सेवाव्रती: शिबानी जोशी
ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे सर्वाधिक संवेदनक्षम व अशांत मानली जातात. आज भारतीय सैन्य आणि अनेक स्वयंसेवी संघटनांच्या कामातून तिथे अनेक प्रकारची विकासाची कामे चालत आहेत. तरीही दिसण्यामध्ये वेगळेपण त्याशिवाय घुसखोरी, धर्मांतरण अशा समस्यांमुळे इथले रहिवासी स्वतःला भारतीय समजतच नाहीत. इथला रहिवासी उर्वरित भारतात जाऊन परत आला की, तू इंडियात जाऊन आलास का? असे विचारले जात असे. आज मात्र हळूहळू आपण इंडियन आहोत अशी जाणीव त्यांना होऊ लागली आहे आणि याला कारण सरकारच्या अनेक योजना तसेच स्वयंसेवी संस्थांच कार्य असे म्हणता येईल.
ईशान्य भारताची नक्की परिस्थिती काय आहे? समस्या नेमकी कोणती आहे? फुटीरतेला खतपाणी घालणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे सामान्यांना मिळत नाहीत. प्रसारमाध्यमेसुद्धा ईशान्य भारताच्या बाबतीत फारच कमी नोंद घेतात. विशेषतः त्यांचे चेहरे हे मंगोलियन फेस कट असल्यामुळे उर्वरित भारतातील किंवा अन्य राज्यातील नागरिकांच्या चेहऱ्याशी मिळते-जुळते नसतात व त्यामुळे ते चिनी आहेत, तिबेटी आहेत, नेपाळी आहेत अशा प्रकारचा अप प्रचार व भाव दिसून येतो. त्यामुळे तिथे देशविरोधी वातावरण तयार व्हायला खतपाणी मिळते.
संघाच्या कार्यकर्त्यांचे हे वैशिष्ट्य आहे की “कमी तिथे आम्ही”, अशा परिस्थितीचा परिणाम संवेदनशील व्यक्तींवर झाला नाही तरच नवल. अशीच एक व्यक्ती होती ती म्हणजे भैयाजी काणे. संघाचे ईशान्य भारतात जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ काम सुरू आहे. व्यवसायाने भैयाजी काणे शिक्षक होते, पण पूर्वोत्तर राज्यांचा अभ्यास करताना संवेदनशील असल्याने त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल? याचा विचार सुरू केला व त्यातून त्यांना अशी कल्पना सुचली की तेथील मुलांना शिक्षणासाठी इथे आणावे व त्यांच्यावर राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार करावेत, काणे यांना तिथेच शाळा सुरू करून शिकवता आले असते; परंतु त्यांनी मुले इकडे आणण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलांनाही उर्वरित भारताची ओळख व्हावी तसेच आपणही त्यांच्यातील आहोत ही भावना निर्माण व्हावी आणि इथल्या नागरिकांनाही हे लोक आपलेच नागरिक आहेत ही भावना रुजावी, असे भैयाजी काणे यांना वाटले आणि यासाठी काळे यांनी अशा मुलांना इथे आणायला सुरुवात केली. पण अशी मुले तिथून कशी आणता येतील? हे काम काही तितकेसे सोपे नव्हते. तिथल्या पालकांचा विश्वास मिळवणे हे मोठे काम होते. त्याच्या आई-वडिलांची समजूत घालून मुलांसाठी अशा प्रकारचे वसतिगृह सांगली इथे सुरू केले.
