जागा कमी असल्याने राम मंदिर ट्रस्टने घेतला निर्णय
अयोध्या (वृत्तसंस्था) : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून दररोज एक लाखांहून अधिक रामभक्त येत आहेत. राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर एक दिवसही रामभक्तांचा दर्शनासाठीचा ओघ कमी झालेला नाही. राम मंदिरातील गर्भगृहात जाण्यासाठी भाविक सिंह गेटमधून जातात. तेथून रंगमंडपानंतर गर्भगृहात पोहोचतात. सिंह गेटमधूनच भाविकांना रामाचे दर्शन होते. ५० हजाराहून अधिक भाविक एकाच वेळी रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतात. परंतु, रामलल्ला दरबारात असे होणे शक्य नाही. कारण, राम दरबाराची जागा कमी आहे. जागेअभावी सर्वच भाविकांना राम दरबारात दर्शन घेता येत नाही.
रामलल्ला दरबाराची जागा तुलनेने छोटी असल्याने राम मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी राम दरबाराची स्थापना केली जाईल, त्या ठिकाणी सर्वसामान्यांना जाता येणार नाही. काही मोजकेच भक्त राम दरबाराला भेट देऊ शकतील. कारण दर्शनासाठी एक लाख भाविक एकत्र आले तर ते तेथे सामावणे शक्य नाही. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर जागेअभावी असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गोपाल राव यांनी दिली.
ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता लाखो भाविक, पर्यटक दररोज अयोध्येत दाखल होत आहेत. रामदर्शनाची ओढ भाविकांना लागलेली आहे. केवळ देशातून नाही, तर परदेशातूनही भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. राम मंदिरात आता रामलला दरबाराचे बांधकाम सुरू आहे. राम मंदिरात वरील मजल्यावर रामललाचा दरबार असणार आहे. या राम दरबारात प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या प्रतिमा असणार आहेत. मात्र सर्वसामान्यांना राम दरबारात जाता येणार नाही, असे सांगितले जात आहे. राम मंदिराचे प्रशासक गोपाल राव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे