनमधील वेगवान आर्थिक वाढीमुळे, औद्योगिक धातूंच्या मागणीत वाढ झाल्यामुळे चांदीच्या किमती वाढू शकतात.