स्थळ काळाचे भान असलेले नाटक 'स्थळ आले धावून'

भालचंद्र कुबल - पाचवा वेद


स्थळ आले धावून हे नाटक बघितलं आणि प्रकाश बुद्धिसागरांची आठवण झाली. १९८० ते २००० ही वीस वर्षं प्रकाश बुद्धिसागरांनी हसवून सोडली होती. मुळात त्यांनी स्वतःच्या नाटकाचा एक फाॅरमॅट बनवून टाकला होता. हमखास यशाचे परिमाण म्हणजे मराठी नाटक इंडस्ट्रीसाठी प्रकाश बुद्धिसागर हे नाव त्या वीस वर्षांत अग्रस्थानी होते. नंतर नंतर प्रेक्षक नाटकांच्या शीर्षकावरून हे नाटक त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही नाही, हे काॅन्फीडंटली सांगत. शांतेचं कार्ट चालू आहे, वटवट सावित्री, चल काहीतरीच काय, या गच्ची आपलीच आहे, राम तुझी सीता माऊली अशी अनेक नाटकं केवळ त्यांनी दिलेल्या शीर्षकामुळे लक्षवेधी ठरली. गेल्या एक दीड वर्षात असंच कॅची नाव असलेलं नाटक म्हणजे “स्थळ आले धावून”.


गंमत म्हणजे नाटकाचा फाॅरमॅट तोच, प्रकाश बुद्धिसागरांची आठवण करून देणारा. एवढासा “जर्म” पण खुलू लागतो तेव्हा वय विसरायला लावतो. हालाकी इश्तेहार में कहा गया है, की हे नाटक वयोमानाने प्रगल्भ वाटणाऱ्या प्रौढांची प्रेमकथा आहे; परंतु मराठी नाट्यरसिकांना अशा प्रौढ प्रेमकथांमध्ये नावीन्य वाटणार नाही. मुळात मराठी नाटकात कुमारवयीन प्रेमकथांचा ट्रेंड हा हल्लीचा म्हणावा लागेल. त्या आधीच्या प्रेमकथा कदाचित प्रौढ नसतील पण प्रगल्भ नक्कीच होत्या. अगदी डाॅ. गिरीश ओक अभिनित आणि आनंद म्हसवेकर लिखित “यू टर्न” ही एका अर्थाने प्रौढ प्रेमकथाच होती की...! बरं नाटकाचा सादरीकरण बाज हा मनोहर काटदरेंच्या “आपलं बुवा असं आहे” किंवा संजय मोनेंच्याच “हम तो तेरे आशिक है”चा..! माझं तर नाट्य निरीक्षण असं सांगतं की हे नाटक आखुड पिग्मॅलियन आहे किंवा माय फेअर लेडीची सातवी पुसट झेराॅक्स आहे. फक्त तिघा निष्णांत “अभिनयकारांची” जोड लाभल्याने आणि त्यांच्या कारनाम्यामुळे जे काही बेसिक लेखन दोष आहेत ते लपले आहेत.


नाटकाचे कथानक संदेश बेंद्रे उद्यानात सुरू होऊन शीतल तळपदे यांच्या विद्युत रोषणाईने संपते. कुणासाठी कुणीतरी मुलगी / वधू शोधण्याच्या प्रयासाच्या प्रवासकार्यात कुणीतरीच्याच प्रेमात ती मुलगी पडते आणि मग उरते ते मोशन इमोशनचे समीकरण, म्हणजे “स्थळ आले धावून” हे नाटक होय. हेमंत ऐदलाबादकर यांनी कदाचित सरळ सरळ ही संहिता नटसंचाच्या हवाली करून आणि काय करायचंय ते करा, या समजूतदार अप्रोचने संजय मोने आणि गिरीश ओक बॅटिंग करायची मोकळीक दिली असावी. नटांच्या जमुनं आलेल्या केमिस्ट्रीचं हे एक मस्त उदाहरण आहे. दोघांनी या अगोदर पाच नाटकांमध्ये एकत्र काम केलं असल्यामुळे सहजता नॅचरली आलीच आहे. मुळात मिष्किल स्वभावामुळे संजय मोने काही वाक्यांमध्ये इतक्या अप्रतिम विनोदी जागा काढतात की, नक्की नेमकी कुठली सांगावी असा प्रश्न पडावा. या नाटकाच्या निमित्ताने सौमित्र पोटेंनी तयार केलेल्या व्ह्लाॅगमध्ये एक छान प्रश्न विचारला होता. जशी कुसुम मनोहर लेलेमधील भूमिका दोघेही आलटून पालटून करत होतात, तशी इथेही करणार का? तेव्हा निश्चित असं उत्तर जरी दोघांपैकी कुणीही दिलेलं नसलं तरी दोघेही दोन्ही भूमिकांचे सोने करू शकतात. अशीच भूमिकांची अदलाबदल किशोर कदम आणि गणेश यादव आविष्कारच्या “चित या पट” या प्रायोगिक नाटकात करत; परंतु या अदला बदलीने प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ वगैरे होत नाही या मतावर मी ठाम आहे.


हल्लीच्या काळात दोनदा पाचशे रुपयाचं तिकीट काढून दोघांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका पाहण्याचा आग्रह धरणारा मराठी प्रेक्षक विरळाच. कु. म. ले. मधील दोन्ही भूमिका आलटून पालटून या दोघांनीही चांगल्याच केल्या; परंतु त्या बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या फार नाही, असो. तो आजचा विषय नाही. आजच्या निरीक्षणात “स्थळ आले धावून” या नाटकाविषयी लिहायचे झाल्यास, हे १००% प्रेक्षकप्रिय नाटक ठरेल यात शंका नाही.


डाॅ. गिरीश ओकांचा, चंद्रात्रेय जितका दिलखुलास तितकेच मोनेंच्या फडतरेंच अवघडलेपण अधोरेखित होते, हे मान्य करावंच लागेल. वाटलं होतं त्या मानाने पूर्णिमा तळवलकर या दोघांसमोर चांगल्याच ताकदीने उभ्या रहातात. दुसऱ्या अंकात चंद्रात्रेय जेव्हा एका कुणा व्यक्तीच्या आत्महत्येबाबत बोलतो तेव्हा ती बाॅडी फडतरेंची असावी अशा कयासाने दोन्ही कानावर हात ठेऊन “नाsssही” अशी ठोकलेली आरोळी मात्र विनोदात भर घालते. एकंदरीत दोन अडीज तास हास्याचा धबधबा म्हणता येणार नाही; परंतु पूर्णवेळ चेहऱ्यावर स्मितरेषा खेळवणारं हे नाटक आहे.


संदेश बेंद्रे यांनी तयार केलेल्या नेपथ्याचा मात्र आवर्जून उल्लेख करावा लागेल. नेपथ्य रचना कुठलाही क्राॅस अॅंगल न वापरता पूर्वी नाटकात वापरात आणल्या जाणा पडद्याप्रमाणे टू डायमेंशनल वाटावी अशी ठेवली आहे. त्यात फक्त एकच दिग्दर्शकीय बाब लक्षात घेणे गरजेचे होते, ती म्हणजे मॅक्झिमम एन्ट्रया या प्रेक्षकांच्या उजव्या बाजूने घेतल्या जातात. असे का? या दोन्हींचे लाॅजिकल रीझनिंग सापडत नाही; परंतु हे नाटक संहितेनुसार लिहिल्या गेलेल्या चार “स्थळां”च्या पडद्यावरही होऊ शकते, हा एक विचार मात्र येऊन जातो. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि निर्मिती एक नंबर असल्याने एकदा तरी या नाटकास हजेरी लावण्यास काहीच हरकत नाही.

Comments
Add Comment

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता

मराठी चित्रपटात नावीन्य हवे

युवराज अवसरमल नावीन्याचा ध्यास घेऊन नवीन कलाकृती दिग्दर्शित करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’

मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६

‘रणपति शिवराय : स्वारी आग्रा’, शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

मी मागे माझ्या एका लेखामधे म्हटले होते की, राज्यनाट्य स्पर्धेमधील काही नाटके व्यावसायिक दर्जाची असतातच. त्याला