Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपावसाच्या पाण्याचे नियोजन हवे!

पावसाच्या पाण्याचे नियोजन हवे!

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होताना दिसते. त्यामुळे समाधानकारक पाऊस पडून सुद्धा राज्यातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येते. तेव्हा पावसाळ्यात पावसाचे पाणी अडवावे लागेल. त्याची साठवणूक करावी लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, अडविलेले पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे झाडे सुद्धा लावली पाहिजेत. यामुळे साठविलेल्या पाण्याचे कमी बाष्पीभवन होण्याला मदत होईल. अशा प्रकारे पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास राज्यातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.

जून महिन्यात अधूनमधून पावसाचे आगमन झाले तरी जुलैच्या पहिल्या आठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे. कोकण विभागाचा विचार करता कोकणात अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जिकडे-तिकडे पाणीच पाणी दिसत होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली की पाण्याच्या नियोजनासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन विशेष बैठका आयोजित करीत असतात. तोपर्यंत पावसाचे आगमन होऊन नदी-नाले धोक्याच्या पातळीच्या वर तुडुंब भरून वाहत असतात. यामुळे अनेक वाड्यांतील घरे पाण्याखाली गेलेली पाहायला मिळाली. यात अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. केवळ कोकण नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पावसाचे पाणी कसे साठवून ठेवता येईल त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी नदी-नाल्या वाटे समुद्राला जाऊन मिळते. तेव्हा वाहून जाणाऱ्या पाण्याची कशा प्रकारे साठवणूक करू शकतो याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाऊस गेल्यावर उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा लागेल.

राज्यात पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा विचार करता पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे अतिशय महत्त्वाचे असते. सध्या पाण्याची किंमत आपल्याला समजणार नाही. मात्र त्याच पाण्याच्या थेंबाची किंमत पाणीटंचाईच्या वेळी समजते. आपण सर्व काही करतो मात्र पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे नियोजन करत नाही. केवळ पाणी अडवा आणि पाणी जिरवा इतकाच नागरिकांना सबुरीचा संदेश देतो. पाऊस असा काय येतो की, आपल्याला घराच्या बाहेर पडायला सुद्धा देत नाही. रात्रीचे जागे राहावे लागते. नदीनाले एक होतात. मग जायचे कुठे हा पण एक प्रश्न असतो. दुसऱ्या दिवशी प्रशासन येते आणि शाळेत राहायचा सल्ला देते; परंतु त्यांच्याबरोबर असणारे बैल, गाई, कुत्रा, मांजर, लहान वासरे, म्हशी यांचे काय? तेव्हा ज्या भागात नागरिकांना पावसाळ्यात पूरस्थितीला सामोरे जावे लागते त्यांचे योग्य ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. नुकसान झाल्यावर तुटपुंजा मदतीचा हात पुढे येतो. अशात पावसाळा केव्हा संपतो हे कळतच सुद्धा नाही. नंतर हिवाळा सुरू होतो. त्यात थंडी असल्यामुळे पाण्याकडे दुर्लक्ष होते. त्यानंतर उन्हाळा सुरू होतो. त्यात लागलीच पाणीटंचाईच्या बातम्या वाचायला मिळतात.

मुख्य म्हणजे राज्यात ज्या भागात नागरिकांना उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जायची वेळ येते त्या भागात खऱ्या अर्थाने पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. प्रत्येक बांधावर झाडे लावली पाहिजेत. पावसाळ्यात विहिरी खोदण्यापेक्षा उन्हाळ्यात विहिरींचे खोदकाम करावे. त्यासाठी जल तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. पावसाचे पाणी वाहून न घालविता ते अडवून जमिनीत कसे जिरविता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावे. पाणी दूषित होऊ नये म्हणून त्या विभागातील सांडपाण्याचे नियोजन करावे लागेल. जंगलामध्ये बंधारे बांधावे लागतील. ते सुद्धा बंधाऱ्याच्या पायथ्याशी लोकवस्ती असता कामा नये. कारण तिवरे धरणाचे काय झाले याची सर्वांना माहिती आहे. नंतर खेकड्यांना दोष देण्यापेक्षा खेकड्यांना चार हात दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे असे बंधारे उन्हाळ्यात बांधावेत. त्याचप्रमाणे बंधाऱ्याच्या आसपास जर मोकळी जागा असेल, तर त्या जागेवर वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण करावे.

बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्याच्या आसपास झाडे नसल्यामुळे उन्हाळा सुरू होताच बंधारा कोरडा होतो. काही ठिकाणी दोन डोंगरांमध्ये बंधारा बांधला जातो. मात्र त्या पाण्याचा नागरिकांसाठी वापर करता आला पाहिजे. काही गावांमधील नद्यांवर कोल्हापूर टाईप (केटी) बंधारे बांधण्यात आलेले आहेत. मात्र त्यांना दरवाजे आहेत. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढण्याला सुरुवात झाली की बंधाऱ्याचे दरवाजे उघडले जातात. नंतर हिवाळ्यात पाणी कमी होऊ लागले की दरवाजे बसविले जातात. त्यामुळे उन्हाळ्यात त्या गावाला पाण्याचा उपयोग होत असतो. तसेच आजूबाजूच्या गावातील विहिरीची पातळी कमी झाली की त्या धरणाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे आजूबाजूच्या गावांच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढण्याला मदत होते. अशा वेळी शासनाने योग्य प्रकारे पुढाकार घ्यावा. पाण्यासाठी कोणतेही राजकारण करू नये. यासाठी शासकीय स्तरावर नि:पक्षपातीपणे शासनाला काम करावे लागेल. यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करता कामा नये. जेव्हा नागरिकांचे नैसर्गिक नुकसान होते तेव्हा राजकीय मंडळी धीर देत असतात. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काम करीत असतात. त्याचप्रमाणे नागरिकांना सूचना देत असतात. तेव्हा पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाची काळजी प्रशासनाने घेऊन जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -