सुरेश भट म्हणजे सतत सजणारी शब्दांची एक मैफलच होती. या मैफलीचे अत्यावश्यक घटक होते-रात्र, धुंदी, हरवलेपण, तारकांनी खचाखच भरलेले आकाश आणि एक अत्यंत तरल, प्रेमाला आसुसलेले मन. त्यांनी ‘निवडुंग’सारखे अत्यंत रुक्ष नाव असलेल्या सिनेमासाठीही अशीच एक गझल दिली. तीसुद्धा किती तरल, नाजूक आणि उत्कट भावनांनी भरलेली होती!
‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली.
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली’
अनेक दिवसांच्या विरहानंतर आलेली ही मीलनाची रात्र खरेच धुंद करणारी होती. त्यामुळे भान हरपून केलेल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीत हरवलेल्या कवीला पहाटे कळले की, ‘अरे! रात्र तर उलटून गेली आहे. सगळी धुंदी संपली आहे.’ यावर कवीची तक्रार ही आहे की, मला तिला क्षणभरही डोळ्यांपासून दूर होऊ द्यायचे नव्हते; पण रात्रभरच्या जागरणाने चुकून केव्हा तरी डोळा लागला आणि तेवढ्यात ती निघून गेली. हे दु:खही सुरेशजी कसे शृंगारिकपणे सांगतात पाहा –
‘कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी.
कळले मला न केव्हा, निसटून रात्र गेली.’
‘सुटली मिठी जराशी’ हा तसा किती खासगी, नाजूक, व्यक्तिगत अनुभव! तोही सुरेशजी सहज सार्वजनिक करून टाकतात आणि गुलजारसारखे नामानिराळे होतात.
‘मेल्यावरी जगाचे आभार मानले मी,
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी,
आयुष्य संपताना इतकीच खंत होती
काही भिकारड्यांना दिलदार मानले मी’
अशी रोखठोक भाषा वापरणारे सुरेशजी हवे तेव्हा अतिशय रोमँटिक होतात आणि जसा गुलजार श्रोत्यांना त्यांच्या लेखणीच्या बाइकवर बसवून, वेगवेगळ्या भावनांच्या ‘मौत का कुवाँ’मध्ये गरगर फिरवून, मनात अतितरल भावनांचे मोहोळ उठवून साळसूदपणे निघून जातो, तसे सुरेशजीही सुटून जातात. ‘मी इतका गाफील होतो की, ती निसटून गेली तरी मला कळले नाही.’ हे त्यांचे दु:ख आहे. इथे ‘ती’ म्हणजे रात्र आहे, जीवनाचा बेधुंद आनंद अनुभवण्याची यौवनावस्था आहे की कवीची प्रेयसी, हे कळत नाही. ते बहुधा त्यांनी मुद्दाम अस्पष्ट ठेवले असावे.
कवी म्हणतो, जाग आली तेव्हा सकाळ झालेली आहे. सर्वदूर दिवसांचे आश्वासक कोवळे ऊन पसरले आहे. मात्र मध्येच स्वप्नभंग झाल्याने, जगण्याची सगळी लयच बिघडली आहे. जणू माझा श्वाससुद्धा उसवला आहे. कसल्या या उपमा सुरेशजींच्या! ‘श्वास उसवला?’
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे.
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!
ही ओळ ऐकताना मला नेहमी लहानपणीची उन्हाळ्यातली एक आठवण येते. त्यावेळी उन्हाळ्यात आम्ही हमखास बाहेर झोपायचो. अंगणात किंवा गच्चीवर! उशिरापर्यंत गप्पा मारत, आकाशातले तारे बघत, धूमकेतूंचे कोसळणे न्याहाळत आम्ही कधी झोपी गेलो कळायचेही नाही. सकाळी अंगावर उन्हे पडली की, अर्धवट झोपेत अंथरूण-पांघरूण गुंडाळून घेत घाईघाईत, घरात जायचो. तशी सुरेश भटांची पहाट चक्क चांदण्यांनी भरलेले आकाशच उचलून निघून जाते! कसल्या उपमा आणि कसल्या भन्नाट कल्पना!
