तो काळा मेघ बघून सुचलेलं मेघदूत आणि आमचा काळा विठोबा याच्यासाठी विरह प्रेम आणि भक्तिभावनेने व्याकुळ झालेला वारकरी आणि आषाढ महिना, आषाढीवारी या आनुषंगाने…
प्रा. मीरा कुलकर्णी – क. जे सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, घाटकोपर मुंबई
हत्तीच्या आकाराचा काळ्या रंगाचा पाण्याने भरलेला मेघ बघून कवी कालिदासांना मेघदूत हे नितांत सुंदर काव्य सुचले आणि कटेवर हात ठेवून युगानुयुग समचरण उभा असलेला साक्षात भुवैकुंठीचा सावळा परब्रह्म असा गोजिरा काळा विठोबा आणि त्याच्या भेटीसाठी विराहने व्याकुळ झालेला प्रेमासह भक्तीत चिंब भिजलेला आमचा वारकरी जेव्हा संत ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, तुकोबाराय, जनाई, सावतामाळी, कान्होपात्रा अशा अनेक संतांच्या ओव्या, अभंग, भारूड गात वारीत तल्लीन होतात तेव्हा त्या संत साहित्यातल्या शब्दवैभवाची भाषा आणि भावनांचे सौंदर्य अनुभवत त्यातील रस, भाव, अलंकाराच्या गजरात तल्लीन होऊन जेव्हा आषाढी एकादशीचे निमित्त सादर दिंडीत सहभागी होतात तेव्हाही या वारकऱ्यांना चिंब न्हाऊ घालतात या आषाढसरी…! ताटातूट… विरह हा मेघदूत या काव्याचा पाया आहे. तर माऊलीच्या भेटीसाठी ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस…’ असा विरहव्याकुळ असलेला आमचा वारकरी आहे. आषाढ सरी आणि आषाढ महिना अनुभवताना या सगळ्या भावना मनाला नेहमीच आनंद देतात.
आश्लेषांच्या तुषार स्नानी
भिऊन पिसोळी थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळीत माध्यान्ही
न्हाणोत इंद्रवर्णात वना
अरे थांब जरा आषाढ घना
बघूं दे दिठी भरून तुझी करुणा
निसर्गसौंदर्याने ओथंबलेल्या, हिरवाईच्या अनेक छटांनी चहूबाजूने निसर्गाला वेढलेल्या, रंगीबेरंगी जादुई किमयेची बहार घेऊन येणारा आषाढघन…! वर्गात बोरकरांची ‘रे थांब जरा आषाढ घना’ कविता या आषाढ महिन्याचे औचित्य साधून शिकवत होते. मुलांचे डोळे कुतूहलाने उत्सुक झालेले. बाहेर अधूनमधून उघडणारा पाऊस आणि आषाढाचे वर्णन करताना मुलांसमोर आपोआप उलगडत गेलेला आषाढ महिना… मग ओघानेच आलेला आषाढातला प्रथम दिवस आणि या आषाढातल्या पहिल्या दिवसाशी घट्ट नातं जोडला गेलेला कवी श्रेष्ठ कालिदास आणि त्यांचे अजरामर महाकाव्य मेघदूत…!
या आषाढ वेगाने साहित्यातल्या अशा अनेक लेखक कवींना भुरळ घातलेली आपल्या शांताबाई, बोरकरांपासून ते रवींद्रनाथ टागोरांपर्यंतच्या अनेक लेखक, कवींनी मुक्तपणाने आषाढावर, मेघदूतावर लिहिले. त्यांची प्रतिभा, शब्दवैभव भरभरून ओसंडून वाहिले. लिहिताना असा हा आषाढातला प्रथम दिवस…
रणरणत्या उन्हात, नांगरून झालेल्या शेतात मृगाचा पाऊस पडतो आणि ओल्या जमिनीत बी पेरून इथला बळीराजा वाट बघतो आषाढाची. अधूनमधून येणाऱ्या आषाढसरींनी ग्रीष्मात तापलेली जमीन प्रफुल्लित होते आणि सगळी सृष्टी उल्हसित होते. ही किमया आषाढसरींची. आषाढ मेघांनी लालसर माती भिजवून हिरवीगार शेतं उगवलेली दिसतात. सगळीकडे सोनचाफा, केवडा फुलतो आणि लाजरी जाई-जुई बहराला येते. या निसर्गसौंदर्याची मनसोक्त उधळण आषाढातच व्हावी हे किती नितांत सुंदर आहे ना! या निसर्गसौंदर्याची भूल पक्ष्यांनाही पडावी आणि मग पक्ष्यांचे, फुलपाखरांचे थवेच्या थवे त्या फुलांशी, हिरव्यागार निसर्गाशी आणि आषाढसरींशी संवाद साधत आकाशात स्वैर विहारावेत. या नयनरम्य सुखद नजराण्याची बरसात आषाढातच मुक्तपणे अनुभवता येते.
