मुंबई : हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला पालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने जीवनदान दिले आहे. या रुग्णावर नुकतीच हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक केईएम रुग्णालयात प्रथमच अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदय प्रत्यारोपणासारखी अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरू करणारे केईएम हे भारतातील एकमेव पालिका रुग्णालय ठरले आहे. केईएम रुग्णालयात हृदय आणि यकृत प्रत्यारोपण उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
केईएम रुग्णालयामध्ये सन १९६३-६४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. ही बाब अति पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. केवळ संसाधनांच्या उपलब्धतेने यात यश येणे शक्य नव्हते तर उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळालाही यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे होते. त्यामुळे, डॉ. शिंदे यांनी सर्वप्रथम पालिकेच्या संपूर्ण आरोग्य प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी वारंवार विचारमंथन केले. विशेषतः केईएम रुग्णालयातील वैद्यकीय चमूला विश्वासात घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले.
अशा खंबीर प्रोत्साहनामुळे आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास दुणावला आणि केईएममध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपक्रम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी यासाठी प्रशासनाला तात्पुरता परवाना (प्रोव्हिजनल लायसन्स) मिळाला. त्यानंतर हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करण्यात आली. यासाठी डॉ. सुधाकर शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा जास्त बैठका घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी तसेच त्यासाठी आवश्यक सर्व उपकरणे घेण्यासाठी विचारमंथन केले, पाठपुरावा केला. त्यानंतर २० पेक्षा जास्त अत्यंत उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे घेऊन तसेच अत्यंत अनुभवी आणि समर्पक वैद्यकीय चमूंच्या साहाय्याने सुसज्ज विभाग कार्यान्वित करण्यात झाला आहे.
गरजू रुग्णांना बरेचदा योग्य उपचार मिळत नाही आणि परिणामी त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. पालिका प्रशासन मुंबईतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. मोठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, विशेष रुग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदींच्या माध्यमातून उत्तम रुग्णसेवा दिली जात आहे. झिरो प्रिस्क्रिप्शनसारखे धोरण राबविले जात आहे. एकंदरीतच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देणे तसेच नागरिकांना घरानजीक आणि किफायतशीर दरांमध्ये उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कायम प्रयत्नशील राहील, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात साधारणता खर्च रुपये ३५ लाख इतका येतो. तथापि बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा खर्च ८ लाख रुपये इतका असेल. महानगरपालिकेच्या पुढाकाराने हाही खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजना, माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि माननीय पंतप्रधान सहाय्यता निधी या द्वारे करण्यासाठी सहाय्य केले जाते.