Friday, July 12, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘तुम रहे ना तुम...’

‘तुम रहे ना तुम…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

कागज के फुल’ हा १९५९ साली आलेला, भारतातला पहिला सिनेमास्कोप चित्रपट होता आणि तो दिग्दर्शित करणाऱ्या गुरुदत्तची मात्र ती शेवटची कलाकृती ठरली! खरे तर ‘तुझ्या आयुष्याशी इतके साधर्म्य असलेली कथा घेऊन सिनेमा काढू नकोस’ असे सचिनदेव बर्मन यांनी त्याला बजावले होते. इतकेच नाही तर जर ‘असे केलेस तर मी पुन्हा तुझ्यासाठी संगीत देणार नाही’ अशी तंबीही दिली होती.

सिनेमात गुरुदत्तची नायिका होती-वहिदा रहमान. याशिवाय जॉनी वॉकर, वीणा, बेबी नाझ, मेहमूद, मोहन चोटी, टूनटून हेही लोकप्रिय कलावंत होते. एक यशस्वी सिनेदिग्दर्शक (सुरेश सिन्हा) व्यक्तिगत जीवनात मात्र दु:खी असतो. त्याच्या पत्नीच्या घरच्यांना सिनेमा क्षेत्र हे मुळातच एक प्रतिष्ठित व्यवसाय वाटत नसल्याने, दोघांत अंतर पडते. इतके की त्याला स्वत:च्या मुलीलाही भेटू दिले जात नाही.

एका पावसाळी रात्री योगायोगाने त्याची भेट शांतीशी होते. तिला भिजलेली आणि आजारी पाहून तो तिला पावसापासून वाचण्यासाठी आपला कोट देतो. दुसऱ्या दिवशी नोकरी शोधण्यासाठी म्हणून मुंबईत आलेली शांती कोट परत करण्यासाठी शूटिंग सुरू असतानाच चुकून त्याच्या सेटवर येते. तिथे आपोआप झालेल्या तिच्या चित्रीकरणात त्याला तिच्यात अभिनय गुण जाणवतात. त्यामुळे तो तिला सिनेमात घेतो आणि नकळत त्यांची प्रेमकहाणी सुरू होते. त्यांच्यातील संबंधांची चर्चा शेवटी त्याच्या मुलीपर्यंत पोहोचते. तिला आपल्या आई-वडिलांत अंतर पडायला नको असते. म्हणून ती शांतीला भेटून ‘कृपाकरून वडिलांच्या जीवनातून निघून जा’ अशी विनंती करते. त्यावर वहिदा सर्व विसरून गुरुदत्तला सोडून निघून जाते. कोर्टात सुरेशच्या घटस्फोटाला मान्यता मिळून त्याला पत्नी आणि मुलीलाही मुकावे लागते. त्यातून तो व्यसनाधीन होतो. त्याची यशस्वी कारकीर्द संपुष्टात येते. शेवटी व्यसनाधीनतेमुळे खंगलेला सुरेश ज्या स्टुडिओत प्रचंड यश पाहिले, राज्य केले, तिथेच दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून मरण पावतो, अशी ही शोकांतिका.

यावेळी गुरुदत्तचे लग्न गायिका गीता रॉयचौधरीशी (नंतरची गीता दत्त) झालेले होते. त्याच्या आणि वहिदा रहमानच्या रोमांसबद्दल सिनेसृष्टीत कुजबुज होतीच. त्यामुळे सिनेमा त्याच्याच कथेवर आधारित होता, अशी चर्चा झाली. काहींच्या मते, ती ‘किस्मत’चे दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी यांना गुरुदत्तने वाहिलेली आदरांजली होती. शेवटी सचिनदांचे शब्द खरे ठरले आणि सिनेमा साफ कोसळला. समीक्षकांनी आणि प्रेक्षक या दोघांनाही सिनेमा आवडला नाही. गंमत अशी की, आज तोच चित्रपट देश-विदेशातल्या चित्रपटनिर्मिती शिकवणाऱ्या कॉलेजातील पाठ्यक्रमाचा भाग बनला आहे. ‘युनिव्हार्सिटी ऑफ आयोवा’ने तर एका प्रकाशनात म्हटले होते, ‘काही दोष सोडले तर ‘कागज के फुल’चा दर्जा जगप्रसिद्ध इटालियन सिनेदिग्दर्शक फेडरीको फेलिनीच्या सिनेमांइतकाच आहे.’

‘कागज’ची गणती ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने’ प्रसिद्ध केलेल्या २००२ सालच्या ‘सर्वोत्कृष्ट २० भारतीय चित्रपटांच्या यादीत’ ११व्या क्रमांकावर झाली. ‘साईट अॅण्ड साऊंडच्या’ समीक्षकांनी आणि दिग्दर्शकांनी केलेल्या सर्वेक्षणात त्याला आजवरच्या भारतीय चित्रपटात १६०वा क्रमांक मिळाला. ‘एनडीटीव्ही’ने त्याची गणना भारताच्या सर्वोत्कृष्ट २० सिनेमांत केली. ‘आऊटलुक’ मासिकाने २००३ साली घेतलेल्या जनमत पाहणीत पहिल्या सर्वोत्तम २५ सिनेमांत ‘कागज के फुल’ला लोकांनी सहावा क्रमांक दिला. चित्रपटासाठी व्ही. के. मूर्थी यांना सिनेमॅटोग्राफीबद्दल फिल्मफेअर मिळाले आणि एम. आर. आचरेकर यांना सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनाचे फिल्मफेयर.

