वैष्णवी मातेचा प्रसाद प्राप्त झाला

  44

गजानन महाराज - प्रवीण पांडे, अकोला


पांडे कुटुंबीय यांना आलेला वैष्णव देवीच्या मंदिरातील अनुभव.


माझ्या पत्नीला पहिल्या वेळी दिवस गेले असताना, माझे एक मित्र सहकारी वैष्णव देवीच्या दर्शनाला जाऊन आले. त्यांनी तेथून मला प्रसाद आणून दिला. तेव्हाच माझ्या मनात असा विचार आला की, जर मुलगी झाली, तर तिचे नाव वैष्णवी ठेवूया. आम्ही सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. एका सुंदरशा संध्याकाळी ६ वाजता आम्हाला एक सुंदर, गोड असा कन्यारत्नाचा लाभ झाला. नामकरण विधीच्या दिवशी तिचे नाव माझ्या संकल्पाप्रमाणे वैष्णवी असे ठेवण्यात आले. मनात वैष्णव देवीच्या दर्शनाची इच्छा होती.


मी, माझी पत्नी व दोन मुले असे चौघे जण वैष्णव देवी आणि काश्मीर दर्शन करण्याकरिता ११ मे २०१४ रोजी नागपूर येथून निघालो. पहाटे ४ वाजता गाडी निघाली. दुसऱ्या दिवशीची संपूर्ण दिवसरात्र आणि तिसऱ्या दिवशी आम्ही सहकुटुंब जम्मू येथे पोहोचलो. लगेच कटरा येथे आलो. रात्री ९ वाजता पायी देवीच्या पर्वतावर चढण्यास सुरुवात केली. अर्धकुवरी देवी मंदिरापर्यंत पायी पायी गेलो. आमच्यासोबत नागपूर येथील निपाणे आडनावाचे एक कुटुंब होते. त्यांचा लहान ५ वर्षांचा मुलगा आणि त्या बाईंची आई (वय ७५) यांच्या निमित्ताने पुढे घोडेस्वारी केली. रात्री ३.३० वाजता मंदिराजवळ पोहोचलो. लगेच थोडा चहा घेऊन, दर्शनाकरिता रांगेत उभे राहिलो.


अकोला येथून निघताना माझ्या पत्नीने देवीची ओटी भरण्याचे साहित्य तयार करून सोबत घेतले होते. आम्ही रांगेत उभे असताना, माझ्या पत्नीच्या जवळ एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने माझ्या पत्नीच्या हातात एक हिरव्या रंगाची ओढणी ठेवली. मी पत्नीच्या मागेच उभा होतो. माझी मुलगी वैष्णवी ही तिच्या पुढे होती आणि मुलगा गौरव तिच्या देखील पुढे रांगेत होता. ती व्यक्ती ओढणी देऊन दिसेनाशी झाली. सौभाग्यवतीने मला हा प्रकार सांगितला. मी मागे उभा असताना, मला अशी कोणतीही व्यक्ती दिसली नाही. नंतर मुलीला आणि मुलाला हा प्रकार घडल्याचे सांगितले, तर त्यांना देखील कोणीच दिसले नव्हते, असे त्यांनी सांगितले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास ब्राह्म मुहूर्तावर वैष्णवी देवीचे दर्शन घडले. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, त्रिगुणात्मिका जगदंबा वैष्णवी आईचे दिव्य स्वरुप पाहून मन तृप्त झाले. अष्टभाव दाटून आले, नेत्रांतून अश्रू ओघळू लागले. पिंडीचे जवळून दर्शन घेता आले. मन समाधानाने तृप्त झाले.


मंडळी, अतिशय पवित्र आणि प्रसन्न असे वातावरण असते या गुंफेमध्ये. दर्शन घेऊन ४.३० वाजता बाहेर आलो. हाती ठेवलेल्या ओढणीबद्दल आम्ही सर्व जण चर्चा करीत होतो. त्यावेळी वयाने ज्येष्ठ व्यक्ती जवळच उभे होते. ते म्हणाले की “वो चुनरी अपने घर ले जाईये. वो एक चुनरी मात्र नही हे. वैष्णो माताजी ने उनके किसी सेवक के हाथो आप तक भेजा हुआ प्रसाद है.” ही हिरवी ओढणी आजही आमच्या घरी आहे. दरवर्षी नवरात्रीच्या दिवसांत देवीच्या अंगावर इतर वस्त्रांसह ही प्रसादरूपी ओढणी नेसवित असतो. माझी पत्नी म्हणते की, “ही ओढणी आणून देणारी व्यक्ती मला तर दिसली नाहीच; पण तुम्ही सर्व जण माझ्या मागे-पुढे होतात, तुम्हाला कुणाला देखील ही व्यक्ती कशी दिसली नाही? याची कारणमीमांसा करणे मला शक्य नाही.” बाहेर आल्यावर देखील माझ्या पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू नेत्र त्या व्यक्तीचा अविरत शोध घेतच होते.

Comments
Add Comment

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण