Tuesday, July 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभावंडांतील भांडणं

भावंडांतील भांडणं

मुलांमध्ये सामाजिक कौशल्यांची जर उणीव, कमतरता, न्यायाने वागलं पाहिजे ही जर जाणीवच तयार झाली नसेल, तर भांडणांचं प्रमाण आणि तीव्रता वाढत जाते. आपल्या मुलांबाबत फेव्हरिटिझम नको, अतिसहकार्यही नको. म्हणजे मुलं स्वतःहून मार्ग काढायला, विचार करायला लागतात.

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

मुलं लहानपणी आपल्या भावा-बहिणींशी कितीही वेड्यासारखी भांडली, तरी ते छान मित्र असतात. स्पर्धा असली तरी प्रेम असतं. मारामारी आपापसात करतील; पण दुसऱ्याने एक शब्द जरी भावंडाला बोलला, तर खपवून घेणार नाहीत. जशा झाडाच्या फांद्या वेगवेगळ्या वाढत असल्या तरी त्याचे मूळ एकच असतं, तसंच भावडांचं असतं. ती आपापसात कधी तार स्वरात, तर कधी खर्जात भांडत असली, तरी एकत्र आली की, एक सुमधुर संगीत ऐकू येत राहतं. भावासारखा दुसरा मित्र किंवा बहीण असली तर मैत्रिणीची गरज उरत नाही.

प्रत्येक पालकांचेही असं स्वप्न असतं की, मुलांना वाढवताना दोन भावंडं एकमेकांबरोबर खेळणी, कपडे शेअर करतात. एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना सांभाळत आहेत. प्रेम वाढतंय, भावंडं एक दुसऱ्याला सोडून काही खात नाहीत, एकाला लागलं तर दुसऱ्याला त्रास होतो. दोघांचे सारखेच कपडे आहेत. मैदानावर आपल्या भावाला, बहिणीला कोणी बुली केलं, तर आपल्या भावंडाना दुसरा वाचवतो. ढाल बनून उभा ठाकतो.

पण प्रत्यक्षात हे स्वप्न भंग पावतं. कधी कधी जेव्हा त्यांची भांडणं आई-वडिलांना त्रासदायक होतात. जिथे एका घरात भाऊ-बहीण असतात, तिथे शारीरिक मारामाऱ्या जरा कमी असतात; पण दोन मुलगे असले, तर याचं प्रमाण जास्त असू शकतं. एक तर ही दोन मुलं पूर्णपणे दोन वेगळ्या पर्सनॅलिटीची असतात. त्यांचा स्वभाव, पिंडही निराळा असतो. एक प्रकारची स्पर्धा असू शकते त्यांच्यात. एक असूया, नाराजी असते. भांडणं होतात.

कधी कधी तर खूप जोरदार, टोकाची. आता या नात्यात शांतता कशी निर्माण करायची, हा प्रश्न पालकांना सतावत असतो. काय कारणं असतील दोन भावंडांत मत्सर असण्याची, हे जाणून घ्यायला हवी. सख्ख्या भावंडात, सावत्र भावंडात, चुलत, मावस, मामे भावंडातही ही मत्सर भावना असू शकते. ती शाब्दिक भांडणं, वादविवाद असतात. नावाने चिडवणं, फालतू, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणं, एकमेकांबद्दल मत्सर जाणवेल अशी भाषा वापरणं. हे ऐकलं की, आई-वडिलांना काळजी वाटते; पण मुलांचे वाद, त्यांची भांडणं अगदी नॉर्मल आहेत. बहुतेक पालकांना या गोष्टीला सामोरं जावं लागतं.

भावंडांतील भांडणांची कारणं तरी काय असतात?
●मुलांसाठी भावंडं हा पहिला पीअर ग्रुप असतो. भावंडांबरोबर जुळवून घेणं, शेअर करणं, वाद मॅनेज करणं, संवाद करणं ही अतिशय गुंतागुंतीची कौशल्ये मुलं या संबंधातून शिकत असतात. पण या सामाजिक कौशल्यांची जर उणीव किंवा कमतरता असेल तर किंवा आपण भावंडांनी न्यायाने वागलं पाहिजे ही जाणीवच तयार झाली नसेल, तर भांडणांचं प्रमाण आणि तीव्रता वाढत जाते.

●मानसशास्त्र सांगतं की, मुलांचा घरातील जन्मक्रम, फॅमिली डायनॅमिक्स यावरही भावंडांतील भांडणांची कारणं ठरतात. पहिल्या मुलाचे खूप लाड होतात. जास्त कौतुक होतं. त्याला खूप अटेन्शन मिळतं, पहिलं मूल सगळ्यांचं खूप लाडकं असतं. जेव्हा भावंडं चोवीस तास एकत्र असतात, तेव्हा कुठल्या ना कुठल्या शुल्लक कारणावरून भांडणं होऊ शकतात. ते पूर्णपणे प्रगल्भ नसतात, त्यांचा वैचारिक विकास झालेला नसतो.

अशा मुलांशी तुम्हाला डील करायचं असतं. मुलं आपल्या मनातील निराशा, काळजी हे सारं काढण्यासाठी सहज उपलब्ध असणाऱ्या लहान भावंडांना टार्गेट करत असतात.