मुलींसाठी सुद्धा असे वसतिगृह सुरू करावे या हेतूने चिपळूण येथे मुलींच्या वसतिगृहाची सुरुवात झाली. ईशान्येकडच्या मुलींना दापोली इथल्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला दापोलीला आणले होते आणि त्यानंतर चिपळूणला हे काम हलवले गेले. चिपळूणला लहान-मोठ्या देणगीदारांकडून देणगी गोळा करून एक मजली वसतिगृह बांधण्यात आले. आज या ठिकाणी २५ मुली राहत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रात जनकल्याण समितीतर्फे पूर्वांचल विकास प्रकल्पाचे काम चालत आहे. त्या अंतर्गत हे वसतिगृह चालते. या मुलींचा राहण्या-जेवण्याचा तसेच शैक्षणिक शुल्क, गणवेश, कपडे, शैक्षणिक साहित्य या सर्वांचा खर्च, मुलांना शाळेत सोडण्यासाठीच्या वाहनाचा खर्च, आरोग्य, देखभाल असा सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या सहकार्यातून केला जातो. सुरुवातीला दापोलीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्यामुळे चिपळूण येथे त्यांना आणून वसतिगृह उभारण्याचे ठरवले. चिपळूण येथे बारावीपर्यंतचे शिक्षण मुली घेतात आणि त्यानंतर पदवी शिक्षणासाठी त्यांना पुण्याच्या कॉलेजमध्ये पाठवण्यात येते. त्यानंतर त्या मुलींनी पुन्हा आपल्या गावी जाऊन तिथे नोकरी, कार्य, व्यवसाय करावा आणि स्वतःप्रमाणेच इतर मुलींनाही आत्मनिर्भर बनवावे असा खरं तर हेतू आहे.
मुलींना संरक्षित, सुरक्षित वातावरण देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी एक पूर्ण वेळ व्यवस्थापिका नियुक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय दहा जणांच्या कार्यकर्त्यांची समिती असून वेगवेगळे कार्य समिती सदस्य कार्य करतात. वसतिगृहामध्ये भारतीय सण तसेच नाताळ देखील उत्साहात साजरा केला जातो. शिक्षणाबरोबर इतरही संस्कार, राष्ट्रीय विचार, संस्कृती वर्धन, सर्व मुलींचे वाढदिवस यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. इथल्या संस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येका मुलीला एक पालक जुळवून दिला जातो. या पालकांच्या घरी या मुली दिवसभरासाठी सणासुदीला जातात व आपल्याकडच्या सांस्कृतिक, सामाजिक वातावरणाचा स्वतः अनुभव घेतात. यातून दोन्ही बाजूने काम होते. एक तर या मुलींना इथले वातावरण कळते आणि त्या पालकांनाही ईशान्यकडच्या परिस्थितीची माहिती होते. मुलींना पुस्तक, वह्या, दप्तर याचबरोबर शाळेत जाण्यासाठी सायकलची सोय केली जाते. आता तिथल्या मुलींनाही इकडून गेलेल्या मुलींचे अनुभव ऐकल्यानंतर इथे येण्याची इच्छा निर्माण होऊ लागली आहे. यंदा तर जवळजवळ १० मुलींची नावे वेटिंग लिस्टवर आहेत.
गेल्या अठरा वर्षांत नागालँड मधल्या अंदाजे ५०, ६० मुली इथून शिकून बाहेर पडल्या आहेत. ही संख्या समाज परिवर्तन घडवण्यासाठी कमी असली तरी येणाऱ्या पन्नास मुलांतून पुन्हा त्यांच्या गावी गेल्यावर आणखी अनेक मुला-मुलींमध्ये जनजागृती होते हे नक्कीच. मुली त्यांच्या स्वतःच्या प्रदेशात जाऊन आता चांगले काम करत आहेत. यातील एक मुलगी एलआयसीमध्ये ऑफिसर झाली आहे, तर काही मुली शिक्षिका म्हणून काम करत आहेत. इकडे आणून ईशान्यकडच्या मुलींना शिक्षण देणे हे काम तसे जिकिरीचे तसेच लाँग रन आहे. त्यामुळे तिथेच जाऊन मुलांना शाळेतून राष्ट्रीय विचार, संस्कृती याबद्दल शिकवण देण्याच्या दृष्टीने तिथल्या काही शाळांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम देखील सुरू झाल आहे.
आता इथे राहून शिकून गेलेला मुलगा-मुलगी तिथे पोहोचल्यावर काही वेळा त्यांना “क्यू इंडिया मे जाके आये क्या?” असा प्रश्न विचारला गेला, तर आता अशा मुलांचे उत्तर “अरे ये इंडिया ही है, हम इंडिया मे ही रहते है” असे सांगतात. मूठभर मुलांच्या का होईना पण अशा वसतिगृहांमुळे मुलींमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी वसतिगृह अखंड काम करत आहे.
joshishibani@yahoo. com
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…