कागज के फुलमधील कैफी आझमी यांची दोन गाणी अविस्मरणीय होती. ‘बिछाडे सभी बारी बारी’मध्ये सिनेक्षेत्रातील वास्तव सांगितले आहे. यश असताना लोक कसे डोक्यावर घेतात आणि एखाद्या वेळी अपयश आले, तर लोक ओळखसुद्धा न दाखवता, कसे निघून जातात, ते चित्रित केले होते. तेही सिनेमा अांतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला जाण्याचे एक कारण होते. सिनेरसिकात ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ आजही लोकप्रिय आहे. कैफी आझमी यांनी या गाण्यात प्रेमातील एक अगदी वेगळी परिस्थिती चित्रित केली होती. वहिदाच्या मनात गुरू दत्तबद्दल प्रेम अंकुरले आहे. ती त्याच्यासाठी स्वेटर विणत बसली आहे. त्यालाही तिचे प्रेम हवेसे वाटते, मात्र आपण विवाहित आहोत, आपल्याला एक मुलगी आहे, ही गोष्ट वहिदाला माहीत नाही, आपण ती तिला सांगायला हवी, असे त्याला वाटते. मनाचा अगदी निर्मळ असलेला तो तिला सत्य सांगतो. त्यावर ती म्हणते ‘मला सर्व माहीत आहे’ आणि तिच्या चेहऱ्यावर निरपेक्ष प्रेमाचे एक अलौकिक स्मितहास्य उमटते. त्याचवेळी पार्श्वभूमीवर हे गाणे ऐकू येते-

‘वक्तने किया क्या हंसी सितम,
तुम रहे ना तुम, हम रहे ना हम.’
खरेच असे होते. प्रेमिक प्रेमात असताना, स्वत:चे व्यक्तिमत्त्व जीवलग व्यक्तीत जणू विसर्जितच करून टाकतात आणि अनेक बाबतीत एकमेकांसारखे होऊन बसतात. आधीचे एकटेपण जीवलगाच्या भेटीमुळे कुठल्या कुठे पळून जाते. सहजच भेटूनही आपण इतके एकरूप झालो की, जणू कधी वेगळे नव्हतोच, असेच दोघांना
वाटू लागते.

‘बेकरार दिल इस तरह मिले,
जिस तरह कभी, हम जुदा न थे.
तुम भी खो गये, हम भी खो गये,
एक राहपर, चलके दो कदम.’
मात्र नियतीच्या अनामिक भीतीमुळे एक अविवाहित स्त्री आणि विवाहित, मुलगी असलेला पुरुष पुढे काय करणार याचे कोडे दोघांनाही उलगडत नाही. सहवासातून निर्माण झालेले निरागस प्रेम आणि समाजातील रीतीरिवाजांची बूज ठेवण्याची प्रांजळ इच्छा यात त्यांचा गोंधळ उडाला आहे, तरीही प्रत्येक क्षण मनात फुलणारे प्रेम प्रत्येक श्वासाबरोबर त्यांना सहजीवनाची अनेक स्वप्न दाखवत राहते.

जायेंगे कहा, सूझता नहीं,
चल पड़े मगर रास्ता नहीं.
क्या तलाश हैं, कुछ पता नहीं,
बुन रहे हैं दिन ख्वाब दम-ब-दम.’
गीता दत्तच्या आवाजातल्या या गाण्याला संगीत होते-सचिनदांचे आणि गीतकार होते-कैफी आझमी. गुरुदत्त, वहिदा रहमान, कैफी आझमी, सचिन देव बर्मन अशी दिग्गज नावे आणि अब्रार अल्वी यांचे अभिजात संवादलेखन एकत्र येऊनही सिनेमा पडला. मात्र जबरदस्त अभिनय आणि उत्तम दिग्दर्शनामुळे ‘कागज के फुल’नंतर सिनेनिर्मिती शिक्षणाच्या पाठ्यक्रमातील एक भाग बनला. तो हिंदी भाषा समजणाऱ्या कोणत्याही संवेदनशील मनाला दिलासा देताना अस्वस्थ करणाऱ्या आणि अस्वस्थ असताना दिलासा देणाऱ्या गाण्यांमुळे रसिकांच्या कायमच स्मरणात राहणार, हे मात्र खरे!

सिनेमात जेव्हा सर्व संपते आणि सुरेश सिंहाची मुलगी त्याचा पत्ता विचारायला वहिदाकडे येते, तेव्हा तिला एका वेदनादायी प्रसंगातून जावे लागते. गुरुदत्त बेघर, निराश्रित झाल्याने तिच्याकडे त्याचा पत्ता नसतो. पम्मिला नेमका तोच हवा असतो. त्यावेळचा वहिदाचा संवाद अस्वस्थ आपल्याला अस्वस्थ करतो-

“दिन आते हैं, जाते हैं, याद नही रहते.
पिछली यादोके सिवा अब तो
कुछ भी याद नही रहता.”
अशी ही गाणी ऐकताना आपलेही तसेच होते ना? अलीकडे जुन्या काळच्या आठवणीशिवाय काहीही लक्षातच राहत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -