Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडी

Fast Food Recipe : उपवासाला तेच-तेच खाऊन कंटाळा आलाय? झटपट बनवा 'हे' वेगळे पदार्थ

Fast Food Recipe : उपवासाला तेच-तेच खाऊन कंटाळा आलाय? झटपट बनवा 'हे' वेगळे पदार्थ

मुंबई : अनेकजण देवाच्या भक्तीसाठी उपवास करतात. काही संकष्टी, एकादशीला तर काही सण-वाराला उपवास (Fasting) करतात. परंतु उपवास म्हटले की नेहमीचे साबुदाणा खिचडी, वडे, बटाट्याची उसळ, रताळे असे पदार्थ समोर येतात. पण हे नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे येणाऱ्या आषाढी एकादशीच्या उपवासासाठी तुम्ही असे काही विविध पदार्थ बनवू शकता.




बटाटयाचा शिरा


अनेकांनी आतापर्यंत रव्याचा शिरा खाल्ला असेल. तर काहींनी मुळातच बटाट्याचा शिरा खाल्ला असावा. हा शिरा अगदी झटपट आणि लुसलुशीत बनून तयार होतो. जाणून घ्या हा शिरा बनवण्याची पद्धत.


साहित्य : ५-६ उकडलेले बटाटे, २ कप साखर, ४ ते ५ चमचे तूप, १/२ वाटी काजू-बदामाचे तुकडे


कृती : 




  • बटाटयाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे नीट स्वछ पाण्याने धुवून घ्या.

  • यानंतर हे बटाटे उकडून घ्या. नंतर बटाटे उकडल्यानंतर ते थंड करून यांची साल काढा. त्यानंतर या बटाट्यांना नीट मॅश करा.

  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि या कढईत तूप घाला. यानंतर यात मॅश केलेली बटाटे टाका आणि छान परतून घ्या. पाच मिनिटे मंद आचेवर परतल्यानंतर यात साखर घाला. साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण चांगले ढवळून घ्या.

  • त्यानंतर यात बारीक केलेले काजू-बदामाचे तुकडे घाला.

  • हे सर्व मिश्रण पुन्हा २ ते ३ मिनिटे शिजू द्या आणि मग गॅस बंद करा.

  • अशाप्रकरे तुमचा उपवासाचा गरमा गरम आणि लुसलुशीत शिरा बनून तयार होईल.



साबुदाण्याचे थालीपीठ


साहित्य : साबुदाणा, २ बटाटे, शेंगदाणे, १/२ कप राजगिरा पीठ, दोन हिरव्या मिरच्या, तूप, जिरे, लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ, एक कप दही


कृती : साबुदाणे दोन-तीन वेळा पाण्याने धुवून घ्या व नंतर दोन तास चाळणीत भिजवून ठेवा. दोन बटाटे उकडवून घ्या व त्याला व्यवस्थित कुस्करून घ्या. नंतर १/४ कप शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या व मिक्सरमध्ये बारीक करा. आता साबुदाणा, २ बटाटे, शेंगदाणे, १/२ कप राजगिरा पीठ, दोन हिरव्या मिरच्या, तूप, जिरे, लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ, एक कप दही हे सर्व साहित्य एका भांड्यात एकजीव करुन पीठ तयार करुन घ्या.


यानंतर पोळपाटावर एक प्लास्टीकचा तुकडा ठेवा. त्यावर तेल लावून घ्या व त्यावर साबुदाण्याचे पीठाचा एक तुकडा घेऊन हलक्या हाताने त्याला पसरावा. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, थालीपीठ जास्त पातळ करु नये थोडे जाडच ठेवावे. यानंतर मध्यम आचेवर तवा ठेवा. थालीपीठ तव्यावर टाका व हलक्या हाताने दाब द्या. तूप लावून लाल होईपर्यंत भाजा. हे थालीपीठ तुम्ही चटणी अथवा दही, कोशिंबीरसोबत खाऊ शकता.



उपवासाचा चाट


साहित्य : दोन बटाटे, दोन रताळे, उपवासासाठी चालणारे कोणतेही पीठ, हिरवी चटणी, गोड लाल चटणी, दही, उपवासाचा चिवडा, ड्राय फ्रुट्स हे साहित्य लागेल.


कृती : सर्वप्रथम बटाटा आणि रताळे उकडून घ्या. त्यांचे साल काढून ते बारीक करा. त्यानंतर त्यात उपवासासाठी लागणारे पीठ मिसळून गोळा करुन घ्या. त्यानंतर यात ड्रायफ्रूट्स घालून हे मिश्रण ते दहा ते पंधरा मिनिटे तव्यावर फ्राय करून घ्या. अशा प्रकारे तुमची टिक्की तयार होईल.


हिरवी चटणी तयार करण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकून हे मिक्सरमधून काढून घ्या आणि त्यावर लिंबू पिळून घेतल्यावर हिरवी चटणी तयार होते. गोड चटणी तयार करण्यासाठी आमचूर पावडर पाण्यात मिक्स करायचे. त्यामध्ये थोडे गूळ घालून हे मिश्रण शिजवून घ्या. शिजवून झाल्यानंतर त्याला फोडणी घालायची. त्यामध्ये तूप आणि थोडे जिरे घालून आणि तिखट घालायचे आणि हे मिश्रण गरम करून घ्यायचे अशा प्रकारे लाल गोड चटणी तयार होते.


हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्ही बनवलेल्या टिक्कीवर लाल-तिखट चटणी टाका व त्यावर उपवासाचा चिवडा टाकून घ्या. अशाप्रकारे तुमचा उपवासाचा चाट तयार होईल.




साबुदाण्याचा डोसा


प्रथम साबुदाणा धुवा. त्यानंतर साबुदाणा ४ तास भिजत घाला व भगर अर्धा तास भिजवून घ्या. मिक्सरमध्ये साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटा. या मिश्रणामध्ये मीठ घाला. हे मिश्रण तव्यावर टाकून याचा डोसा तयार करा.

Comments
Add Comment