●लहान भावंडांना येता-जाता टपली मारणं, कधी फटका मारणं, कारण ते बिचारे लहान असतात हेही चालतं. जर दोघांत चार वर्षांच्या पेक्षा कमी अंतर असेल किंवा कमी अंतर, जास्त अंतर असले तरी ही भांडणं असतातच. ●मत्सर तुमच्या एका मुलाने शाळेत खेळात पहिलं बक्षीस मिळवलं. तुम्ही त्याचं कौतुक केलंत आणि ते पाहून तुमच्या मोठ्या मुलाने छोट्याला मिळालेलं गिफ्ट, सर्टिफिकेट फाडून टाकेन असं छोट्याला धमकावेल. हा असतो मत्सर भावंडांतील.

●इंडिव्हिज्युअलिटी लहान मुलांमध्ये हे जन्मतःच असतं की, ते इंडिव्हिज्युअल असतात. विशेषतः त्यांच्या भावंडांपेक्षा वेगळे, स्वतंत्र असतात. कोण जास्त पुढे जातं, यश मिळवतं ही स्पर्धा असते. कोण सायकल वेगाने चालवतं, कोण जास्त खाऊ शकतं असंही असतं. हे सारं आपल्याला पटत नाही; पण भावडांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि आवश्यक वाटतं.

●मुलांनी जर तुम्हाला दोघांना सतत ओरडून व आक्रमकपणे भांडताना पाहिलं असेल, तर तेही तुमचं बघून तसंच भांडायला शिकतील. भांडणं करणं त्यांना कळेल, पण भांडणं सोडवणं त्यांना जमणार नाही. कारण ते त्यांनी पाहिलंही नाही की, ते शिकलेही नाहीत.

घरात जर एक भावंडं आजारी, विशेष गरजा असणारे असल्याने त्याच्याकडे अधिक लक्ष दिले जात असेल, स्पेशल वागणूक मिळत असेल किंवा त्याने कसंही वागलं तरी त्याचं कौतुकच केलं जात असेल, तर दुसरं मूल मग भांडणाच्या पावित्र्यात राहतं.

मुलं अशी भांडत राहिली की, आपण स्वतःला दोष देतो, पण यात तुमची काही चूक नसते. आपण त्यात पुढाकार घेतो. भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र एकाची बाजू घेतली तर दुसऱ्याला राग येतो.

  • सतत एकाचं कौतुक आणि दुसऱ्याला दोषी ठरवू नका. त्याच्यावर टीका करू नका. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचं कौतुक करा. जसं राधा उत्तम जिम्नॅस्टिक्स करते, अर्णव तबला अप्रतिम वाजवतो.
  • मुलांच्या गरजा आणि आवडीनिवडींकडे विशेष लक्ष द्या. पण शक्यतो मुलांची भांडणं त्यांना सोडवू द्या. तुम्ही त्यात जरा कमी हस्तक्षेप करा. नाही तर भांडण कसं सोडवायचं असतं, हे मुलं कधी शिकणार नाहीत.
  • जर जास्तच भांडण वाढू लागलं, तर दोघांना वेगळं करा. शांत झाल्यावर समजावून सांगा की, तुम्ही दोघंही कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहात.
  • मोठ्या भावंडाकडे पर्सनल लक्ष द्या, कारण आपण नेहमीच मोठ्याला डावलतो आणि लहान मुलाला झुकतं माप देतो.
  • मुलं खेळण्याऐवजी भांडणातच वेळ वाया घालवत असतील, तर त्यांना सांगा की, लवकरच तुमचा ‘प्ले टाईम’ संपतोय. खेळायचं की भांडायचं, ते तुम्हीच ठरवा.
  • जर अर्धा तास भांडला नाहीत, तर आवडता शो लावण्यात येईल. असं सांगता येईल. खेळाचा वेळ वाढवून मिळेल.
    ‘या’ चुका करू नका
  • जर तुम्ही भांडणाची सिच्युएशन पाहिली नसेल, तर कोणाची बाजू घेऊ नका.
  • छोटे छोटे सोल्युशन्स, उपाय सांगा. जे दोघांनाही उपयोगी ठरतील. कधी तडजोड करायला लावा.
  •  दोघांनाही सारखीच जागा मिळू दे, त्यांच्या रुममध्ये.
  • मुलांची भांडणं होत असताना, आपण खरंच रेफ्रीची भूमिका पार पाडत असतो. अशा प्रसंगात आपण कधी ओव्हरव्हेल्म होतो, कधी निराश वाटतं पण शांत राहायचंय. स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. मुलं काय पाहतात की, तुम्ही भांडणाच्या वेळी दोन्ही भावंडांशी कसे बोलता, वागता, प्रतिसाद देता तशी पुढची स्ट्रॅटेजी मुलं ठरवतात.
  • मुलांबाबत फेव्हरिटिझम नको, अतिसहकार्यही नको. म्हणजे मुलं स्वतःहून मार्ग काढायला किंवा कमी भांडून प्रश्न सोडवता येईल का? याचा विचार करायला लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -