अनुभव

कथा - रमेश तांबे


रात्रीचे १० वाजले होते. शैलू टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसला होता. त्याचे आई-बाबा एका लग्नानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे आजची रात्र तो एकटाच घरी थांबणार होता. खरं तर आई-बाबांसोबत तो मुद्दामच गेला नाही. कारण त्याला एकट्यालाच घरात राहण्याची मजा अनुभवायची होती. झोपण्यापूर्वी त्याने दरवाजे-खिडक्या नीट लावून घेतल्या आणि तो पलंगावर पडला.


अंगावर पांघरून घेऊन, शैलू झोपण्याचा प्रयत्न करू लागला; पण त्याला झोपच येईना. त्यामुळे त्याची बैचेनी वाढली. देवघरातला पिवळा बल्ब सुरू होता. त्याचा अंधुुकसा पिवळा प्रकाश घरात पडला होता; पण तो प्रकाश शैलूला आता नकोसा वाटू लागला. त्याने तो बल्ब बंद केला आणि पलंगावर पुन्हा आडवा झाला; पण तितक्यात दूरवरून कुत्र्यांचे रडल्यासारखे भुंकणे ऐकू येऊ लागले. कुत्र्यांचे असे भुंकणे अपशकुनी असते, असे कालच कुणी तरी शैलूला सांगितले होते, त्यामुळे शैलू अधिकच बैचेन झाला.


थोड्या वेळाने कुत्र्यांचे रडणे बंद होऊन, घरातच चकचक असा आवाज येऊ लागला. एक-दोन नाही, तर तीन तीन आवाज! आवाज ऐकून शैलू जरा घाबरला, तरी सगळा धीर एकवटून तो उठला आणि त्याने लाइट लावली, तर घरात काहीच दिसेना. त्याने भिंतीवर निरखून पाहिले, तेव्हा त्याला तीन काळ्याकुट्ट पाली भिंतीवर दिसल्या. त्यांना बघून शैलूच्या अंगातून भीतीची एक लहर सळसळत गेली. पालींना हाकलून द्यावे, असे त्याला वाटत होते; पण हिंमत होत नव्हती. मग शैलूने पिवळा बल्ब चालूच ठेवला आणि अंगावर चादर ओढून घेतली.


तितक्यात फळीवरचा एक ग्लास खाली पडला आणि मोठा आवाज आला. आता मात्र शैलू खूपच घाबरला. अशा गोष्टी आताच का घडतात आणि तेही मी घरात एकटाच असताना. शैलू विचार करू लागला. तेवढ्यात एक खिडकीसुद्धा आपोआप उघडली आणि गार वारा सूं सूं करीत घरात शिरला. आपण तर सर्व खिडक्या लावून घेतल्या होत्या. मग ही खिडकी कोणी उघडली? कधी उघडली? ही भुताटकी तर नाही ना! त्याचं मन सैरावैरा धावू लागलं. खरं तर उठून खिडकी लावण्याचेही त्राण त्याच्या अंगात उरले नव्हते. कारण भीती आता त्याच्यावर स्वार झाली होती; पण थंडगार वारा भराभरा शिरत होता. त्यामुळे खिडकी बंद करणं आवश्यक होतं. सर्व बळ एकत्र करून शैलू उठला आणि खिडकी बंद करू लागला. तितक्यात खिडकीच्या बाहेर त्याला काही तरी हालचाल जाणवली. कोण आहे? असं दोन वेळा ओरडला; पण कुणाचाही आवाज आला नाही. घाईघाईनेच त्याने खिडकी बंद केली. तितक्यात धप्प असा आवाज आला; पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत, तो पलंगाकडे परत निघाला; पण येता-येता एक उंदीर त्याच्या पायाखाली आला आणि शैलू चांगला धडपडला.


पलंगावर पडून छताकडे बघता-बघता शैलूला आई-बाबांची आठवण येऊ लागली. मी लग्नाला गेलो असतो, तर बरे झाले असते; आईचे आपण ऐकायला हवे होते, असे त्याला वाटू लागले. आता ही भयानक रात्र एकट्याने कशी काढायची, त्या विचाराने त्याला भडभडून आलं. आई-बाबांसोबत आपण किती बिनधास्त असतो, याची जाणीव शैलूला झाली. आता यापुढे एकट्याने कधीही थांबायचं नाही, असा विचार करत असतानाच, दरवाजाची कडी वाजली. कडीचा आवाज आला, तेव्हा शैलू तोंडावर पांघरून घेऊन पडला होता. आपल्याला कडीच्या आवाजाचा भास का होतोय. नको नको ते आवाज का येतातय, या विचाराने त्याने दोन्ही हाताने कान बंंद केले, तरीही कडीचा आवाज येतच होता. आता तर जोरजोरात कडीचा आवाज येऊ लागला.


इकडे शैलूला दरदरून घाम फुटला. कोण आहे? कोण वाजवतंय कडी? आई-बाबा तर उद्या येणार आहेत. कोणी चोरटे आहेत की भुताटकी? की मला नुसताच भास होतोय? शैलू आता रडू लागला. आईच्या नावाने टाहो फोडू लागला. आता तर कडीबरोबर खिडकीवर सुद्धा थापांचा आवाज येऊ लागला. आवाजाचा जोर वाढला. तसा शैलू दरवाजाजवळ गेला आणि जोरात ओरडला, “कोण आहे?” तितक्यात आईचा आवाज आला, “अरे शैलू दरवाजा उघड मी आहे. बाबासुद्धा आले आहेत.” मग शैलूने घरातली लाइट लावली आणि हळूच खिडकी उघडली. समोर पाहतो तर त्याला आई दिसली. तिला बघताच शैलू ओरडला, “आई.” मग त्याने धावत जाऊन दरवाजा उघडला आणि आईला मिठी मारून हमसाहमशी रडू लागला. डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली की, “रडू नकोस शैलूबाळा.” मला माहीत होतं तुला एकट्याला नाही जमणार राहायला म्हणून मी परत आले तुझ्यासाठी.” मग दहा मिनिटांतच शैलूला आईच्या कुशीत झोप लागली. अगदी शांत, अगदीच गाढ!

Comments
Add Comment

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावर...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा

२०२५ वर्षात काय कमावले, काय गमावले

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात प्रत्येक वर्ष हे अनुभवांचे दालन उघडते. २०२५ हे वर्षही तसेच

भाषणाची भीती

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. त्याच्या राज्याचा एक नियम होता की जो कोणी चोर सापडेल त्याला भुकेलेल्या सिंहाच्या

सूर्य पूर्वेकडेच का उगवतो?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन्ही बहिणी खूपच चौकस होत्या. सुट्टीनिमित्ताने त्यांची प्राध्यापिका

आकाश रात्री काळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने

मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात