गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला
एक मोठ्या भजन संध्येच्या कार्यक्रमाचे निवेदन करून घरी आलो. हा कार्यक्रम संपन्न व्हायला रात्रीचे ११.३० नक्कीच होऊन गेले होते. घरी आल्यावर लगेच या कार्यक्रमातील एक मोठे गायक, प्राध्यापक तसेच संगीततज्ज्ञ प्रा. नानासाहेब भडके यांचा फोन आला. तेदेखील नुकतेच घरी पोहोचले असावेत. त्यांनी एका रचनेचा स्क्रीनशॉट मला पाठविला आणि म्हणाले, “ही रचना स्वतः समर्थ रामदास स्वामींची आहे. उद्या एका कार्यक्रमात मला ही रचना सादर करायची आहे; पण शब्दांचा अर्थ लागत नाही, तरी तुम्ही आताच (रात्रीच) या रचनेचा अर्थ मला सांगावा.”
रचनेचे शब्द आहेत –
महाराज तुम्हारो प्रीतl
आन न खावे पान न भावेl
जानत नाही कछु रीतll
पिरत के जन दास तुम्हारोl
चीर न लेवे सितl
आन न खावे पान न भावेl
देखो बदन की रीतll
रचना द्विपदी (दोहा) स्वरूपातील आहे; पण मला भडके सरांनी दोनच पदे पाठविली होती. मी रचना वाचली आणि त्यांना विनम्रपणे म्हणालो की,
“सर मी प्रयत्न करून बघतो.” यावर ते पुन्हा म्हणाले की, “मी तीन-चार जणांना ही रचना पाठविली व अर्थ विचारला आहे; पण अजूनपर्यंत कोणाचेच उत्तर आले नाही. माझा कार्यक्रम उद्याच आहे. त्यामुळे तुम्ही मला रात्रीच अर्थ सांगा.”
मुख्य म्हणजे रचना समर्थ रामदास स्वामींची. अखिल जगताला बोध देणारे श्री समर्थ. त्यांच्या रचनेवर भाष्य करणे, काही तरी सांगून मोकळे होणे, माझ्या मनाला पटण्यासारखे नव्हते. मुख्य म्हणजे यापूर्वी मी ही रचना कधीही ऐकलेली अथवा वाचलेली नव्हती. प्रथम मला या ओळी तुलसी रामायणमधील असाव्या असे वाटले. यातील भाषासुद्धा थोडी वेगळी होती (ब्रज किंवा अवधी या प्रकारातली) आणि अर्थ रात्रीच लिहून पाठवायचा होता. श्री रामरायांचे चिंतन करून मनोभावे प्रार्थना केली. ते शब्ददेखील समर्थांचेच.
नेटके लिहिता ये नाl
वाचता चुकतो सदाl
अर्थ तो सांगता ये नाl
बुद्धी दे रघूनायेकाll
आणि रचना पुन्हा एकदा वाचली. मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल…
हळूहळू त्या दिव्य शब्दांचा अर्थ उलगडू लागला. तो रामरायांच्या कृपा प्रसादाने जसा सुचला तसा आपणास सांगतो.
“हे श्रीरामा तुमच्या भक्तीचे (तुमच्या नामाचे) प्रेम (वेड) ज्याला लागलेले असते, त्याला अन्न-पाणी (आन न खावे पान न भावे) तर गोड लागत नाहीच; पण त्यांना स्वतःचे हित/अहित देखील लक्षात येत नाही. जन रीतीचे देखील भान असत नाही. (जानत नाही कछु रीत). अनेक विदेही संतांची अशीच अवस्था असते. तसेच रामचरणी लीन असणाऱ्या भगवत भक्ताची अवस्था अशीच असते (उत्कट भाव समाधी)
एवढेच काय, प्रभू श्रीरामा असे तुमच्या ठायी भक्तीचा, प्रीतीचा ध्यास लागलेले भक्त (पिरत के जन दास तुम्हारो) तुझ्या भक्तीत इतके तल्लीन झालेले असतात की, त्यांना अंगावर स्वच्छ वस्त्र (चिर) परिधान करायची देखील शुद्ध राहत नाही, तर शरीराच्या अवस्थेची गोष्टच न्यारी (देखो बदन की रीत).
ही रचना श्री समर्थांनी केलेली असून, या रचनेमधून हे निश्चित सिद्ध होते की, समर्थांना संगीताबद्दल परिपूर्ण ज्ञान होते. तसेदेखील आपली संतमंडळी ही नुसती संतच नव्हती, तर त्यांना शास्त्र, वेद, पुराणे, उपनिषदे या अध्यात्मिक ग्रंथ संपदेचा अभ्यास तर होताच, त्यासोबतच शास्त्र, कला, संस्कृती, व्याकरण यांचेदेखील सखोल व समग्र ज्ञान होते.
म्हणूनच ते संस्कृती आणि सद्विचार टिकवून, आपल्या सर्वांचे ठायी रुजवू शकले. हा अर्थ स्फुरला. मी आनंदित झालो. जसं जमलं तसे लिहून, रात्री २ वाजता भडके सरांना हा अर्थ सांगितला. भडके सर माझ्या उत्तराची वाट बघत जागेच होते. त्यांना हा अर्थ ऐकून खूप समाधान आणि आनंद झाला. पुढे त्यांनी काही मोठ्या लोकांच्या (अाध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी मंडळी) माध्यमातून ही रचना आणि अर्थ समर्थ चरणी सज्जनगड येथे पाठविला. त्या मंडळींचे “अर्थ बरोबर आहे” असे उत्तर प्राप्त झाल्याचे, मला नाना साहेबांनी सांगितले. त्यावेळी तर माझे अंतःकरण आनंदाने भरून आले. पण भडके सरांसारखा रामभक्त रात्री रचनेचा अर्थ मी लिहून, त्यांना पाठवेपर्यंत जागाच होता.
खरंच… श्री रामा…
पिरत के जन दास तुम्हारो
🙏जय श्रीराम