कवीला म्हणून जे स्वातंत्र्य असते, ते गुलजार इतके अनिर्बंधपणे कुणीच वापरले नसेल. सुरेश भटही कधी कधी मनस्वीपणे ते उपभोगत. चांदण्या कुठे आवाज करतात का? पण सुरेशजींनी म्हटल्यावर आपल्याला दूरवर कुठे तरी चांदणे कुजबुजते आहे, गुणगुणते आहे असे वाटू लागते. कविवर्य म्हणतात, माझी रात्र मला अशी गाफील ठेवून निघून गेली, तरी मनात चांदण्यांचे काही स्वर, काही अस्पष्ट आवाज राहून गेलेच. ती मात्र काळ्याभोर आकाशात चमचमणारे अगणित रंगीबेरंगी तारे, तिचा सगळा शृंगार, सगळे वैभव, उचलून निघून गेली-
उरले उरात काही आवाज चांदण्याचे…
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!
सगळी मैफलच अशी अर्धवट संपली. मग मला भैरवीच्या, निरोपाच्या ओळी तरी कशा आठवणार; पण जाताना तिने एक सत्य सांगितले. काहीही टिकणारे नाही. सगळे क्षणभंगुर आहे. शाश्वत आहे तो फक्त सगळ्याचा शेवट! शेवटची ओळ हीच खरी. तोच सगळ्याचा निष्कर्ष, सगळ्या जगण्याचे तात्पर्य! शेवट हाच जगण्याच्या सगळ्या सोहळ्याचा अन्वयार्थ!
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!
हृदयनाथ मंगेशकरांनी आशाताईंच्या मधाळ आवाजाने आणि त्यांच्या कर्णमधुर संगीताने गझल अक्षरश: सजवली होती. मात्र त्यांनी या रचनेतील दोन कडवी गाळली आहेत.
सुरेशजींना गाफील ठेवून, निसटून गेलेली रात्र नेमकी कोण, ते आपल्याला अखेरपर्यंत कळत नाही. बालपणीचा खेळकर, रम्य काळ संपताच झटकन येऊन काही कळायच्या आतच नकळत संपलेल्या यौवनाच्या उत्सवाला दिलेली ती उपमा आहे की, ती रात्र म्हणजे सगळे भावविश्व घेरून टाकून, मग प्रणयस्वप्न अर्धवट सोडून निघून गेलेली प्रेयसी आहे की, केवळ धुंद शृंगाराची एक रात्र आहे, हे तुमचे तुम्ही बघा, असे म्हणत कविवर्यही हलकेच निघून जातात; पण जेव्हा ते म्हणतात, माझ्या कुशीत मी जिला घेऊन झोपत असे, ती चंद्रकोर आता माझ्याकडे नाही म्हणजे नक्की बालपण सरले आहे.
तारुण्याच्या स्वप्नांचा काळही हरवला आहे आणि काळाने कूस बदलल्याने निवृत्तीचा, सगळ्यातून माघार घेण्याचा काळ सुरू झाला आहे. अवघ्या भावविश्वाला घेरणारे एकटेपण आहे.
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी…
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली.
मात्र जशी ज्योत विझताना मोठी होते, अधिक फडफडते तसे मनाचे आणि त्यात दाटी करणाऱ्या स्मृतींचेही असते. कवीला अजून तारुण्यातील त्या बेधुंद रात्रीचा, त्या शुभ्र, सुंगधी शृंगाराचा सुवास आठवत राहतो. यौवनाने साथ सोडली, आता तर तीही गेली, सत्यात नाही निदान स्वप्नात तरी सुख अनुभवू. या म्हटले तर स्वप्न दाखवू शकणारी रात्रही सरली आहे! मात्र आठवणींच्या फुलांचा गजरा तसाच शिल्लक आहे! हे दु:ख आहे की, हा आनंद आहे, ते सांगताच येणार नाही, अशी अवस्था!
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा…
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली?
जुन्या काळी चित्र रंगवायच्या स्पर्धा असत. त्यात केवळ काही ठिपके काढून, एखादे चित्र सूचित केलेले असायचे. ते जोडून त्यात आपण हवे ते आपले रंग भरायचे असत.
काही कवी असेच आपल्या मनाच्या कॅनव्हासवर काही ठिपके उमटवून बाजूला होतात. आपले चित्र, आपला संदेश, आपला अर्थ आपणच शोधायचा असतो. आपले दु:ख किंवा आपला आनंद आपणच साजरा करायचा असतो. मजा येते ना असल्या खेळात?
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…