
मात्र 'या' वाहनांच्या वाहतुकीवर बंदी
मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पुलाची (Gokhale Bridge) एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. मात्र अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल (Barfiwala Bridge) आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाल्यामुळे बर्फीवाला पूल बंद ठेवावा लागला होता. तयार केलेला नवा पुल लगेचच निकामी झाल्यामुळे प्रशासनाला (Administration) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच सोशल मीडियाद्वारे मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipality) टीकाही करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे प्रशासनाने दोन्ही पुलांची पातळी समतल करण्यासाठी पुन्हा काम हाती घेतले होते. परंतु या कामादरम्यान वाहतूक कोंडीमुळे (Traffic) मुंबईकरांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता हे काम पूर्ण झाला असून वाहतूकमार्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपूल यांची जोडणी पूर्ण झाली आहे. हे दोन्ही पूल काल सायंकाळी ५ च्या सुमारास वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. यावेळी मार्गिका खुली केल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यासोबत पुलाच्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थापनासंबंधित कामे व चाचण्या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण करण्यात आल्यानंतर ही मार्गिका सुरू करण्यात आली.
७८ दिवसांत काम पूर्ण
सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिमी वर उचलण्यात आले. या जोडणीच्या कामासाठी दोन महिन्यांपासून कामाचे नियोजन सुरू होते. प्रशासनासाठी हे काम आव्हानात्मक असूनही दिवस रात्र काम सुरू असल्यामुळे केवळ ७८ दिवसांत पूर्ण झाले.
जड वाहनांना प्रवेशबंदी
गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलद गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करतानाच सी. डी. बर्फीवाला पुलाची दुसरी बाजू जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.