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा कवी कुलगुरू महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या या विविध घटकांमधून डोकावणारा मानवी म्हणून कालिदासाच्या प्रतिभेतून मेघदूताच्या रूपाने साकारले आणि विरहाने व्याकुळ यक्षच मेघाला म्हणजे आषाढसरींना आपला दूत होण्याची विनंती करतो आणि आपल्या प्रेयसीला त्याच्याकरवी निरोप पाठवतो. ही मेघादूताची मध्यवर्ती कल्पना. हा यक्ष मेघाला आपल्या प्रेयसीपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो मार्ग सांगतो त्या मार्गाचे वर्णन वाचताना आषाढातल्या पावसामुळे इथे जमिनीवर निर्माण झालेले नितांत सुंदर भौगोलिक सौदर्य, खळाळून वाहणाऱ्या नद्या, सृष्टीने आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे. याचे केलेले वर्णन अभ्यासकांसह रसिक मनालाही भुरळ घालणार आहे. कदम व वृक्ष असो, विदिशा नगरी असो किंवा नर्मदा वेत्रवदी नदी आणि वाटेतल्या निसर्गाची अप्रतिम वर्णन, निसर्गाचे नितांत सौंदर्यच अधोरेखित करते.
विरह, प्रेम या भावनांनी ओतप्रोत भरलेले मेघदूत हे महाकाव्य असो किंवा हजारो मैल टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत, भक्तीभावनेने चालणारा आणि विठुरायाच्या दर्शनासाठी वीरहाने व्याकुळ झालेला आमचा वारकरी असो. पंढरीच्या दिशेने याचि देही याचि डोळा सावळ्या परब्रह्माचे रूप पाहण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याने आषाढातल्या निसर्गवैभवाचा आनंद घेत मनातल्या प्रेम, विरह,भक्ती भावनेच्या अंगाने जाणाऱ्या अभंग गवळणी भारूड घाट विठुरायाच्या दिशेने झेपावणे काय!
मेघ तुझा त्या भावना आणि वारकऱ्यांच्या भावना आषाढ महिना असो आपल्या आषाढसरींनी प्रफुल्लित करतो. धर्म-जात-पंथ ओलांडून या मेघदूतांनी अनेक भाषांमध्ये स्वैरविहार केलाच. पण रसिक मनाला भुरळ पाडली…! सावळ्या परब्रह्मांच्या ओढीने अवघी संतांची, भक्तांची मांदियाळी त्या चंद्रभागेच्या वाळवंटात गोळा होऊन अाध्यात्मिक लोकशाही निर्माण होण्यासाठी या अषाढ महिन्याचेच औचित्य साधावे हा केवढा निसर्ग वैभवचा मोठेपणा सांगणारा योगायोग…!
आपल्या हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात पौर्णिमेला चंद्र पूर्वाषाढ नक्षत्राच्या आसपास असतो. म्हणून हा आषाढ महिना काही ठिकाणी याला आखाडही म्हणतात. या आषाढ महिन्यात हवेत गारवा पसरवणाऱ्या सरी घरच्या गृहिणीलाही आषाढ तळण तळायला भाग पडतात. सुगरण स्त्रियांच्या पाककलांना आषाढ महिन्यात परंपरेने अनेक पाककृतींनाही असे स्थान दिले.
‘कोमल पाचुची ही शेते
प्रवाळ माती मधली औतै,
इंद्रनीळ वेळुंची बेटे,
या तुझ्याच पदविन्यास खुणा…’
या आषाढ घनाला उद्देशून लिहिलेल्या बोरकरांच्या काव्यपंक्ती साक्षात निसर्गाचे रूप आपल्यापुढे उभे करतात. ते पुढे म्हणतात…
‘कणस भरू दे जीवस दुधाने,
देठ फुलांच्या अरळ मधाने,
कंठ खगांचा मधू गानाने,
आणित शहारा तृणपर्णा…!
आषाढ घन असा मुक्त चैतन्याची उधळण करणारा. मेघदूतामध्ये प्रचंड शब्दसंपत्ती, रस, भाव, अलंकार वृत्त यांची अनेकांगांनी रेलचेल आहे. सौंदर्य स्थळ आणि भाषेचे, प्रतिभेचे, शब्दांचे वैभव त्यात आहे.
‘आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला
टक्कर देण्या भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला’
शांताबाईंच्या प्रतिभेनं टिपलेला आषाढ मेघदूत आणि कालिदास. रवींद्रनाथांना मंदाक्रांता वृत्ताविषयी वाटणार हेवा आणि बोरकरांना महाकाव्य लीलाकाव्य वाटणारं मेघदूत असे आषाढ महिन्याभोवती रुंजी घालत आणि अनेक सण उत्सवाच्या निमित्ताने माणसाच्या मनातल्या प्रेमविरह भक्ती भावनांना उल्हसित करते. निसर्ग सौंदर्याची मानवी मनावर मनाला मोहवणाऱ्या या आषाढी सरी म्हणजे जादुई किमयागारच.